फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्ग चे अर्धवट राहिलेले काम तात्काळ पूर्ण करावे यासंदर्भात ग्राम पंचायतच्या वतीने संबंधित विभागाला ता . १९ सप्टेंबर २०२१ रोजी पत्र पाठवले होते. त्याचे कारण असे होते की
फुलवळ बस स्थानक शेजारी जांब व मुखेड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाय पॉईंट तयार झाला असून त्या ठिकाणचे वळण हे अत्यंत धोकादायक बनले आहे.
त्यामुळे दिवसेंदिवस छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढत असून कधी कोणाचा जीव जाईल हे सांगणे जरी कठीण असले तरी वाढत्या वाहतुकीचा विचार करता सावधानता बाळगणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
फुलवळ ग्राम पंचायत ने राष्ट्रीय महामार्ग विभागाला पाठवलेल्या त्या पत्राच्या आधारे तब्बल दोन महिन्यानंतर ता. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने फुलवळ ग्राम पंचायत ला पाठवलेल्या पत्रात ग्राम पंचायत ने केलेल्या मागणीचा संदर्भ देत ते अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी मिळून रस्त्यालगतचे अतिक्रमण व विद्युत डेपो हटवण्यासाठी सहकार्य करावे असे मत मांडून पळवाट काढली आहे.
एवढेच नाही तर त्या पत्रात असाही उल्लेख आहे की या केंद्रशासनाच्या रस्त्याचे काम प्रगती पथावर असून या रस्त्याची रुंदी १०० फूट असून सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ते व आर सी सी नाली सुद्धा दोन्ही बाजुंनी करणे अनिवार्य आहे . त्यासाठी रस्त्या लगत असलेले हॉटेल्स , दुकाने व अन्य अतिक्रमण हटवन्यासाठी व तो विद्युत डेपो काढण्यासाठी आपण सहकार्य करावे असाही स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रस्ता नक्कीच होणार यात शंकाच नसून नाली सुद्धा होणार हे स्पष्ट झाले आहे.