कंधार तालुक्यातील साठवण तलाव जमिन भूसंपादनाचा धनादेश पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान ;गोगदरी ,कंधारवाडी व रामाचीवाडी गावाचा समावेश


नांदेड ;कंधार तालुक्यातील गोगदरी ,कंधारवाडी व रामाचीवाडी येथील साठवण तलाव जमिनीच्या भूसंपादन मावेजाचा ४ कोटी २५ लाखाचा धनादेश सोमवारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्याकडे प्रदान करण्यात आला आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी याबाबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.


जिल्ह्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी सिंचन तलाव तसेच काही ठिकाणी पाणी साठवणीसाठी साठवण तलाव बांधण्यात यावेत यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याचे फलित म्हणून नांदेड जिल्ह्यातील २१ तलावांना मंजुरी देण्यात आली होती यात नांदेड जिल्ह्यातील जाहूर, नांदा, श्रीगणवाडी, नंदनशिवणी, इब्राहिमपूर, कवाना, भोजूचीवाडी, कंधारेवाडी, पळसवाडी, गोगदरी, बाळांतवाडी, पाताळगंगा, फकीरदरावाडी, घोटका, दगडसावंगी, चोंढी, रमण्याचीवाडी, कदमाचीवाडी, येलदरी, रामाचीवाडी, वाघदरवाडी या ठिकाणांच्या साठवण तलावांचा समावेश आहे.


तलावासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केलेल्या त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठीही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत. कंधार तालुक्यातील गोगदरी ,कंधारवाडी व रामाचीवाडी येथील साठवण तलावासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केलेल्या त्यांना योग्य व त्वरित मोबदला मिळावा यासाठी कंधार तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष व गोगदरीचे माजी सरपंच व्यंकटराव पाटील कल्याणकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्फत शासनस्तरावर पाठपुरावा केला केला होता यास यश आले असून सोमवार दि. २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ४ कोटी २५ लाख ९० हजार मावेजा उपविभागीय अधिकारी मंडलिक यांच्याकडे प्रदान करण्यात आला यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,मनपा स्थायी समिती सभापती किशोर स्वामी ,जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर , काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे ,गोगदरीचे माजी सरपंच व्यंकटराव पाटील कल्याणकर, राजू यादव ,प्रशांत पाटील धानोरकर ,मोहन कल्याणकर ,बाळू कल्याणकर ,प्रदीप कल्याणकर ,माधव कल्याणकर ,साईनाथ कल्याणकर, सुरेश कल्याणकर,अशोक कल्याणकर, गणेश कल्याणकर ,भानुदास बोईनवाड आदींची उपस्थिती होती .


गोगदरी ,कंधारवाडी व रामाचीवाडी येथील साठवण तलावामुळे या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. गोगदरी ,कंधारवाडी व रामाचीवाडी येथील साठवण तलाव जमिनीच्या भूसंपादनाच्या मावेजाचा धनादेश मिळाल्याने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी ना चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *