माणसा माणसांत सुसंवाद निर्माण व्हावा ही काळाची गरज
मराठी साहित्य संमेलनांचा विचार केला तर ११ मे १८७८ रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. यालाच पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजल्या जाते. आणि या साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्या. रानडे हे होते. इथून मराठी साहित्य संमेलनाची परंपरा सुरू झाली. आणि सन १९८५ ला ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान नांदेडला मिळाला. त्यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर पाटील हे होते. इथूनच नांदेडकरांना साहित्य संमेलनाची प्रेरणा मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या परिसरात बोली भाषेतील ग्रामीण साहित्य संमेलन शेकडोंनी भरविली जातात. ही भरविली जाणारी साहित्य संमेलनं त्या त्या भागातील साहित्याची जाण असलेली मंडळी भान ठेवून साहित्याचं जतन व संवर्धन व्हावं, म्हणून पुढाकार घेऊन साहित्य संमेलनं भरवित असतात. वाचन संस्कृती जोपासून ती वृध्दींगत करण्यासाठी पुस्तकावरील प्रेम वाढविण्यासाठी ही जाणकार मंडळी सक्रीय असते. अशाच ग्रामीण साहित्य समेलनापैकी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एक मैलाचा दगड ठरलेलं साहित्य संमेलन जाने. १९९१ ला तत्कालीन खासदार मा. केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून उदयास आलं. ते संपूर्ण साहित्य विश्वात आगळं वेगळं ठरलं. गुराखी साहित्य संमेलन. हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थानं लोकसाहित्यावर विचार मंथन करायला लावतं. अत्यंत कमी खर्चात होणार हे साहित्य संमेलन आहे. गेल्या तीस बत्तीस वर्षा पासून हे साहित्य संमेलन अव्याहतपणे चालू आहे. गुराख्याच्या तोंडून जनावरं हाकताना, राखताना बोली भाषेतून बोलल्या जाणाऱ्या साहित्याची निर्मिती डोळ्यासमोर ठेवून, हे साहित्य संमेलन भरत असते. भटक्या विमुक्त समाजातील वासुदेव, गोंधळी, मसणजोगी, फासेपारधी, वडार, तुडबुडके, फकिर, गारुडी, पोतराज, चाळणीवाले, मनकवडे, माकडवाले, नंदीवाले अशा विविध समुदायातील लोकांच्या साहित्याचा जागर या संमेलनात होतो.
आता प्राकृतिक भाषे मध्येच साहित्य संमेलन होत नसून ते बोलीभाषेमध्ये सुध्दा होत आहेत. आणि या साहित्याचे अनेक वाङमयीन प्रकार त्या त्या बोलीभाषेत दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे साहित्य चळवळीत ही अनेक प्रवाह दिसून येत आहेत. एक सारख्या साहित्य संमेलनात वाङमयाचे अनेक प्रकार चर्चिले जातात. आणि ती चर्चिल्या जावेत हिच अपेक्षा असते. असे असले तरी बरेचसे साहित्य प्रकार हे उपेक्षित रहातात. आणि ही उपेक्षितपणाची पोकळी भरून काढण्यासाठी काही प्रवाह निर्माण झाले आहेत. जसे की, मराठवाडी बोली साहित्य, खान्देशी बोली साहित्य, झाडीपट्टी बोली साहित्य, झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य, तावडी बोली साहित्य, मराठवाडा झाडी बोली साहित्य, मालवणी बोली साहित्य, व-हाडी बोली साहित्य, आदिवासी साहित्य, शेतकरी साहित्य, ग्रामीण साहित्य, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य, दलीत साहित्य, इ..इ…साहित्य संमेलनं हे लिखाण करण्या पुरतेच मर्यादित नसतात. तर ते साहित्यातून संस्कृतींची जोपासना व संवर्धन कसे होईल याची काळजी घेत असतात. म्हणून साहित्य संमेलनं हे ग्रामीण भागात घेणे गरजेचे आहे. बोली भाषा आणि आपली संस्कृती जनतेसमोर आणण्याचे काम ही संमेलनं करीत असतात. विविध प्रकारांची व विविध लेखकांची पुस्तकं ग्रामीण भागातील जनतेपर्यंत, युवका पर्यंत पोहोचली पाहिजेत. यातूनच संस्कृतीचं संवर्धन होतं. यासाठी ग्रामीण भागात साहित्य संमेलनं भरविनं गरजेचं असतं
जी संमेलनं मोठ्या शहरांमध्ये आणि मोठ्या स्वरुपाची असतात अशा संमेलनात डामडौल जास्त असतो. त्यात उत्सवाचं, जत्रेचं स्वरूप पहायला मिळतं. हौस मौजच जास्त असते. पण ग्रामीण साहित्य संमेलनात असं चित्र दिसत नाही. ग्रामीण भागात साहित्य संमेलने आयोजित केल्याने ग्रामीण भागातील युवावर्ग साहित्याकडे आकर्षित होईल आणि अस्सल नवनिर्मितीला नवप्रेरणा मिळेल. समाजातील अन्याय अत्याचार शोधण्याचे व त्याला वाचा फोडण्याचे काम लेखकांचे असते. तसी एक प्रकारची जबाबदारीच त्यांच्यावर असते. संवेदनशील लिखाणाचा प्रभाव जण माणसांवर पडतो. आस्वाद घेण्याची गोडी त्याच्यात निर्माण होते. म्हणूनच ग्रामीण रसिक ग्रामीण साहित्य संमेलनाला दाद देतो. ग्रामीण भागातील काही माणसं फारच इरसाल वृत्तीची असतात. त्यांना साहित्यात पकडता आली पाहिजे. त्याच वागणं बोलणं चित्रित करता आलं पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे एकदा ग्रामीण साहित्य संमेलनाबद्दल फार मार्मिक बोलले होते. ते म्हणाले होते, “संमेलन म्हणजे गावात दर आठवड्यात भरणारा आठवडी बाजार! तसा विचार केला तर त्या आठवडी बाजाराचा सामानाची आणि वस्तूंची खरेदी-विक्री करण्यापलीकडे काय उपयोग असतो? पण आठवडी बाजारात लोक येतात. भाजी, धान्य, वस्तूंची खरेदी-विक्री करतात. तंबाखू हातावर चोळता चोळता, बिडी पितापिता गप्पा मारतात, बायका भाजी, आरसे फण्या घेताघेता सुखदु:ख सांगतात. मनोरंजन, सुखदुःखाची देवाणघेवाण अशा अंगाने आठवडी बाजाराकडे बघावं. साहित्य संमेलनाचही तसंच आहे.”
जिथं लेखकांचं लिखाण संपतं तिथून पुढं वाचकांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं पाहिजे. हा विचार करण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचं काम ही साहित्य संमेलनं करीत असतात. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, रा. रं. बोराडे, जगदीश कदम, रविचंद्र हडसणकर, नागनाथ पाटील, विलास सिंदगीकर, राजेंद्र गहाळ, शिलवंत वाढवे,… यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाची मांडणी केली. निस्वार्थ निरिक्षणातून अस्सल ग्रामीण साहित्याचं दर्शन होतं. ग्रामीण भागातील माणसं कोणताही आडपडदा न बाळगता चालता, बोलताना दिसतात. ते भावार्थ टिपता आले पाहिजे. या साठीच ग्रामीण साहित्य संमेलनं आवश्यक वाटतात. ग्रामीण भागातील लोकांनी लोक वाङमय म्हणून पिढी दर पिढी ओव्या, भारुडे, लावण्या, कवने, छक्कड, अभंग, जात्यावरची गाणी, भक्तीगीते, लोकगीते अशा अनेक रचना अलिखित स्वरूपात हस्तांतरित केली. लोकसंगितामुळे हे साहित्य वाङमय मोठ्या प्रमाणावर मनोरंजक पद्धतीने बहरले. ज्यांच्या प्रतिभांनी ही नवनिर्मिती केली ते कोणतेही प्राध्यापक किंवा कोणतेही साहित्यातील डॉक्टर नव्हते. ग्रामजीवनाने आजच्या साहित्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. म्हणून साहित्य संमेलनाचा ग्राम जागर ग्रामीण भागातच झाला पाहिजे. पण ग्रामीण भागात साहित्य संमेलनं घेत असताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. संमेलनभर मान्यवरांसह इतरांच्या मानापानाची बूज राखावी लागते. पाहुण्यांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. ही सारी कसरत आयोजकांना करावी लागते. मोठेपणाने मिरवणे हा या साहित्याचा उत्सव म्हणून या कडे पाहणाऱ्यांचा हेतू असतो.
साहित्य संमेलनं ग्रामीण भागात गाव पातळीवर आयोजित केल्यामुळे बोली भाषेचा, मराठी भाषेचा सन्मान वाढतो. गावकुसात रहाणारे तसेच गावकुसाबाहेर रहाणा-या साहित्य प्रेमींना, कवी लेखकांना प्रोत्साहन मिळते. हक्काचं विचारपीठ मिळतं. गाव परिसरातील परंपरा, चालीरीती, वागणं बोलणं, हे सारं लोकसाहित्यात प्रतिबिंबीत झालं पाहिजे. नवलेखकांना लिहितं केलं पाहिजे. त्यांच्या पाठीवर थाप देऊन, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रस्थापित लेखकांना युवा लेखक घडविता आले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपलीच टिमकी न वाजवता नव्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. सुजाण वाचकांनी, रसिक प्रेमींनी अनेक वाचक निर्माण केले पाहिजेत. त्यांना वाचन करण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. यासाठीच ग्रामीण संमेलने महत्वाची आणि उपयोगी ठरतात. यातूनच मानवी मनांची सांस्कृतिक जडणघडण होते. सततच्या वैचारिक जागराने ग्रामसंस्कृतीचे जतन होते. म्हणून साहित्य लिहिताना, पुरस्काराचा दृष्टिकोन न ठेवता नवसाहितीकांनी साहित्य लेखन करावं. शब्दांचा नुसता फापटपसारा काही कामाचा नसतो. मोजकचं पण चांगलं दर्जेदार लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी वाचन, चिंतन मनन, व वास्तव परिस्थितीचं, सभोवतालच्या परिसराचं अवलोकन करता आलं पाहिजे. लिखाण हे अण्णाभाऊ साठे सारखं, वामनदादा कर्डक सारखं निस्वार्थ भावनेनं लिहिता आलं पाहिजे. लिखाणातून समाजाचं प्रबोधन व परिवर्तन घडावं ही अपेक्षा व भावना बाळगून लिखाण करावं. समाजातील कष्टक-यांचं, शेतकऱ्यांचं, मजूरांचं, कामगारांचं दु:ख दैन्यावस्था, वेदना साहित्यात उमटल्या पाहिजेत. ते जगाच्या वेशीवर टांगलं पाहिजे. मानव जातीच्याच नव्हे तर जगातील संपूर्ण जीवांच्या कल्याणाचा विचार लिखाणात उतरला पाहिजे. निव्वळ पुरस्कारासाठी साहित्य लेखन करु नये. पुरस्कार मिळतील अथवा न मिळतील पण समाजाला नवी दिशा देणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे.
माणूस उभा राहिला तरच देश उभा रहातो. ही जाण संतांना होती. म्हणूनच त्यांनी माणूस उभा करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूप मोठे आहे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदायात माऊली हा शब्द उच्चारताच लगेच ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. आपल्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या प्रकारच्या अलौकिक अशा संतांची परंपरा लाभलेली आहे. थोर संतांनी जनतेला त्यांच्या संतवाणीतून वेळोवेळी जीवन जगण्याचे मार्ग सांगितले आहेत. आणि त्या काळातील जून्या चालीरीती, रुढी परंपरा मोडीत काढून, समतेचा संदेश संतांनी जनतेला दिला आहे. त्यात …संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, इत्यादी पासून ते संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा या सा-या संतांनी समाजाला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. संत तुकाराम हे मराठी साहित्यातील पहिले विद्रोही संत होत. त्यांनी सतत समाजातील बुरसटलेल्या रुढी परंपरेवर प्रहार केला आहे. ते ख-या अर्थाने परिवर्तनवादी संत होते…पत्नी ही क्षणिक काळाची पत्नी असून ती अनंत काळाची माता आहे. असं ठणकावून सांगणारे एकमेव संत फक्त तुकाराम महाराज होत.
आजही अनेक लेखक, कवी मित्र विद्रोह मांडतात, त्यात चार अश्लील शिव्या देतात, समाजा समाजात, जाती जातीत तेड निर्माण करणारे, चार वाक्ये लिहितात, चार ओळी लिहितात म्हणजे त्यांना वाटतो हा विद्रोह होय. पण असे म्हणता येणार नाही. विद्रोह कसा करावा हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा खरा विद्रोह जर कुणी केला असेल तर तो अडीच हजार वर्षांपूर्वी जून्या चालीरीती आणि रुढी परंपरा, वर्णभेद नाकारणा-या बुध्दांनी केला. कोणाचाही द्वेष न करता, कोणावरही टीका टिप्पणी न करता, आपले विचार संयतपणे, संयमाने मांडून समाजात परिवर्तन घडवून आणले. हा विद्रोह होय. आणि असा विद्रोह पहिल्यांदा बुध्दांनी घडवून आणला. म्हणून विद्रोही साहित्य लिहिताना बुध्दाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. शिक्षणाची गंगा तळागाळातील समाजापर्यंत नेऊन गावकुसाबाहेरच्या लोकांना शिक्षणाचे धडे देवून महात्मा फुलेंनी सुध्दा विद्रोह केला. कुठेच आततायीपणा नाही. अश्लीलता नाही. फक्त परिवर्तन घडवायचे असेल तर या अज्ञानी लोकांना शिक्षित केलं पाहिजे. शिक्षण नसण्याचे दुष्परिणाम महात्मा फुलेंना माहित होते. म्हणूनच ते म्हणाले…
विद्येविना मती गेली, मती विना गती गेली,
गती विना वित्त गेले, वित्ता विना शुद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले …
म्हणून पुढील अनर्थ टाळण्यासाठी महात्मा फुलेंनी शिक्षणावर भर दिला. आणि प्रचलित रुढी परंपरेला छेद दिला. हा एक तत्कालीन समाजा विरुद्ध केलेला विद्रोह होय. असाच विद्रोह महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पेटवून बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी केलेला प्रत्येक संघर्ष हा विद्रोहच होय. पण तो सनदशीर मार्गाने केलेला विद्रोह होय. बाबासाहेब सुध्दा म्हणाले, शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे, जो कुणी पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. यासाठी शिकलं पाहिजे. ख-या खोट्याची पारख करता आली पाहिजे. आपल्या हक्काची, आपल्या कर्तव्याची जाणीव आपणाला असली पाहिजे. चार अश्लील शिव्या देणं किंवा समाजा समाजात तेढ निर्माण करणारे चार वाक्ये लिहिनं अथवा बोलणं म्हणजे विद्रोह नव्हे. याचं भान ठेवलं पाहिजे. ट ला ट आणि प ला प जोडून चार ओळी लिहून झटपट व्हाट्सअप, फेसबुक वर शेअर करायचं आणि रातोरात कवी व्हायचं. हे वेड आता ब-याच प्रमाणात दिसून येत आहे. यांचं एवढ्यावरच भागात नाही तर ते स्वयंघोषित महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी, ग्रामीण कवी, लोककवी, बालकवी, नवकवी, विद्रोही कवी, भावकवी वगैरे वगैरे, बिरुदावली स्वतःचं स्वतःच्या नावापुढं लावत आहेत. हे कितपत योग्य आहे. याचं चिंतन झालं पाहिजे, काही व्हाट्सअप समुहामध्ये विषय देऊन कविता केल्या जातात. तर काही ठिकाणी चित्र चारोळ्या ही केल्या जातात. यात फक्त शब्दांची जुळवाजुळव असते. कविता कुठेच दिसत नाही. तेव्हा कविता लिहिताना ती चिंतनशील असली पाहिजे. ती पट्टीत नसली तरी चालेल…
काही वर्षांपूर्वी नवलेखकांच्या लिखाणावर जाणकारांचे लक्ष होते. ते जाणकार हक्कानं लिहिणा-याला सांगत होते. योग्य ते मार्गदर्शन करीत होते. तेव्हा कविता लिखाणाच्या कार्यशाळा घेण्यात येत होत्या. कथा लिखाणाच्या कार्यशाळा घेण्यात येत होत्या. ललित लिखाणावर चर्चा सत्र होत होते. तेव्हा लिखाणही तसंच दर्जेदार निपजत होतं. आता लिखाणावर जाणकारांचं लक्ष नाही. कारण आता लिहिणा-यांचा गुरू गुगल ॲप आहे. आणि गुगल नावाच्या दुकानात सारं काही उपलब्ध आहे. प्रत्यक्ष जाणकारांची आता गरज उरली नाही. लिहिणारे खूप झालेत पण दर्जा उरलेला नाही. सुमार लिखाणाची भर अधिक होत आहे. याची खंत वाटते. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. आणि जाणकारांनी प्रत्यक्ष कार्यशाळेवर भर दिला पाहिजे. असं मला वाटतं.
साहित्य लिहित असताना, वास्तविकतेचं भान ठेवलं पाहिजे. सत्य असत्याचा विचार केला पाहिजे. माझं लिखाण सर्वांना आवडलं पाहिजे, निव्वळ हा दृष्टिकोन समोर ठेवून लिखाण करु नये. कुणाला आवडो अथवा न आवडो आपलं लिखाण सडेतोड असावं. लिखाण करताना फक्त एवढीच दक्षता बाळगावी की, त्यात देशाच्या एकात्मतेला तडा जाणार नाही किंवा माणसा माणसांची मनं तडकणार नाहीत याची काळजी घ्यावी.तसेच आणखी एक मुद्दा आपणासमोर ठेवणार आहे तो हा की, माणसं माणसांपासून दुरावणार नाहीत, लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. माणसांत सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. विसंवाद नको. कोरोनाकाळाने माणसामाणसातील संवाद हिरावून घेतला होता. आता परिस्थिती आटोक्यात आली असं वाटत असतानाच ओमायक्राॅनच्या भीतीमुळे दहशतीचं सावट निर्माण झालं आहे. मृत्यू डोक्यावर टांगलेलाच आहे. माणसाच्या जगण्याचे काही खरे राहिले नाही. त्यासाठी कुणी कुणाशी वैरभाव ठेवू नये. माणसा माणसांत सुसंवादाचे सौंदर्य प्रस्थापित व्हावे, ही काळाचीच अपेक्षा आहे. त्यासाठी एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहिजे. उगाचच कुठल्यातरी संकल्पना उराशी बाळगून राहिल्याने गैरसमज निर्माण होतात. जाती धर्मांच्या संबंधाने तेढ निर्माण झाली की दंगली उफाळतात. माणूस माणसाच्या जीवावर उठतो. आजकालच्या निवडणूकाही याला कारणीभूत आहेत. एखाद्या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होतात. माणसंच माणसांना वाळीत टाकतात. हे घडू नये यासाठी आपण कवी, साहित्यिक म्हणून प्रयत्नरत राहिले पाहिजे. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. लोकांमध्ये एकोपा राहावा, गावांचा विकास करावा. गावखेड्यात शांतता व सुबत्ता नांदली तर साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीला बळकटी प्राप्त होईल.
बऱ्याच वेळा आपलं लिखाण अनेकांना पचत नाही. रुचत नाही. तरीही तमा न बाळगता लिहित रहावं. मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कविकट्टा या सत्रामध्ये कविता सादर करण्यासाठी सतत तीन वर्षे संयोजकाकडे मी कविता पाठविलो. तिन्ही वेळा माझ्या कविता रिजेक्ट करण्यात आल्या …तरीही मी उमेद न सोडता लिहित राहिलो. त्याचाच परिणाम आज दिसून येत आहे. मला या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करण्यात आलं. खरंच मी स्वतःला धन्य समजतो. सातत्यानं आपणही लिहित रहावं, एवढीच अपेक्षा या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी करतो.
- अनुरत्न वाघमारे, नांदेड.
अध्यक्ष, पहिले, जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
गोणार, ता. कंधार जि. नांदेड मो. 96736 43276