नांदेड – भारत हा सर्वात मोठी लोकशाही सत्ता असलेला देश आहे. परंतु धर्माचा पगडा जनमानसावर जास्त आहे. देशाची प्रगती आणि विकास यात धर्माचा हस्तक्षेप वाढला आहे. धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्यांचा अंगिकार केल्यानेच भारत महासत्ता बनेल असे प्रतिपादन ४ ते आॅनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी सीमा मोरे,प्रशांत वंजारे, अमृत बनसोड, संजय मोखडे, मधू बावलकर, गंगाधर ढवळे, सूनंदा बोदिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने चार दिवसीय आॅनलाईन व्याख्यानमालेच्या संविधान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पहिले पुष्प iयवतमाळ येथील प्रा. माधव सरकुंडे यांनी 'भारतातील धर्मनिरपेक्षता' या विषयावर गुंफले. पुढे बोलताना ते म्हणाले की, धर्माच्या नावावर चालणारे राज्य भारतीय संविधानाने मोडीत काढले. ज्यांना धर्म पाळायचा असेल त्यांनी वैयक्तिक पातळीवर पाळावा. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये. राजकीय सत्तेचा वापर भारतात एखाद्याच धर्माच्या उत्थानासाठी करता येत नाही. राजसत्तेत धर्माला हस्तक्षेप करता येत नाही. राजकीय धोरण निर्माण करण्यासाठी धर्माचा आदेश नाहीतर लोकशाही तत्वावर ठरायला हवे. सत्तेत असलेल्या व्यक्तीने आपल्या धर्माला प्राधान्य देता कामा नये.
धार्मिक विचार हा कट्टरतावादी असतो. तो अवैज्ञानिक, भेदभाववादी, दुराग्रही तसेच हिंसकही असतो. धर्माचा संबंध धर्मग्रंथातील मूल्यांवर आधारित असतो. देशाचा पंतप्रधान कोणत्याही धर्माचा असला तरी या धर्मनिरपेक्ष भारतात त्याला त्याच्या धर्माचे लांगूलचालन करता येत नाही. धर्म माणसांत भांडण लावतो. धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. देशात निकोप वातावरण टिकवून ठेवायचे असेल, विविध योजना, प्रकल्प, विकासाची धोरणे आखायची असतील, सामाजिक सद्भावना टिकवायची असेल, देशातील खनिज संपत्ती, संसाधने, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य त्या पद्धतीने वापर करुन देशाला महासत्ता बनवायचे असेल तर सर्वच लोकांनी आपापले धर्म, पंथ बाजूला ठेवून धर्मनिरपेक्ष संविधानानुसार चालावे लागेल. अन्यथा यादवी माजेल, असेही ते म्हणाले.
महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन सज्जन बरडे, वनिता इंगोले, मधू बावलकर, बाबुराव पाईकराव, किशनराव पतंगे, भैय्यासाहेब गोडबोले, प्रशांत वंजारे, अमृत बनसोड, अशोक मेश्राम, सुनंदा बोदिले, अरुण विघ्ने, देवानंद पवार, राम सावंत, संजय मोखडे, संजय डोंगरे, सतिश मस्के, अभय अवथरे, रवी तायडे, मनोज वानखडे, राहूल काळे पाटील, देव मुन्नेश्वर, राजेश जुनगरे, भीमराव वंजारे, चंद्रकांत सरदार, आत्माराम ढोक, नवनीत काळे, वैजनाथ पायके, संदिप व्यवहारे, प्रल्हाद आगबोटे, सुनील बांगर, सुनील मनवर, नाजुकराव धांडे, केतन मुजमुले, रुपाली सोनावणे यांच्यासह अनेकांनी आॅनलाईन व्याख्यानाचा लाभ घेतला.
पं. नेहरू धर्मनिरपेक्ष पंतप्रधान होते
भारतात विविध धर्म आणि जातीतील लोक कित्येक वर्षे सहिष्णु सहजीवन जगत आले आहेत. भारताला कोणत्याही एका धर्मात किंवा जातीमध्ये बसवू शकत नाही. धर्मनिरपेक्षता ही भारत देशाची गरज असून किंबहुना ती आधीपासूनच नांदत आलेली आहे. जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एका मंदिराच्या उद्घाटनाला बोलाविण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मी धर्मनिरपेक्ष भारताचा पंतप्रधान आहे. मी येऊ शकणार नाही असे निक्षून सांगितले होते. ही धर्मनिरपेक्षता आजच्या प्रधानमंत्र्यानी पाळली पाहिजे. आपण धर्मनिरपेक्षबद्दलचे गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेमुळे असलेले स्थैर्य उधळण्याचा कट विविध देश करत आहेत. म्हणून धर्मनिरपेक्षतेची टिंगलटवाळी सुरू आहे. भारताचा मुख्य प्रश्न विकास हा नसून धर्मनिरपेक्षता कशी टिकवावी, हा आहे.