कुरुळा( विठ्ठल चिवडे )
नांदेड जिल्ह्यातील २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकांत कुरुळा गट लक्षवेधी ठरला जिल्ह्यातील एकमेव अपक्ष उमेदवाराला मतदार राजाने भरभरून प्रतिसाद दिला.पक्षीय दृष्टीकोनातून संमिश्र राहिलेल्या कुरुळा गणाकडे अनेकांच्या वाहनांची चाके वळली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सर्कलवर अनेकांचा डोळा असून आत्तापासूनच राजकारण्यांना मतदारांचा लळा लागल्याचे चित्र आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत चर्चेचा विषय बनलेल्या कुरुळा गटात जिल्ह्यातील ६३ जागेपैकी सौ.शोभाताई रमेश गोमारे या केवळ एकमेव अपक्ष उमेदवाराकडे मतदाराने सर्कलच्या नेतृत्वाची धुरा सोपवली.आत्तापर्यंत कुरुळा गट काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक राहिला असून एकवेळ अपक्ष उमेदवाराकडे राहिला आहे.फेब्रुवारी २०२२ ला कार्यकाळ संपणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आता सक्रिय होताना दिसत आहेत.
आतापासूनच सोशल मीडियावर शाब्दिक राळ उडत असून इच्छुक उमेदवार जनसंपर्क वाढवण्यासाठी विविध क्लुप्त्या आजमावत आहेत.एकीकडे कोरोनाची परिस्थिती असून पुढील निवडणुकांच्या बाबतीत मोठा संभ्रम असला तरी जागेच्या आरक्षण सोडतीचे आतापासूनच कयास लावले जात आहेत.
होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर,विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण व मुखेड-कंधारचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या प्रतिष्ठेसह तालुक्यातील जेष्ठ दिग्गज नेते व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.मागच्या जि. प.निवडणुकीत अपक्ष उमेदवार सौ.शोभाताई रमेश गोमारे यांनी बाळासाहेब गोमारे यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला यात प्रतिस्पर्धी भाजपच्या जनाबाई शिवाजीराव नाकाडे व काँग्रेसच्या सुनीता प्रल्हाद गुट्टे यांना पराभव पत्करावा लागला.
कुरुळा गटात काँग्रेस व भाजपा या दोन पक्षाच्या विचारधारा जोपासणारी जनसंख्या मोठी असली तरी ऐनवेळी स्थानिक उमेदवारांचा विचार करणारा मतदार आहे हे मागच्या निकालावरून स्पष्ट होते.त्यामुळे बाहेरच्या उमेद्वारापेक्षा स्थानिक उमेद्वारालाच मतदार अधिकचे प्राधान्य देणार असल्याचे संकेत आहेत.
त्यामुळे पक्षीय बलाबल आणि त्यानुसार अंदाज बांधणे सद्यातरी कठीण आहे.असे असले तरी एरव्ही न फिरकणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांच्या वाहनांची चाके आता कुरुळा गटाकडे फिरताना दिसत आहेत.
काँग्रेस पक्षाला संधी?
कंधार तालुक्यात मातब्बर काँग्रेस नेत्यांची फोज असून ना.अशोक चव्हाण सद्या राज्याच्या सत्तेत मंत्रीपदावर आहेत त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांची मळभ दूर झाल्यास पक्षाला अच्छे दिन येऊ शकतील.कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे आक्रमक नेतृत्व मा.सभापती बालाजीराव पांडागळे यांच्याकडे असल्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी उपरोक्त बाबी जमेच्या आहेत याचा नक्कीच फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे.
रामदास पाटील यांची एन्ट्री निर्णायक:
हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी नुकतीच प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.त्यांना मानणारा मोठा वर्ग मुखेड-कंधार विधानसभा क्षेत्रात आहे.
कोरोना काळात त्यांच्या मित्र मंडळाकडून गरजुना अत्यावश्यक झालेली मदत यामुळे पाटील यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे.त्यांनी उमेदवाराला पाठिंबा दिल्यास उमेदवाराच्या विजयाचा मार्ग आणखीनच सुकर होणार अशीही चर्चा आहे..