अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले – आ.राजूरकर


नांदेड दि.22- राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर केलेले आरोप बालिश व हास्यास्पद आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक तेढ निर्माण करुन राजकीय पोळी शेकण्याचा इतिहास कोणत्या राजकीय पक्षाचा आहे,

ते सर्वश्रुत असून भाजपाची राज्यात होत असलेली पिछेहाट व जनतेने त्यांना आमदार म्हणून नाकारल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळेच त्यांनी अशा पध्दतीचे आरोप करत असल्याचा घाणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर यांनी केला.


डॉ.बोंडे यांनी नांदेडमध्ये केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतांना ते बोलत होते.यावेळी राजूरकर म्हणाले की, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याचा केलेला विकास सर्वांसमोर आहे.ते पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला गती मिळाली आहे.

त्यामुळे पालकमंत्र्यांनी विकासातील अपयश लपविण्यासाठी काहीही करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. विधान परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक आणि त्यानंतर देगलूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे त्यांना पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची भीती वाटू लागली आहे.


निवडणुकीत अपयशाची शक्यता असेल तर सामाजिक तेढ,गैरसमज, अपप्रचार निर्माण करायचा आणि प्रक्षोभक वक्तव्य करुन मतांचे राजकारण करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. देगलूर पोटनिवडणुकीत देखील भाजपने समाजा-समाजात फूट पाडून मते मिळवण्याचा प्रयत्न केला.

परंतु मतदारांनी विकासाच्या मुद्यावर मतदान करुन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट केले. किमान यापुढे तरी नांदेड जिल्ह्यातील भाजपाला जाग येईल आणि ते नकारात्मक बाबींऐवजी विकासाच्या सकारात्मक मुद्यांवर भूमिका घेतील अशी अपेक्षा होती. परंतु डॉ.अनिल बोंडे व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधील हिंसक घटनांबाबत घेतलेली भूमिका पाहता भाजपला विकासाऐवजी समाजात अशांतता निर्माण करण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे दिसून येते. शिवाय केंद्राचे काळे काळे कृषी कायदे व शेतकरी आंदोलनाबाबत भाजप तोंडावर पडली आहे.

त्यामुळे अब्रू झाकण्यासाठी भाजपाला आता भावनिक मुद्यांना हात घातल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. भाजपची ही चलाखी मतदारांच्या लक्षात आली असून, केवळ नांदेडच नव्हे तर संपूर्ण देशातील जनता त्यांना चोख प्रत्युत्तर देईल असा इशाराही आमदार अमरनाथ राजूरकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *