(स्मृतिसाद या प्रा.डॉ.भुषण जोरगुलवार शहापूरकर यांच्या आत्मकथनाबध्दल मला वाटलेले माझे मत इथे नोंदवले आहे.)
मानवी जीवन हे सुखदुःख मिश्रित धाग्यांनी बनलेले आहे.कुणाच्या वाट्याला अधिक सुख तर कुणाच्या वाट्याला अधिक दुःख दिसते.असे असले तरी ही संत म्हणाल्याप्रमाणे
सुख पाहता जवा पाडे l
दुःख पर्वताएवढे ll
हेच खरे. जी माणसे सुखाने हुरळुन जात नाहीत व दुःखाने खचत नाहीत. मानवी मूल्यांचा रस्ता न सोडता ती चालतच राहतात. इतिहास अशाच माणसांची नोंद घेत असतो. मग आपापल्या पातळीवर ती नोंद महत्त्वाचीच असते. माणसाच्या कार्याचे मूल्यमापन समाज नेहमीच करत असतो परंतु त्या व्यक्तीला त्याच्या बद्दल जेवढे माहिती असते तेवढे समाजाला माहिती असेलच असे नाही.
जेंव्हा एखादी व्यक्ति अनेक कष्टातून अनेक प्रयत्नातून यशोशिखर गाठते तेंव्हा त्याच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी हा किंवा अन्य काही उद्येश ठेवुन आत्मकथन लिहिले जाते. ज्यातून त्या व्यक्तीच्या जीवनाचा सर्वांग परिचय आपल्यासमोर उभा राहतो. हे लिहीण्यात त्या व्यक्तिचा अहंकार नसतोच तर त्याला हे सांगायचे असते की जीवनात अनेक कष्ट आहेत, अनेक अडचणी आहेत,त्यांनी खचून जाऊ नका तर त्यावर मात करून मार्गक्रमण करत चाला.एक हिंदी कवी म्हणतो त्याप्रमाणे
असफलता एक चुनौती है स्वीकार करो l
क्या कमी रह गई देखो और सुधार करो l
जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम l
संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम l कुछ किये बिना जय जयकार नही होती l
कोशिश करने वालों की हार नही होती ll
काहीसे असेच जीवन स्मृतिसाद या आत्मकथनात लेखक प्रा.डॉ.भूषण जोरगुलवार शहापूरकर यांचे आले आहे.
या पुस्तकाला ‘नितळ व्यक्तिमत्त्वाचे प्रांजळ आत्मकथन’ ही प्रस्तावना अत्यंत समर्पक शब्दात महाराष्ट्रातील ख्यातकीर्त साहित्यिक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची आहे. नुसती प्रस्तावना वाचली तरीही पुस्तकाचे महत्त्व निश्चितच अधोरेखित होते.
चंगळवादाच्या मगरमिठीत सापडलेली आहे.काही मिळविण्यासाठी झगडावे लागते याची जाणीव फार कमी मुलांना आहे.आमच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मुलांचे पाय जमिनीवर असावेत असे वाटते.वाडवडिलांनी जे मिळवले ते सांभाळून ठेवून पुढील पिढीला तशी शिकवण द्यावी.आपल्या वडीलकीचा वारसा जपावा.फक्त संपत्तीच नाही तर संस्कार आणि जीवनमूल्ये ही सांभाळून ठेवावी. असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे आत्मकथन आयुष्याच्या उतारवयात लिहिल्याचे सांगितले आहे.
या आत्मकथन ग्रंथाची किंमत ४७० रुपये ठेवली आहे.पुस्तकाचे अत्यंत बोलके मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी रेखाटले आहे. आत्मकथन एकूण एकोणीस प्रसंगातून साकारले आहे. आत्मकथन वाचायला हातात घेतले की त्याचा शेवट होईपर्यंत हातावेगळे करण्याचे मन होत नाही. लेखकाने वर्णीलेल्या अनेक प्रसंगाचे वाचन करताना बऱ्याच वेळा असे जाणवते की हे वर्णन लेखकाचे नसून आपलेच आहे.
आत्मकथनाची सुरुवात आपली मातृभूमी म्हणजेच आपले गाव शहापूर पासून झाली असून यात गावाचे सर्वांगाने परिपूर्ण वर्णन आलेले आहे.व्यक्तीच्या जडणघडणीत गावाचे कसे योगदान असते त्याचा नमुना इथे पाहावयास मिळतो.गावाचा इतिहास, भूगोल, लोकजीवन, सण-उत्सव, भाषा,शेती -व्यापार,शिक्षण यासारख्या अनेक बाबींचा विस्ताराने उल्लेख लेखकाने केला आहे.राजकारणाचा गावातील शिरकाव, गावाचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान,हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदान, महात्मा गांधी,विनोबा भावे, आर्य समाजाचा गावावर झालेला परिणाम वर्णीला आहे.एकंदर नांदेड जिल्ह्यातील सर्वार्थाने पुढारलेपण असलेले हे गाव असेच चित्र यातून पुढे येते.
तदनंतर लेखक स्वतःच्या जन्माची कहाणी, परिवाराचा परिचय करून देतो त्या काळातील जन्मलेल्या मुलांच्या जन्मतारखेतील गोंधळ वर्णिला आहे. आईचे लेखकाला वाढवतानाचे कष्ट, शिक्षण देण्यासाठीची तिची धडपड, परिवाराची जगतानाची धडपड वर्णिली आहे.प्राथमिक शिक्षण ज्या काळात घेतो त्या काळात पालकांची शिक्षणाबध्दलची असलेली अनास्था ही इथे वर्णीली आहे. लेखक लिहीतो की त्या काळी शिक्षण म्हणजे व्यवहारात सुलभता आणण्याचे एक साधन यापलीकडे शिक्षणाकडे पाहिले जात नव्हते.
त्या काळीं प्रत्येक गोष्ट पोटाशी निगडित असल्याचे ही लेखकाच्या मतातून दिसते.याचा फटका लेखकाला बसला आहे.अत्यंत कमी वयापासून लेखकाला गुलाम हैदर नावाच्या व्यक्तीच्या हॉटेलमध्ये काम करावे लागते, त्यातही या बालकाला किती प्रकारे कष्टाची कामे करावी लागली हे लक्षात येते, जिलेबी विकण्याचे काम करणे,लाकूड फोडणे,नीळ तयार करण्याचे काम, देगलूरला हॉटेलातील वेटरचे काम,गुराखी म्हणुन केलेले काम अशी कितीतरी कामे लेखकाला बालवयात करावी लागली.सुदैवाने आज अशी कामे फार मोठ्या प्रमाणावर बालकांना करावी लागत नाहीत.
एखाद-दोन अपवाद सोडले तर. याच काळात लेखकाला पोहण्याचा छंद जडतो,कुत्रे पाळणे, चित्रकला,गाढवावर बसण्यासाठीचा आटापीटा,नाटकाचा छंद, बासरी वाजवणे, विविध खेळात प्रावीण्य मिळविले जसे उंच ॅउडी, लांब उडी,भाषण करण्याचा छंद, सायकल चालवणे, चित्रपट पाहण्याचा छंद, नंतर महाविद्यालयीन काळात व्हाॅली बॉल,क्रिकेट, टेबल टेनिस या खेळाचा छंद लागतो.या प्रकारे लेखक अनेक छंद जोपासतो.
शिक्षणात वरच्या वर्गाची व्यवस्था गावपातळीवर नसल्याने निर्माण झालेल्या अडचणी ही इथे विशद केल्या गेल्या आहेत.
लेखकाला प्राथमिक शिक्षणापासून ते पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अध्यापन केलेल्या अनेक शिक्षकांची नावे मुखोदगत असून त्यांच्या अध्यापनाचे अनुभवही वर्णिले आहेत.आपले जीवन घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असल्याबद्दलची कृतज्ञताही पदोपदी व्यक्त झाली आहे. प्राचार्य व शिक्षक या संबंधाने काही किस्सेही मजेदार स्वरूपात वर्णीले आहेत.
ज्यामुळे आत्मकथनात रोचकता निर्माण झाली आहे. बाल वयात स्वतःला आलेले अनुभव व अन्य व्यक्तींचे असे काही अनुभव वर्णिले आहेत की ते वाचताना आपसूकच वाचकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते व एका अर्थाने हे असे असू शकते याची खात्री वाटून प्रामाणिकता दृढ होताना दिसते.लेखकाने आपला वेडेपणा ही काही प्रसंगातून वर्णीला आहे.यावरून लेखकाची लेखनातील प्रामाणिकता समोर येते.
काळमानात होत असलेल्या बदलाकडे पद्धतशीरपणे अंगुलिनिर्देश केला आहे. मग सुरुवातीच्या काळात साजरे केले जाणारे १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे राष्ट्रीय उत्सव असोत की शिक्षणाबद्दलची त्या काळात विद्यार्थ्यात असलेले अनास्था असो अथवा शेतमजूरांची त्या काळातील प्रामाणीकता असो,हे सर्व दर्शवुण आज सर्वच क्षेत्रात अप्रामाणिकता त्यामानाने वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अलीकडे भौतिक विकास खूप झाला आहे पण नैतिक विकासाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. हे ही प्रकर्षाने जाणवताना दिसते. शिक्षण क्षेत्रात एकमेकांविषयी असलेला आदर मग तो प्राध्यापक व संस्थाचालक यातील असो की प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधील असो तो अधिक क्षीण होत जातोय याची चिंता लेखक करताना दिसतो. हे खरे आहे की आजच्या शिक्षण क्षेत्रात ते पावित्र्य सर्व लोकांमध्ये राहिले नाही जे पुर्वीच्या काळी होते.
लेखकाने आंतरजातीय विवाह करून खऱ्या अर्थाने पुरोगामित्वाचा आदर्श समाजा समोर ठेवला आहे. काळमाना प्रमाणे असे करने जीकीरीचे असूनही दोन्ही परिवारांकडून कुठलाच त्रास झाला नाही याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. आदर्श दाम्पत्य जीवन कसे असावे?आपल्या अपत्त्यावर आपल्या स्व-आचरणातून संस्कार कसे करावेत?याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हे आत्मकथन आहे.तीन्ही अपत्य ज्यात डॉ.अनघा, डॉ.अर्चना व डॉ.आनंद हे गुणवतेच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रातील अत्युच्च पदव्या प्राप्त करून त्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करताहेत हे आई-वडिलांच्या संस्काराचेच फलीत आहे.
त्यांनी आपल्या विषयात मिळविलेले सखोल ज्ञान व त्यांची अत्यंत प्रभावी अध्यापन पद्धती व विद्यार्थ्यांचे प्रती असलेली कळवळ मी स्वतः अनुभवली आहे कारण मी त्यांचा प्रत्यक्ष पदवी स्तरावरचा विद्यार्थी राहिलो आहे.आदर्श दांपत्य जीवना शिवाय माणूस स्वतःची व परिवाराची प्रगती करू शकत नाही हे त्यांनी आपली पत्नी प्रा.सौ. डॉ.आशा यांच्या संबंधाने जागोजागी सांगितले आहे व एकप्रकारे कृतज्ञताभावच व्यक्त केला आहे.
या आत्मकथनात आपल्या नावाचे वेळोवेळी झालेले नामांतर फार मजेशीरपणे व तितक्याच प्रामाणिकपणे वर्णीलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी केलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे व ज्यात त्यांनी विद्यार्थी प्रवेशासाठी केलेली धडपड असेल की त्यांना वस्तीगृहात अन्नधान्याची व्यवस्था करण्यासाठी केलेली धडपड असेल.अथवा आपल्या महाविद्यालयाला महाराष्ट्रात बारावीसाठी नामांकित बनविण्यासाठी केलेले प्रयत्न असोत. हे नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे.
मित्रत्व कसे असावे? व एखाद्यासी मित्रत्व केल्यावर मित्रासाठी कसा त्याग करावा तसेच चांगल्या मित्रांची संगत कशी आयुष्यात महत्वाची असते, जोडलेले मित्र आयूष्यभर कसे जोडून ठेवावेत हे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले,प्रा. तुकाराम सुरकुंटे,प्रा. डॉ.यादव गायकवाड, प्राचार्य बी.पी.पानपट्टे यांच्या वर्णनातून आले आहे.
सेवानिवृत्ती नंतरचा काळ ही आपणास चांगल्या पद्धतीने जगता येऊ शकतो आपण जर परिवारात सौजन्याने वागत राहिलो तर नातवंडांचे प्रेम आपणास कुठलाच ताण तणाव येवु देत नाहीत. वाटले तर आपणास ज्या गोष्टीचा छंद आहे त्यात स्व:ताला गुंतवुण घेणे महत्त्वाचे आहे.
लेखक माझे गुरु प्रा.डॉ. भूषण जोरगुलवार शहापूरकर यांनी हे आत्मकथन लिहून मराठी साहित्याला एक चांगला ग्रंथ दिल्याबद्दल वाचक प्रतिनीधी म्हणुन मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो व सर्वच वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील व यातील ब-याच बाबी आपल्या आयुष्यात उतरविण्यासाठी प्रामाणीक प्रयत्न करतील.
प्रा.डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५