मन्याड काठचा उपेक्षित राजहंस : विश्वनाथ भोस्कर


आमचे वडील मेव्हणे विश्वनाथराव नारायणराव भोस्कर यांचे परवा म्हणजे दि १८ सप्टें २१ रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. म्रतूसमयी ते ६९ वर्षाचे होते. प्रथमतः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.मोठे भावजी अवेळी गेले. माझ्या अल्पबुद्धी प्रमाणे त्यांच्या आयुष्याचे आँडीट करायचे झाले तर ते एक मन्याड काठचे उपेक्षित राजहंस होते.


व्यक्तीमत्व या संज्ञेत जसं बाह्य आणि अंतर्गत असे दोन भाग पाडले आहेत. तसेच उपेक्षित राजहंस या शब्दाची फोड करायची झाल्यास ते स्वभावाने राजहंस होते. यात त्यांचा वैयक्तिक स्वभाव, प्रतिष्ठा, मालमत्ता,समजदारपणा आला. पण सामाजिक आणि आर्थिक स्थिती आणि गोष्टींचा विचार करू जाता,घर – दार, शेत – शिवार यांचा विचार करु जाता, भावजी उपेक्षित राजहंसच ठरतात.


याचं ठळक,महत्त्वाचे आणि सहजपणे लक्षात येणारे कारण म्हणजे बाचोटी या त्यांच्या अगदी जवळून मन्याड नदी वाहते. ती घोडज, शेकापूर, बिजेवाडी, कंधार,बहाद्दरपुरा, माणूसपुरी,मुंडेवाडी, वाखरड,वाखरड बोरी प्रमाणे बाचोटीची पण जीवन दायीनी आहे. यात शंका नाही. म्हणजे मन्याड नदीच्या पाण्यावर उपरोक्त आणि इतरही काही गावची शेती,शिवार फुलते, बहरते आणि फळते सुद्धा. पुढे ही नदी बारुळ पर्यंत जाते. तिथे या नदीवर धरण आहे.सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकासोबतच हाळद आणि ऊस ही पिके घेतली जातात. तर काही ठिकाणी केळी आणि भुईमूग मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.


त्याचबरोबर अलिकडे विकसित करण्यात आलेल्या मुग – उडीद, ज्वारी – बाजरी आणि इतर पिकांच्या विविविध प्रकारच्या जाती या मन्याड खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. त्यामुळे येथील नदीकाठचे शेतकरी अर्थातच सधन आणि प्रयोगशील आहेत. काही जणांनी तर महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेचा लाभ घेत संत्री आणि मोसंबीच्या बागा पण फुलविल्या आहेत. विशेषतः कंधारच्या भुईकोट किल्ला आणि माणसपुरीच्या काही पांढऱ्या मातीत – शिवारात केळीच्या बागा आहेत. निर्विवादपणे ही मन्याड नदीचीच क्रपा म्हणावे लागेल.


पण जणू संथ वाहते क्रष्णामाई, तीरावरच्या दु:खाची, जाणीव तीजला नाही.या गीताच्या गीतकाराची माफी मागून म्हणावे लागते, संथ वाहते मन्याड माई, तीरावरच्या दु:खाची जाणीव तिजला नाही. या ओळीप्रमाणे भावजींना वडीलोपार्जित शेती कोरडवाहू होती. त्यामुळे निसर्गाने किंबहुना गावच्या नैसर्गिक शिवाराने, भौगोलिक रचनेमुळे त्यांना उपरोक्त पीकपाणी आणि म्हणूनच सधनता आणि प्रयोगशीलता या सर्व गोष्टी पासून दूर ठेवले होते.

त्यामुळेच म्हणावे वाटते की मोठे भावजी ,” मन्याड काठचे उपेक्षित राजहंस ” होते.
जर बाचोटी या गावचा संदर्भ नमुद करणें चालू आहे तर या ठिकाणी एक राजकारणातील किंबहुना खादीतील पण एक संत आहेत. ते म्हणजे कंधार – लोहा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते – नेते श्री शंकर अण्णा धोंडगे होत.त्यांचा नामोल्लेख टाळणे म्हणजे माझ्यातील, लेखकातील लेखनकलेची एक मोठी उणीव ठरेल.आणि एक सर्जनशील लेखक म्हणून मी ती उणीव राहू देणार नाही.शिवाय श्रीदत्त संस्थान बाचोटीचे मठाधिपती श्री संत अवधूत गीरी महाराज यांना साष्टांग नमस्कार करून त्यांचा पण आशिर्वाद मागतो.

A bird in a fine weather. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. ती म्हणजे a bird in a fine feather.तीचा अर्थ असा की चांगल्या दर्जाचे कपडे परिधान केलेला माणूस, व्यक्ती. तसंच भावजी बाबतीतही म्हणावं वाटतं, he was a bird in a fine weather. म्हणजे ते एका चांगल्या शेती शिवारातील, चांगल्या परिसरातील चांगल्या हवामानातील आणि चांगल्या भौगोलिक रचनेतील व्यक्ती होते. त्या भरल्या शिवारातील काय काय त्यांच्या हिस्याला यायचे ? हा विषय संशोधनाचा आहे. तो भाग वेगळा.


पण उभ्या आयुष्यात ज्यांच्याकडे मळा आहे, त्यांच्या मळ्यातील मुठभर भुईमूगाचा वेल उपटून खाल्ले असतील. ज्यांच्या शेतात आंब्याचे डेरेदार झाड आहे, त्या झाडाखाली पडलेला एखादा आंबा त्यांनी खाउन पाहीला असेल. जेंव्हा दात व्यवस्थित होते तेंव्हा एखादा ऊसाचा धांडा, भाला त्यांनी खाल्ला असेल आणि काविळीला दूर ठेवले असतील. तीच गोष्ट इतर पिके आणि फळफळावळांची असेल. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


घरी चहा पिऊन बसस्थानकावर गेल्यावर जेवढ्या सहजतेने भावजींनी चहा घेतला. तेवढ्याच कटाक्षाने त्यांनी अगदी हयातभर बिडी, तंबाखू, गुटखा आणि अगदी सुपारी सुद्धा अवार्जून टाळले. हे टाळून स्वतःच्या मुलांपुढे निव्यसनी राहण्याचा एक वास्तुपाठ ठेवला. म्हणूनच की काय उपरोल्लेखित सर्वच गोष्टी पासून त्यांची दोन्ही मुले आजमितीला तर चार हात दूर आहेत.

हे ही नसे थोडके
माझ्या मते चांगले ते वेचीत राहणाऱ्या भावजींनी आपल्या चारीत्र्यावर कुठल्याही प्रकारचा डाग लागू दिला नाही. चारीत्र्यावर एकही शिंतोडा उडू दिला नाही.If wealth is lost, nothing is lost, if health is lost, something is lost and if character is lost everything is lost .असं म्हणतात. भावजींनी तहहयात चारीत्र्य सांभाळले. त्यामुळे त्यांनी काहीच गमावले नाही.


फुलवळच्या महादेवाच्या महाराज, जयवंतराव हात्ते आणि मी स्वतः रेडीओचे शौकीन आहोत. भावजी पण आवडीने रेडिओ ऐकायचे. या मागील शास्त्रीय कारण म्हणजे, डोळे खराब होत नाहीत. आर्थिक म्हणजे परवडते. सहज सुलभ हाताळणी आणि तेवढेच सुलभ उपलब्ध नेटवर्क. ऐकताना आपण इतरही छोटे मोठे काम करू शकता.

माझी आर्थिक कुवत पाहून तीचा संबंध सौ अन्नपूर्णाने रेडिओ ऐकन्याशी जोडला. मी रेडिओ चालू केला तर, अंकल आले ऐपतीवर, असंही ऐकवलं. बाचोटीतला तो रेडिओ आज शांत झाला आहे.


आम्ही पाकिजा हाँटेलमध्ये गेलो. तिथे आगोदरच चार बाचोटीकर चहा प्यायला बसले होते. आमच्या बरोबर शंकरराव भोस्कर भावजी होते. ते म्हणाले तुम्ही पण बाजारात आम्ही पण कंधारात, तिकडे वानेरं कापसाचा फराळ करतील.

त्यावर ते चौघे बाचोटीकर उत्तरले, आहेत की आप्पा. म्हणजे त्यांचे आप्पा, आमचे भावजी आता उरले फक्त उल्लेखापरते, रखवालीपरते. परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.


प्रा भगवान आमलापुरे
फुलवळ : ९६८९०३१३२८
द्वारे शं गु महाविद्यालय
धर्मापुरी.ता परळी वै

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *