फुलवळ गटावर अनेकांची मदार , फुलवळकर किती दिवस होणार आयातांसाठीच बेजार…

फुलवळ विशेष प्रतिनिधी

         स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळात होणाऱ्या जि. प. , पं. स. च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि फुलवळ जि.प.गट हा ओपन म्हणजेच सर्वसाधारण साठी सुटणार असल्याची चर्चा सर्वत्र चालू असून अनेक इच्छुकांनी भाऊगर्दी करायला सुरुवात केली व भेटीगाठीना चांगलाच वेग आला आहे. विशेष बाब म्हणजे आजपर्यंत जेवढ्या इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत ते सर्व गटाबाहेरचे असून आजपर्यंत निवडून आलेल्या जि. प. सदस्यांपैकी केवळ दोनच सदस्य हेफुलवळ गटात गाव असलेले होते तर बाकी सर्व गटाबाहेरून आयात केलेले होते . 

 तेंव्हा यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय असे संकेत मिळत असतानाच काही सूज्ञ जाणकारांकडून ऐकायला मिळत असलेली चर्चा अशी की एवढं मोठं सर्कल च गाव असून आजपर्यंत एकही फुलवळ मधून जि. प.सदस्य म्हणून निवडून आला नाही ?  का येऊ दिला नाही ?  या खोलात जाण्यापेक्षा आतातरी फुलवळकर जागे होतील का ? की पहिले पाढे पंचावन्न म्हणून आयतांच्याच मागे राहतील अशीच चर्चा ऐकायला मिळत असल्याने त्यावर असेच म्हणावे लागेल की फुलवळ गटावर अनेकांची मदार , फुलवळकर किती दिवस होणार आयातांसाठीच बेजार...

    कंधार तालुक्यात फुलवळ जि. प. गट हा नेहमीच राजकीय दृष्ट्या चर्चेत असतो. याच मुख्य कारण म्हणजे सर्वाधिक मतदार संख्या असलेला हा गट असून जाणकार व सुज्ञ राजकारणी लोकांची संख्या या गटात मोठ्या प्रमाणावर आहे. विशेष म्हणजे या गटात कोणत्याही एका कॅटेगरीतील मतदारांची प्रबळ संख्या नसून सर्व सामावेश असा हा गट असल्याने आणि या गटातील प्रत्येक गावात प्रत्येक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला म्हणावे तेवढे परिश्रम येथे घ्यावेच लागत नाहीत. 




     तसे पाहता गेली २५ , ३० वर्षातल्या जवळपास ५ , ६  निवडणूक कालावधीचा इतिहास पाहता आजपर्यंत जि. प.सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांपैकी केवळ दोनच सदस्य असे होते की त्यांचे गाव स्वतः फुलवळ गटात समाविष्ट आहे , पण सर्वात जास्त मतदार संख्या असलेल्या फुलवळ गावातून आजपर्यंत एकही व्यक्ती जि. प.सदस्य म्हणून निवडून येऊ शकला नाही. तर ते दोन सदस्य वगळता अन्य निवडून आलेले सर्व सदस्य हे गटाबाहेरुन आयात केलेले म्हणजे त्यांचं मतदान तर सोडाच पण त्याचं गावही फुलवळ गटात नसतांना बाहेरून येऊन निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले आणि पाच वर्षे सत्ता करून गेले. फुलवळकर मात्र सुरुवातीपासूनच हेवेदेव्याच्या राजकारणात कधी याच्या मागे तर कधी त्याच्या मागे राहत गावाचा विचार न करता आयातांनाच मदत करत आपले सर्वस्व पणाला लावत  वर्चस्व प्रस्थापित करण्यात गुंग राहिले. 

    असेही नाही की आजपर्यंत फुलवळ गावातून कोणी जि. प. च्या निवडणूक रिंगणात उतरलाच नाही किंवा तसा सर्वबाजूने सक्षम व्यक्ती फुलवळ मध्ये नाहीच असेही नाही , तीन ते चार निवडणुकीत  फुलवळ मधून कधी कोणी तर कधी कोणी असे करत उमेदवारी दाखल करून रणांगण गाजवलेच होते , परंतु त्यांना त्या त्यावेळी अपयश पदरी पडले आणि आयात उमेदवारानेच बाजी मारली . फुलवळकर तेंव्हा मात्र काही हिरमुसलेले चेहरे तर काही आनंदी चेहरे आपापल्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन गोळाबेरजा मारण्यात आठवडा घालून तर्कवितर्क मांडत आपण सगळे मिळून अस केलं असत तर काही बदल झाला असता किंवा तस केलं असत तर काही फरक पडला असता असे मत मांडत पाच वर्षे हात चोळत राहिले.

   आजपर्यंत च्या या सर्व घडामोडींचा आढावा पाहता आता येणाऱ्या काळात होणाऱ्या जि. प. , पं. स. निवडणूकीच्यावेळी तर फुलवळकर जागृत होतील का ? आणि मागे झाले तेच यापुढेही होऊ नये यासाठी पुढाकार घेऊन काही प्रयत्न करतील का ? आणि यावेळी तर सर्वांनमते जि. प.व पं. स. साठी गावातून एखादा उमेदवार उभा करून मतभेद , पक्षभेद बाजूला सारत सर्वजण एकवटून त्याला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून यश संपादन करतील का ? असे एक ना अनेक सवाल अनेक जाणकार मतदारांच्या चर्चेतून ऐकायला मिळत असून आता तरी व्हा सावधान असे म्हणत फुलवळ गटावर अनेकांची मदार , फुलवळकर किती दिवस होणार आयात उमेदवारांसाठीच बेजार असेही बोलले जात असून येणारा काळच ठरवेल की फुलवळकरांच्या विचारात आणि निर्णय क्षमतेत काही बदल होईल का ? तेच पाहण्याची उत्सुकता अनेक जाणकारांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *