अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
पिवळ्याजर्द भंडाऱ्यानं भरलेले आणि आत – बाहेरुन माखलेले हाती लाकडी कोटंबं असनारे अबाल, बालके – बालीका आणि वयोमानानुसार हाती काठी आलेले व्रद्ध श्री खंडोबा देवस्थान, श्री क्षेत्र माळेगाव यात्रा, ता लोहा जिल्हा नांदेड, येथे पाहून वाटलं की लहान – थोरांना किंबहुना मानवी मनाला उत्सवाची आस, माळेगाव क्षेत्री, चंपाषष्ठी ( सट ) आगोदरची, मीनी माळेगाव यात्रा भरली खास.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिला रविवार परवा दि ०५ डिसें २१ रोजी होता. श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान, श्री क्षेत्र माळेगाव यात्रा येथे श्री एकनाथराव पलमटे यांच्यामुळे दर्शनासाठी जाण्याचा योग आला.
देवस्थानाकडे वळताच मुख्य कमानीच्या आगोदरच एक बुजूर्ग व्यक्ती हातात काठी घेऊन खुर्चीत बसले होते. दुसरे काठीधारी मध्यमवयीन ग्रहस्थ मोटारसायकलच्या पार्किंगची व्यवस्था पाहत होते.
मुख्य कमानीच्या आतमध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा नारळ – प्रसादाचे, पुजेच्या साहित्याचे, बेल – भंडाऱ्याचे, खोबऱ्याचे, खेळण्या – पाळण्याचे आणि पेढ्याची दुकाने दिसून आले.काही शालेय मुले आणि मुली हाती पिवळ्याजर्द भंडाऱ्यानं भरून माखलेले कोटंबं घेऊन हजर होते. जणू आलेल्या सदभक्तांच्या कपाळावर भंडारा लावण्यासाठी .किंबहुना स्वागतासाठी आणि जर जमलं तर थोडीफार दक्षिणा मिळवण्यासाठी त्यांची बाल – धावपळ सुरू झाली होती.
दुसऱ्या कमानीतून आतमध्ये प्रवेश करताच रंगाचा, वारणेसाचा वास आला. इकडे तिकडे, खाली वर पाहिले तर एक रंग कामगार कमानीस रंग देत होता. जणू काही तो माळेगावच्या मुख्य यात्रेचीच तयारी करत होता. त्याच दरम्यान पत्रकार एस पी केंद्रे सरांची सहकुटुंब भेट झाली. सरांनी खंडोबाच्या दर्शनाआधीच मला पहिला प्रसाद दिला. दोन गोष्टी बोलून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
दगडी बांधकामात सदैव उभ्या असलेल्या डिकमाळी जवळ चालत्या – बोलत्या खंडोबाच्या साक्षीने काही भक्त मंडळी नारळ फोडत होते. दर्शन रांगेत तसी फार मोठी गर्दी नव्हती पण अर्धेअधिक भक्त विनामास्क होते.
शेवटच्या टप्प्यात, दर्शनानंतर खोबरं उधळण्यासाठी मंदिरा बाहेर आलोत तर मंदिराच्या स्लँपवर चढून शिखराशेजारी उभे असलेली काही बालके मंदिरावर उधळलेले खोबरं आद्दर, वरच्यावर झेलत होते.म्हणून ओठांवर शब्द आले, ‘ मानवी मनास उत्सवाची आस, श्री माळेगाव क्षेत्री यात्रा भरली खास.’