नांदेड – जि.प.शिक्षण विभागाने काल प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याच्या यादीत जवळपास १४५ जणांना अपात्र घोषित केले आहे.
ज
घ जी यादी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे त्यावरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार चालू आहे याची प्रचिती येते असा आरोप शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केला आहे. असा प्रकार दोनदा झाल्याचे अंबुलगेकर यांचे म्हणणे आहे.
आमचे बांधव दोन दोन वेळेस प्रस्ताव देऊनही जर अपात्र होत असतील तर यास जबाबदार कोण आहे ? कशामुळे अपात्र ठरविण्यात आले ? मागील महिन्यात संबंधित तालुक्यातील माननीय गटशिक्षणाधिकारी यांना पडताळणी करुन , छाननी करुन , प्रस्तावासोबत अपुर्ण असलेले कागदपत्रे पुर्ण करुन प्रस्ताव जोडून दिले होते , मग कागदपत्रे कुठे गेली ? याबाबतचे अनेक प्रश्न शिक्षक सेनेने उपस्थित केले आहेत.
चट्टोपाध्याय पहिली पात्र यादी प्रसिद्ध केली होती , आता केलेल्या प्रसिद्ध यादीतील बरेच शिक्षक अपात्र करणे, जे पात्र केले आहेत त्यांच्या पात्र यादीत नियुक्ती तारखा देय श्रेणीच्या तारखा चुकीचे टाकणे, पात्र असलेले अपात्र कशाच्या आधारे केले आहेत हे न समजणे, चट्टोपाध्याय वेतनश्रेणीसाठी आता पर्यंत काही शिक्षक बांधवांनी कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच पाच वेळा प्रस्ताव दाखल करुनही अपात्रच ठरविणे आदी बाबींमुळे शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
विशेष म्हणजे मुखेड या एकाच तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षक अपात्र केले ही बाब दखल घेण्यासारखी आहे, या विषयावर आॅफीसमधील काही कर्मचाऱ्यांनी जाणुनबुजून हे काम केले असल्याची शंका येत आहे.
प्रस्ताव विशिष्ट तारखेत घ्यायचे होते तर यादीत वाढ कोणी केली ? का केली ? संबंधित पात्र व अपात्र करण्याचे यादीचे काम कोणाकडे होते ? कोण काम पाहत होते ? ज्यांनी काम पाहत होते; त्यांनी यादी स्वतःकडे का ठेवली होती ? यादीचे काम करणारे जबाबदार व्यक्ती कोण आहे ? यादीचे काम करणारे आतापर्यंत किती कर्मचारी बदल केले आहेत ?