वैखरीचे वारकरी : डॉ. दिलीपजी पुंडे साहेब


दि.११ नोव्हेंबर २०२१ जागतिक कीर्तीचे सर्पदंश चिकित्सक मा. डॉ.दिलीपजी पुंडे साहेबांचा वाढदिवस.त्या नीमीत्त त्यांच्या वक्तृत्व गुणावर टाकलेला हा शब्द प्रकाश )


मानवी जीवन हे विविध कलागुणांनी नटलेले आहे पण ते कलागुण हेरून त्यासाठीचे तपश्चरण करने महत्त्वाचे असते. कधीकधी माणसाला मनातून एक बनायचे असते आणि तो बनतो दुसराच.तरी परंतु ज्या क्षेत्रात तो गेला तिथेही त्याचे सोने करतो व मूळचा पिंड मात्र सोडत नाही.असेच काहीसे डॉ. दिलीप पुंडे सरांबद्दल घडले. त्यांना बारावीनंतर बी.ए. व एम.ए. मराठी करून साहित्यिक व वक्ता व्हायचे होते पण झाले वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर.तरी परंतु त्यांनी साहित्यिकाचा व वक्त्याचा मूळ गुण विकसित केला व आज ते वैखरीचे वारकरी झालेत.


डॉ.दिलीप पुंडे सरांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आणि त्याचे फळ म्हणून त्यांना जागतिक स्तरावरील संयुक्त राष्ट्र संघटनेत सर्पदंश चिकित्सक संशोधकांच्या महत्त्वपूर्ण यादीत स्थान प्राप्त झाले आहे. केंब्रीज सारख्या विद्यापीठाने त्यांचा गौरव केला आहे. सर्पदंशावरील त्यांचे जागतिक स्तरावरील कार्य अजरामर झाले आहे. साप जर प्रश्न असेल तर डॉ.पुंडे साहेब हे उत्तर आहे. आज सर्वच रुग्णांसाठी ते देवतुल्य आहेत पण मला त्या पेक्षा त्यांच्या वक्तृत्व गुणावर या लेखातून प्रकाश टाकावयाचा आहे.
मुखेड व मुखेड परिसरातील कुठलाही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व प्रसंगी राजकीय कार्यक्रम असला तरीही त्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन डॉक्टर साहेब नाहीत असे कधी होतच नाही. राजकीय मंचावर गेले तरीही कुठल्याही राजकीय विचारसरणीचे विचार व्यक्त न करता तटस्थवृत्तीने विचार मांडतात म्हणूनच ते सर्वच राजकीय पक्षांसाठी तितकेच प्रिय आहेत. कितीही अल्प वेळेत कार्यक्रम संपणार असला तरीही डॉक्टर पुंडे साहेबांच्या मार्गदर्शना शिवाय कार्यक्रम संपन्न होत नाही.कार्यक्रम कुठल्याही स्वरूपाचा असो तेथे डॉक्टर साहेब कार्यक्रमाला व संयोजकाला न्याय देणारे भाषण करतात.

त्यांच्या वक्तृत्वात चिंतन असते तसेच संयोजकाचे कौतुक असते. त्या विषयासी अनुरुप काव्यपंक्ती असतात. काही वेळा स्व अनुभव असतात. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाने श्रोते कधीच कंटाळत नाहीत व त्यांचे भाषण संपुच नये असे वाटत राहते. एखादा विषय मांडण्यापूर्वी त्या विषयाचे सर्वस्पर्शी वाचन, चिंतन करणे तसेच एखाद्या विषयाची संकल्पना स्पष्ट होत नसेल तर त्या विषयाच्या अभ्यासकांशी निसंकोचपणे चर्चा करणे,मुद्यांचे लेखन करणे व नंतर ते प्रस्तुत करणे अशी पद्धत त्यांची दिसून येते.

एवढेच नव्हे तर केलेली अनेक भाषणे रेकॉर्ड करून ती श्रोत्यांपर्यंत पोहचवण्याचे कामही केले जाते.त्यांच्या वक्तृत्वाला वजन प्राप्त होते त्याचे कारण त्यामागील त्यांचे असलेले तपश्चरण आहे व त्यासोबतच त्यांचे आचरण आहे. ‘आधी केले मग सांगितले’हा मूलमंत्र त्यांच्या पाठीशी असतो. ‘जास्त करणे कमी बोलणे’ असे सूत्र त्यांच्याकडे दिसते.श्रोते कंठाळतील असे लांबलचक भाषण त्यांनी केलेले मला तरी आजपर्यंत ऐकण्यात नाही. असे हे खऱ्या अर्थाने वैखरीचे वारकरी आहेत.


केवळ स्वतः भाषण देणे म्हणजेच वक्तृत्वावर प्रेम करणे असे नाही तर पहिल्यांदा चांगला श्रोता होणे महत्त्वाचे असते.त्यासाठी त्यांनी आपल्या मातोश्री भिमाबाई यांच्या नावे मागील दशकापासून भिमाई व्याख्यानमाला सूरु केली आहे.या व्याख्यानमालेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांना पाचारण करून चांगल्या वक्त्यांची भाषणे आयोजित करतात.त्या त्या वक्त्यांचे मनोभावे श्रवण करतात. चांगल्या पुस्तकांचे सतत वाचन करतात.

मुखेड असो या नांदेड एवढेच नाही तर जिथे जिथे आपली मित्रमंडळी आहे तिथे तिथे व्याख्यान माला किंवा व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजनाचे मार्गदर्शन करतात व तिथल्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. चांगला श्रोता झाल्याशिवाय आपणास चांगला वक्ता होता येत नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांचे त्यासाठी असे हे प्रयत्न सतत चालू असतात.


या सोबतच वक्तृत्वाच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा वेळोवेळी सन्मानही ते घडवून आणतात व अशा वक्त्यांना त्यांच्या वक्तृत्व विकासासाठी सतत प्रोत्साहन देतात. याचा अनुभव मी अनेक वेळेस घेतला आहे.एखाद्या वक्त्याचा परिचय झाल्यानंतर त्या वक्त्यासी मैत्रीचे म्हणा की पारिवारिक म्हणा नाते आयुष्यभर जोडण्याचे काम ते करतात.’गरज सरो — मरो’ असे त्यांचे स्वार्थी काम नाही.

विषयांची निवड करताना आज समाजाला कुठल्या विषयाचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे हे हेरून असेच विषय समाजासमोर स्वतः मांडतात व व्याख्यानमालेतून असेच विषय निवडून व्याख्याने आयोजित केली जातात. त्यांच्या मार्गदर्शनाने कित्येक लोक सूमार्गी लागले आहेत. अनेक शाळा महाविद्यालयातील निमंत्रण जाणीवपूर्वक स्वीकारून उपस्थिती लावतात व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व परोपरीने समजावून सांगतात. कॉपीमुक्तीचे महत्व ते अनेक दशकांपासून आपल्या व्याख्यानातून मांडत आले आहेत.

त्यासाठी त्यांनी मुखेड तालुक्यात जनचळवळही उभी केली आहे. केवळ बोलके सुधारक एवढ्यापुरते त्यांचे वक्तृत्व नसून कर्ते सुधारक या पंक्तितील त्यांचे वक्तृत्व आहे. पालक मेळाव्यातून पालकांना पाल्यांना घडविण्याचे आवाहन करतात तसेच पालकांनी मुलांवर योग्य वयात योग्य प्रकारचे संस्कार करावेत असा सल्लाही देतात.

Dr.Dilil Punde

त्यांना स्वतःला घडवताना त्यांच्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची काही उदाहरणे श्रोत्यांच्या डोळ्यासमोर ठेवतात. कष्टाला पर्याय नाही हे ही ते स्वतःच्या चरित्रातून काही उदाहरणे देऊन पटवून देतात.’वक्ता दशसहस्त्रेषु’हे संस्कृत सुभाषित त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने लागू होते.


वक्तृत्वाबरोबरच साहित्यिकाला लाजवील असे त्यांचे लेखन आहे.मराठी भाषेचे शुद्ध ज्ञान त्यांच्याकडे पहावयास मिळते. वाक्यरचना, एखाद्या विषयाचे समर्पक लेखन जर कुठे आढळत असेल तर ते डॉ.दिलीप पुंडे सरांकडेच. एखादी पत्रिका असो की सन्मानपत्र असो त्याचा मॅटर तयार करून घेण्यासाठी अनेकजण साहेबांचा सल्ला घेतात व याकामी ते नेहमीच मदत करतात. लहानपणापासूनच साहित्यिक होण्याचा गुण त्यांच्या अंगी होता त्याला मरु न देता जीवंत ठेवण्याचे काम ते करताना दिसतात.

ते जरी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर असले तरी साहित्यिक क्षेत्रातील डॉक्टरला लाजवील एवढे मोठे काम त्यांनी या क्षेत्रातही करतात. एवढीच अपेक्षा आहे की ते जे बोलतात त्याचे लेखन त्यांना वेळ न मिळाल्यामुळे अद्याप पर्यंत होऊ शकले नाही, त्यामुळे अप्रकाशित राहिलेले आहे. पुढच्या वर्षी त्यांच्या वयाला एकसष्ट वर्ष पुर्ण होणार आहेत.त्या निमीत्त एकसष्टी साजरी केली जाईल. त्या साठी एक वर्ष शिल्लक आहे, तोपर्यंत त्यांनी वेळ काढून ते ज्या ज्या विषयावर बोलतात त्या त्या विषयाचे लेखन केले तर अनेक वाचकांना त्याचा फायदा होईल. एवढेच नाही तर त्यांच्याकडे शिक्षणाच्या काळापासून ते आजतागायत अनेक अनुभव गाठीशी आहेत.

जे अनुभव अनेकांना प्रेरणा देणारे ठरणार आहेत अस्या अनुभवांची एखादी आत्मकथन वजा पुस्तिका तयार झाली तर त्याचा फायदा ही अनेकांना होईल.तेंव्हा साहेबांनी आम्हास एकषष्ठीला दोन ग्रंथांची भेट द्यावी अशी अपेक्षा त्यांच्या या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो.

त्यांच्याकडून अशीच वैखरीची व भविष्यात लेखनाची सेवा घडत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांचे आयू आरोग्य अबाधित राखावे कारण त्यांचे जगणे हे केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नसून सर्व समाजाच्या भल्यासाठी महत्त्वाचे आहे एवढेच या प्रसंगी लिहून मी माझा शब्दप्रपंच थांबवतो.

      प्रा.डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने
   ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
             ता.मुखेड जि.नांदेड.
       भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *