( दि.२६ आॅक्टोबर २०२१ कै.आ.गोविंदराव राठोड साहेब यांचा सातवा पुण्यस्मरण दिन.त्या नीमीत्त त्यांना वाहिलेली ही शब्दांजली.)
समाजाच्या विकासात नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका असते. मग ते नेतृत्व सामाजिक,सहकार, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक किंवा राजकीय असो. ज्या नेतृत्वाला त्याच्या अनुयायाची नाडी ओळखता येते व त्यानुसार कार्य करता येते तोच नेता यशस्वी होताना आपण पाहतो. नेतृत्वाकडे विकासाची दृष्टी असली पाहिजे.तशी त्याच्याकडे कृतज्ञतेची भावना ओतप्रोत असणे गरजेचे असते.असी कृतज्ञतेची भावना इतिहासात अनेक नेतृत्वाकडे होती.म्हणून त्यांच्यासाठी जीव द्यायलाही अनुयायी तयार झाले याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजे शिवछत्रपती व त्यांचे मावळे होत. असीच कृतज्ञतेची भावना डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे नेतृत्व म्हणजे कै.आ. गोविंदरावजी राठोड साहेब होत.
वर्ताळा तांडा ता.मुखेड सारख्या छोट्या तांड्यावरती जन्म घेऊनही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती प्राप्त केली. साहेबांना आयुष्याच्या प्रारंभी गरिबीचे अनेक चटके सहन करावे लागले. आपले मोठे बंधू माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांच्या सहकार्याने त्यांनी ऐतिहासिक असे काम शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केले. हे काम करताना ते कधीच दमलेले व थकलेले दिसले नाहीत.वयाची साठी उलटल्यावरही एखाद्या तरुणाला लाजवेल असी कार्य उर्जा त्यांच्या ठिकाणी होती.त्यांचे वैशिष्ट्य होते की ‘आधी केले मग सांगितले’या वृत्तीने काम करत असत. आळस त्यांना माहीती नव्हता. शैक्षणिक क्षेत्रात मुखेड व जळकोट परिसरात संस्थेचे जाळे उभारून हजारो गोरगरीब,दीनदलित यांच्या मुलांना शिक्षित करून आपल्या पायावर उभे केले.ज्याने आपल्या पडत्या काळात आपल्याला मदत केली मग ती शैक्षणिक क्षेत्रातील असो, राजकीय क्षेत्रातील असो किंवा सहकाराच्या क्षेत्रातील असो त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव ठेवून त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना,या नातेवाईकांना गुणवत्तेशी तडजोड न करता नोकरीच्या संधी दिल्या.एवढेच नाही तर जिथे कुठे सहकार्य करता येईल तिथे तिथे सहकार्य करत राहिले. ही वृत्ती अलीकडे ब-याच नेतृत्वाकडे दिसत नाही.सामाजिक बांधिलकी हा शब्द त्यांनी आपल्या आयुष्यात नुसता उच्चारला नाही तर त्याप्रमाणे ते जगले. नांदेड जिल्ह्यात त्यांना गोविंद मामा म्हणूनच ओळखले जाई तर मुखेड परिसरात जी.एम. साहेब या नावाने ओळखले जाई. सुरुवातीला मला जी.एम. या म्हणण्याचा अर्थ जनरल मॅनेजर असा असावा असे वाटायचे पण ते तसे नव्हते. हे नंतर लक्षात आले. साहेबांचे कर्मचाऱ्यांवर आपल्या मुला इतके प्रेम होते. ते कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन फिरत असत, सोबत घेवुन जेवण करत असत,कर्मचाऱ्याच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असत. कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने पार पडेल याकडे ते जातीने लक्ष घालत असत.मला आठवते की मला मुखेडला घर बांधण्यासाठी ते आग्रह करत होते.मी सुरुवातीला टाळत होतो पण नंतर घराचे भूमिपूजन करण्याचे ठरविले.त्यावेळी ते जि.प.नांदेडला बांधकाम सभापती होते.ज्या दिवशी त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होते त्याच दिवशी त्यांची सासू का सासरे दोघांपैकी एक जण वारले. तेंव्हा ते अंत्यविधी करून सायंकाळी ७.०० वाजता भूमिपूजनासाठी उपस्थित राहिले. एकदा शब्द दिला की तो काहीही करून पाळला पाहिजे ही भूमिका त्यांची होती.
साहेबांचे नैतिक वजन आम्हा कर्मचाऱ्यांवर इतके होते की कोणतेही अवैध काम करण्याची हिंमत कोण्हीच करत नसे.तसे आढळून आले तर त्याला चार चौघात झापायलाही ते मागेपुढे बघत नसत. त्यांच्या या नैतिक भीतीमुळे अनेकांचे संसार सूखा समाधानाने चालू राहिले. एखाद्यावेळेस रागात ते जरी जातीचा उल्लेख करून बोलले तरी कधी कुणाला त्याचा राग आला नाही कारण ते मनाने निर्मळ होते हे सर्वांनाच माहिती होते.एखाद्या व्यक्तीवर त्यांचे रागावणे म्हणजे थोड्या वेळाने प्रसन्न होणे आहे असा त्याचा संकेत असायचा. कुठल्याही व्यक्तीचे आर्थिक शोषण करावे व आपण मोठे व्हावे असा कोता विचार साहेबांचा कधीच नव्हता.म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर सात वर्षे उलटुन गेली तरी ही प्रत्येकाच्या तोंडात व ह्रद्यात त्यांचे स्थान आहे व ते शेवटच्या श्वासापर्यंत राहाणार आहे. जी माणसे केलेल्या उपकाराची जाणीव विसरतात, केवळ स्वार्थ पाहतात ती माणसे तात्पुरती भौतिक दृष्ट्या समृध्द झालेली दिसली तरी नंतर त्यांच्या बद्दल समाजात आदरभाव राहत नाही. हे आपण अनेकांच्या बद्दल पाहिले आहे. साहेब सकाळी घराबाहेर पडताना खिसा भरून पैसे घेऊन गेले तर रात्रीपर्यंत वापस येताना त्यांचा खिसा रिकामा झालेला असायचा पण हा खिसा रिकामा होत होता तो गरजवंतांची गरज भागविण्यासाठी.
त्यांना हे माहिती होते की
जिंदगी भर कमाये हिरे हो या मोती l क्या करे यारों कफन को जेब नही होती ll
साहेबांनी आयुष्यात पैसे किती कमावले हे मला माहिती नाही पण एक मात्र खरे की त्यांनी लाख मोलाची माणसं मात्र कमावली. साहेबांना हे सगळे काम करताना जसे त्यांचे ज्येष्ठ बंधू कर्मवीर किशनराव राठोड साहेबांचे व दुसरे बंधू पोमाजी राठोड यांचे सहकार्य लाभले तसेच सहकार्य त्यांच्या पत्नी चक्रवतीताई राठोड यांचे ही लाभले. साहेबांचा वसा आणि वारसा त्यांचा परिवार पुढे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो आहे.साहेबांच्या जाण्याने जसे राठोड परिवाराचे सर्वाधिक नुकसान झाले तेवढेच नुकसान त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक अनुयायांचे विशेषतः कर्मचाऱ्यांचे झाले.आपल्या वडिलांप्रमाणे प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची उणीव प्रत्येकाला पदोपदी जाणवते आहे.
असे असले तरी ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेत जर आपण कार्य केले तर साहेबांना आपण जीवंत ठेवु शकतो. साहेबांचे नाव आणखीन कीर्तिमान करण्याचे काम आपण त्यांच्या विचारांनुरुप आचरण करून करुयात. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.साहेबांना सातव्या पुण्य स्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून. मी माझी शब्दपुष्पांजली अर्पण करून थांबतो.
प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड.