नांदेड, दि. 22 – डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या राहण्यासाठीची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी, यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्या दि. 23 रोजी होणार आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ. मोहनअण्णा हंबर्डे, सदस्य आ. बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. जयश्री पावडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
सुमारे 18.86 कोटी रुपये खर्च करून 200 मुलांचे सुसज्ज असे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृह उभारणीत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले असून त्यांच्याच शुभहस्ते हा भूमीपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
कोरोनाचे नियम पाळून आयोजित केलेल्या या भूमिपूजन सोहळ्यास निमंत्रितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे, डॉ. करुणा जमदाडे, कल्पना शिरपुरे, दिगंबर पवार, रोहिदास जाधव, डॉ. दि. भा. जोशी, कैलास धोत्रे, अब्दुल हबीब अ. लतिफ यांनी केले आहे.