ज्येष्ठांसाठी भाऊबीज या नवीन उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रमात भाऊबीज

नांदेड

ज्येष्ठांसाठी भाऊबीज या नवीन उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रमात लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व नांदेड
मिडटावून यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स परिवारातील सदस्यांनी वृद्ध महिलांकडून ओवाळणी करून घेऊन त्यांना नवीन कपडे व मिठाई वाटप केली असल्याची माहिती सेंट्रल अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व मिडटावून अध्यक्ष डॉ. सुरेंद्र कदम यांनी दिली आहे.

शुक्रवारी लायन्स क्लब नांदेड मिडटावून चे अध्यक्ष ला. डॉ. सुरेंद्र कदम यांनी एखादा प्रोजेक्ट संयुक्तरित्या करावा असे दिलीप ठाकूर यांना सुचविले. दोघांच्या चर्चेतून संध्याछाया वृद्धाश्रमात मिठाई वाटप करण्याचे ठरले. मालेगाव रोडवर असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमाला भेट दिली असता इमारतीबाहेर जुन्या साड्या वाळू घातल्या होत्या. ते पाहून मिठाई सोबत सर्व ज्येष्ठांना नवीन कपडे सुद्धा घेऊन द्यायचे ठरले. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक वाघमारे यांच्याशी चर्चा करून किती सहावारी साड्या तसेच नऊवारी लुगडे लागतील याची माहिती घेतली.

शनिवारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सुरुवातीला दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. सुरेंद्र कदम यांनी वाढत्या वयात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.ॲड. उमेश मेगदे यांनी दिवाळी सणाचे महत्व भारतीयांमध्ये किती आहे याचे प्रतिपादन केले.डॉ. सुनीता कदम यांनी महिलांशी हितगूज करताना उपयोगी टीप्स दिल्या. यानंतर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांनी डॉ. सुरेंद्र कदम, ॲड. उमेश मेगदे, दिलीप ठाकूर, अरुणकुमार काबरा, सुरेश निलावार प्रशांत पळसकर सुरेश शर्मा कामाजी सरोदे यांना ओवाळले.

डॉ. सुनीता कदम, सौ.प्रिया पळसकर, कु.ओवी पळसकर यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना ओवाळले. लायन्स परिवारातील सदस्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांना नवीन कपडे आणि दिवाळीच्या फराळाची पाकिटे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कामाजी सरोदे यांनी तर आभार अरुण काबरा यांनी मानले. लायन्स परिवाराची आपुलकी पाहून अनेक वृद्धांना गहिवरून आले. समाजातील उपेक्षित घटकांसोबत भाऊबीज साजरी करून नवीन पायंडा पाडल्याबद्दल लायन्स परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *