एकेकाळी राष्ट्रकूटांची राजधानी राहिलेल्या कंधार (कंदाहार ) शहराच्या लगतच किल्ल्या शेजारी असलेली वीर बहाद्दरांची वस्ती म्हणजेच बहाद्दरपुरा…! किल्ल्याच्या मुस्लिम मालकाच्या ‘ बहादूर ‘ नावाच्या एका मुलाच्या नावावरुन या वसतिला हे नाव पडले असे म्हणतात.
नव्यानेच तयार झालेल्या नांदेड ते उदगीर व्हाया कंधार या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या विजयस्तंभाशेजारी ‘सुलोचना’ या नावाचे एकमजली टुमदार घर आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून प्रा. बालाजी कारामुंगीकर या मित्राचा पीएच.डी. व्हायवा संपवून उदगीरकडे जाताना आम्ही संध्याकाळी सात वाजता कंधार शहरात पोहोचलो; तेव्हा मला भाई गुरुनाथ कुरुडे यांची आठवण झाली.
पुढे गेलेली गाडी ड्रायव्हरला परत घ्यायला सांगितली. गुरुनाथरावांच्या घरासमोर रात्रीही आम्हाला छानशी रांगोळी काढलेली दिसली. या रांगोळीत “जय क्रांती ” असा शब्द लिहिलेला होता. विद्यार्थी असताना या शब्दाने माझ्या मनावर गारूड केलेले होते. तेव्हा आठवड्यातून कितीतरी पत्रं मी लिहीत असे आणि प्रत्येक पत्राची सुरुवात ” क्रांती” या शब्दाने होत असे. गेल्या-गेल्या गुरुनाथरावांना आम्ही ” जय क्रांती – लाल सलाम ” असं अभिवादन केलं.
तेव्हा त्यांनीही मूठ आवळून “लाल सलाम” असं आम्हाला प्रत्युत्तर दिलं. माझ्या सोबत पीएच.डी.साठी संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी भरतकुमार गायकवाड, डॉ. संग्राम गायकवाड, डॉ. बळीराम भुक्तरे अशी मित्रमंडळी होती. ‘अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अण्णाभाऊंच्या सहकाऱ्यांच्या मुलाखती ‘ या उपक्रमाबद्दल जेव्हा मी बोललो; तेव्हा भाई कुरुडे यांचा चेहरा फुललेला दिसला. स्वतःहून अण्णा भाऊंबद्दल भरभरून बोलायला, माहिती सांगायला त्यांनी सुरुवात केली.
“आमचे नेते भाई केशवराव धोंडगे हे कंधार मधून पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हाची ही गोष्ट आहे. मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत आमदार निवासात मुक्कामाला असताना, कोल्हापूरचे केशवराव घाटगे उर्फ आमदार मातंग गुरुजी यांच्याशी माझी भेट झाली. मातंग गुरुजींना स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी आपले आडनाव दिले होते. वकिलीची सनद दिली होती. त्या मातंग गुरुजींनीच आम्हाला एक दिवस आमदार निवासात संयुक्त महाराष्ट्राचे बिनीचे शिल्पकार साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची भेट घालून दिली.
अतिशय जवळून झालेली अण्णाभाऊंची ही माझी पहिलीच भेट. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करीत असताना अनेकदा मी अण्णाभाऊंचे नाव ऐकलं होतं. पंतप्रधान नेहरूंना प्रतापगडाच्या पायथ्याशी काळे झेंडे दाखवताना अण्णाभाऊंना पाहिलं होतं. दिल्ली सत्याग्रहात अण्णाभाऊंची शाहिरी ऐकली होती. लाखो लोकांची मनं आपल्या वाणीने आणि लेखणीने जिंकणारा हा लोकशाहीर, महान समाजवादी नेता आणि क्रांतिकारी लेखक आहे तरी कसा हे जवळून पाहण्याची मला खूप इच्छा होती. आमदार निवासात अण्णा भाऊं सोबत माझी आणि धोंडगे साहेबांची बरीच चर्चा रंगली होती.
यावेळी अण्णाभाऊ रशियातून नुकतेच परतले होते. तिथल्या अनेक आठवणी अण्णाभाऊंनी आम्हाला सांगितल्या. तो महान समाजवादी सोव्हिएत देश पाहून आपल्या भारतालाही समाजवादी भारत बनविण्याचे स्वप्न अण्णाभाऊंनी पाहिले होते.
त्यानंतर अण्णाभाऊंच्या मुंबईत माझ्या कितीतरी भेटी झाल्या. त्यांच्या चिराग नगर मधील झोपडपट्टीतही आम्ही गेलो होतो. छोट्याशा घरामध्ये हा मोठा लेखक राहत होता. एकदा अण्णाभाऊ खूप आजारी पडले. ते मुंबईतील एका सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आम्हाला कळले. मी आणि धोंडगे साहेब लगेच तिथे गेलो. तेव्हा आण्णाभाऊ खूपच आजारी होते. ते खचले होते. अण्णा भाऊंना चांगल्या उपचारांची गरज होती. आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांना भेटलो आणि अण्णा भाऊंची चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी सगळी व्यवस्था केली. त्यांना शासनाकडून कलावंतांना मिळणारे मानधन मिळावे यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावाही केला होता.
अण्णाभाऊंनी गरीबी स्वीकारली; मात्र लाचारी कधीही स्वीकारली नाही. गरीबांमध्ये राहून गरिबांसाठी झगडण्याचे त्यांचे न्यारे तंत्र होते. भारतातल्या जातिव्यवस्थेमुळे अण्णा भाऊ साठे यांच्या सारखा महान कलावंत , दृष्टा लोकनेता आम्हाला अजूनही कळाला नाही हे आमचं दुर्दैव..! “
भाई बोलत होते. आम्ही ऐकत होतो.
तब्बल तास-दीड तास भाई अण्णाभाऊंच्या बद्दल अखंडपणे बोलत होते..! अण्णाभाऊंच्या पक्षनिष्ठेबद्दल आणि समाजवादाच्या निष्ठेबद्दल भाईंच्या मनात नितांत आदर आहे. आणि माणसामाणसात भेदभाव करणाऱ्या जातिव्यवस्थेचे बद्दलची प्रचंड चीड आहे.
२८ डिसेंबर १९३२ रोजी मन्याड नदीच्या काठावर वसलेल्या बहाद्दरपूऱ्यात भाईंचा जन्म झाला. महादु कुरुडे हे त्यांचे आजोबा हरहुन्नरी कलावंत होते. लोकांचे आजार ते जडीबुटी देऊन दूर करीत असत. मोडलेली हाडे बसवून देत असत. ते उत्तम चित्रकार , शिल्पकार आणि मूर्तिकारही होते ; तसेच कसबी कारागीर, सुतार आणि सोनारही होते. कपड्यांना रंग देण्याचा विशेषतः नीळ देण्याचा त्यांचा व्यवसाय होता. कपडे विणणारा विणकर, शिवणारा शिंपी, तर कपड्यांना रंग देणारा रंगारी आणि नीळ देणारा तो ‘ निळारी’ . व्यवसायामुळे बनलेल्या ‘ निळारी’ या ओबीसी जात समूहात भाईंचा जन्म झाला. आजोबांचे हे सर्व गुण भाई मध्ये जसेच्या तसे उतरले.
निजामी राजवटीत कंधार शहरातील उर्दू शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेत असतानाच त्यांनी एक सुंदर चित्र काढले, त्याबद्दल कंधारचे पहिले आमदार गोविंदराव मोरे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
ते नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस आणि कॉम्रेड स्टॅलिन यांची चित्रे काढली आणि या दोन्ही चित्रांना पहिले बक्षीस मिळाले. त्यांची ओळख विद्यार्थिदशेत ‘पेंटर साहेब’ अशीच झाली होती. भाईंच्या घरी बैठकीत आजही त्यांनी स्वतः काढलेली कॉम्रेड लेनिन आणि महात्मा फुले यांची सुंदर चित्रे आहेत.
भाईंचे वडील माणिकराव हे त्या काळातील नामांकित व्यावसायिक होते. बाचोटी रस्त्याला त्यांनी तीस एकर शेती खरेदी केली. मात्र ही शेती नंतर जवळच्या बारुळ धरणात गेली. त्यानंतर भाईंनी कंधार मध्ये ‘ क्रांती प्रिंटिंग प्रेस’ सुरू केली आणि याच प्रेस मध्ये भाई केशवराव धोंडगे यांचा ‘जय क्रांती ‘ हा पेपर छापणे सुरू झाले. भाईंना मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकायचे होते. भाई केशवराव धोंडगे यांची भेट झाली आणि भाई राजकारणात आले. रजाकारी विरुद्धच्या चळवळीत ते सक्रिय होते. नंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी केली.
भालकी-बीदर भागात सीमालढ्याचे नायक भाई बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्यासोबत सत्याग्रह केले. शेतकरी कामगार पक्षाचे ते सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते. १९५७ झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली भाई केशवराव धोंडगे यांचा विजय झाला. केशवराव धोंडगे साहेब आमदार झाल्यानंतर १९६२ ते ६७ अशी पाच वर्षे नांदेड जिल्हा परिषद सदस्य म्हणून भाई गुरुनाथराव कुरुडे यांना काम करण्याची संधी मिळाली. १९७२ ते ७७ या काळात कंधार पंचायत समितीचे सभापती म्हणून भाई कुरुडे यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली.
आणिबाणी विरुद्ध ठराव घेतल्यामुळे भाई कुरुडे यांना आमदार केशवराव धोंडगे यांच्या सोबत १४ महिने जेलमध्ये राहावे लागले. आणिबाणी नंतर इंदिरा गांधी सरकार पराभूत झाले. १९७८ साली भाई गुरुनाथ कुरुडे विधानसभा निवडणुकीत कंधार मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. मात्र अल्पावधीतच विधानसभा बरखास्त झाली आणि पुन्हा निवडणूका लागल्या. यावेळी मात्र भाई कुरुडे यांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला.
भाईंच्या आयुष्यात बरेच राजकीय चढ उतार आले. मात्र त्यांनी भाई केशवरावांसोबतची दोस्ती कधीच सोडली नाही. दोघांनीही मैत्रीचं नातं कायम जपलं आहे. सध्या
राजकीय संरचना प्रचंड बदलली आहे, महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर आलेलं आहे. तरीही गुरुनाथ कुरुडे यांच्या सारखे सच्चे काॅम्रेड आजही जातिअंत- वर्ग अंत होईल, या आशेने काम करत आहेत, हेही तितकेच खरे आहे..! मनस्वी चित्रकार, शिल्पकार, सत्याची बाजू निर्भिडपणे मांडणारे पत्रकार आणि अजातशत्रू राजकारणी असलेल्या ९० वर्षाच्या तडफदार अशा अण्णा भाऊंच्या या खऱ्याखुऱ्या सहकाऱ्याला मानाची जय क्रांती…! क्रांतिकारी लाल सलाम..!!
- डॉ. मारोती कसाब