आमची मऱ्हाटी……. एक रंजक बोलीभाषा

” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”
खरच आम्ही भाग्यवान आहोतच की, कारण आमच्या रक्तात, नसात, डोक्यात, मनात आणि संपूर्ण जीवनातच या मराठी भाषेने एक समृद्धता निर्माण केली आहे. बरं आमची ही मराठी नुसती मराठीच राहते अशी काही गोष्ट नाही तर ती कधी कुठे मऱ्हाटी होते तर काही भागात ती म्हराठी होते. मराठी भाषेचा साजच काही तरी न्यारा आहे. कारण दर बारा कोसाला या मायबोलीत अनेक बदल होतात.


पुण्यात, नाशिकमध्ये बोलली जाणारी शृंगारिक आणि औपचारिकतेला साज देणारी मराठी. तर विदर्भातील वैदर्भिय ‘हेल ‘असलेली मराठी अन एक वेगळाच ग्रामीण साज ल्यायलेली ‘मराठवाडी मऱ्हाटी ‘. बर या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मराठीचा साज फार च और आहे.


जेव्हा मी पहिल्यांदा या मायबोलीच्या सान्निध्यात आले तेव्हा सुरुवातीला तर मला फार मज्जा वाटायची पण कधी -कधी मी गोंधळूनही जायचे. रझाकारांचा भरपूर प्रभाव या भागावरती असल्यामुळे सहजच बोलण्यात ‘हमेशा ‘, ‘मजाक ‘हे तर शब्द अगदी सहजच रुळलेले दिसतात. नेहमी या शब्दाचाच जणू काही हमेशा हा समभाषीय समानार्थी शब्द असावा. (बर हे ऐकतांना बोलणाऱ्याचा निखळ सूर फार छान वाटतो. )अजून एक कोनच म्हणजे कोणता हा अर्थ निर्धोकपणे आम्हीच मांडू शकतो. बर या भाषेची गंमत एवढी भारी की जिथे हिंदीभाषेचा मातृभाषे सारखा वापर केला जातो, तिथेच काही शब्द पौराणिक, धार्मिक ग्रंथातील अगदी सर्रास वापरले जातात. जसे की -मंदिरा पाशी यातील पाशी म्हणजे जवळ जो शब्द आपल्याला पौराणिक ग्रंथात दिसून येईल. आज काही मला ‘निजावंच ‘वाटलं नाही, दुपारी यातील निज हा धातू ही तेवढा च जुना असून रूढ आहे. अशी ही गमतीदार आणि आश्चर्यकारक भाषा आहे.


बरं सीताफळ आणि खिचडी साठी आधीच आमच्या या गावचा बोलबाला. त्यात खिचडीसाठी तहारी हा अनोखा शब्दही इथेच ऐकावयास मिळतो. म्हणजे साठी म्हणतानि असा जो ग्रामीण बाज ऐकतो तेव्हा फारच छान वाटतं. वर -खाली या अव्ययांना आम्ही कंधारकर नेहमी वरे आणि खाले असेच म्हणणार.


अगदी जमिनीवर म्हणण्याऐवजी भुईसरी हा शब्द अगदी निसंकोच वापरतो. फडताळाला -फरताळ तर ओसरी ला वसरी. बर आम्हाला ताप कधीच येत नाही येत नसतो तर आम्हाला नेहमी तापच येते. घड्याळ ‘ते ‘नसतं तर ‘ती ‘घड्याळ असते. पेन कधीच तो तर ती पेनच असते. आम्ही ‘वण्टी भरत असतो. आम्हाला पाणी पिलो असंच म्हणायचं असतं. ‘कोहळा ‘या शुभफलदायी फळाला ‘कव्हाळ ‘असं म्हटलं तरच आम्हाला ते जास्त शुभफलदायी वाटतं. ‘अजकिन ‘म्हणजे अजून ही किंवा आजू बी (अजून सुद्धा ).


आपल्या सगळयांनाच माहिती आहे की, कंधार हे शहर ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध आहे. इथे असलेला भुईकोट किल्ला असो किंवा उत्खननामध्ये सापडलेली वास्तुशिल्पे, देवालये असो. त्याचप्रमाणे काय कंधार शहरातील जुन्या प्रचंड मोठया वाडयामध्ये दिसून येणारी वास्तू -कला व तिच्यासाठी वापरलेली शब्दे. अतिशय प्रशस्त अशा वाडयांमध्ये A/च लाही झुकवतील अशा ‘लादण्या ‘तसेच माडीवरील थोडासा मोकळा खांब असलेला भाग म्हणजे च ‘उघडखांबी ‘आणि तसेच माडीवरच्या भागाला संरक्षनासाठी उभारलेली छोटीशी भिंत अगदी एक -दोन फूट उंचीची तिला ‘मुंडनी ‘हा गोड शब्द वापरला जातो.


कशी भारी आणि न्यारी आहे ना !ही भाषा. आपल्या या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त एकच म्हणावेसे वाटते की, आमच्या या कंधारी शैलीत जो कोणी बोलत असेल त्याने कुठेही गेले तरी आपला हा बोलीभाषेचा अनोखा बाज आणि सौंदर्य कायम जपून ठेवावेच.
अशा या सर्वच मराठी भाषेतील बोलीभाषांना माझा माना चा मुजरा. कारण शेवटी एक वाटते,


माझ्या मराठीची
बोलू कौतुके
जी अमृतातेही
पैजा जिंके. “
धन्यवाद

              एक कंधारकार, 
              सौ. भाग्यश्री नरहरराव लालवंडीकर -जोशी. 
              ता. कंधार, जि. नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *