वर्धा शहरातील नवर गावामध्ये एका रत्नाचा जन्म झाला, तो दिवस होता 14 नोव्हेंबर 1947. कोळशाच्या खाणीत हिरा हा सापडत असतो असेच काहीसे या रत्नाच्या बाबतीत झाले. कारण ते एक स्त्री अर्भक होते त्यामुळे साहजिकच ते कोणालाही नकोच होते आणि म्हणून त्या निष्पाप जिवाच नामकरण करण्यात आलं’चिंधी ‘. पण कदाचित या चिंधी ने हे नावही सार्थ करण्याचं ठरवलं होतं कारण या चिंधी ने अनेक चिंध्याना प्रेमाने एकत्र गुंफून एक सुंदरशी ‘वाकळ ‘ बनवली. या चिंधीच लग्नानंतर नामकरण झालं सिंधुताई सपकाळ.
” म्हातारा इतुका नि अवघे
पाऊणशे वयमान”
या गाण्याप्रमाणे सिंधुताई अवघ्या नऊ वर्षांच्या आणि त्यांचे पती त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठे. वयामध्ये इतकी मोठी तफावत असूनही छोटीशी सिंधुताई पतिराज यांच्या घरात पडेल ते काम करत होती. खरं तर ती काबाडकष्ट करत होती. कष्टाने कंबरडे मोडणे म्हणावे इतपत किंवा त्याहीपेक्षा जास्त कष्ट ती लहान असूनही करत होती. वयाच्या 18 वर्षापर्यंत तिला तीन अपत्य झाली होती. पण खरा वनवास मात्र चौथ्या खेपेला आला. कारण आपली ही सिंधू बालपणापासूनच शिक्षणात हुशार होती पण तिला कसेबसे चोरून चौथ्या वर्गापर्यंत शिकता आले पण नंतर मात्र तिच्या शिक्षणावर किंवा साधा कागद वाचल्यावरही तिला मारझोड होत असे. पण मुळातच बुद्धिमान असलेल्या सिंधुताईंनी वनखात्याकडून शेणाच्या होणार्या लिलावाच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि त्याचे परिणाम अतिशय गंभीर झाले. एका नीच नराधमाने याचा वचपा काढण्यासाठी सिंधुताईच्या चारित्र्यावरच घाला घातला. अन मग काय पती देवांचा पुरुषार्थ आडवा आला आणि त्यांनी भरल्या दिवसाच्या सिंधुताईला प्रचंड मारझोड केली अगदी तिच्या पोटावर लाथा बुक्या मारल्या आणि मग अर्धमेल्या अवस्थेत तिला गाईच्या गोठ्यात नेऊन टाकले. त्यांना वाटलं आता ही काही जगणार नाही, पण त्या गोठ्यातच सिंधुताई मोकळी झाली अर्थातच तिला कन्यारत्न प्राप्त झाले. मग ती आईच्या घरी गेली पण आई ने ही तिला हाकलून लावले.
स्वतःला संपून घ्यावं असं काहीच सिंधुताई ला वाटत होतं पण आता स्वतःला संपवून फार अवघड होतं कारण कुशीत एक छोटसं बाळ जगण्याच्या आशा दाखवत होतं आणि म्हणतातच ना
संकट असलं गंभीर कितीही
बाळाचे ओझं आईला होत नसतं
अडचणींवर मात करत तेच तर मातृत्व असतं.
मग या पिल्लासाठी ही माय माऊली भीक मागू लागली. कधी उष्टावलेली फळे तर कधी कुणी वाढलेली भीक. ही भीक मागण्यासाठी त्या रेल्वे स्टेशनवर फिरायच्या आणि आपल्याला मिळालेल्या भीकेतून इतर भिकार्यांना एकत्रित गोळा करून सर्वांसोबत मिळून त्या गोपाल कृष्णा प्रमाणे गोपाल काला करून एकत्रित बसून खात असत. स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन न करता आपल्या परीने ही माय माता इतरांनाही मदत करत होती आणि मग जेव्हा ही आर्थिक बाबतीत स्वावलंबी झाली त्यावेळेस तिने मग अनेक अनाथ अपत्यांचं मातृत्व स्वीकारलं.
राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा अशा या राज्यात ही सिंधूताई जन्माला आल्यामुळे तिच्या अंगात आणि तसेच सोने हे नेहमीच घर्षणाने तावून-सुलाखून निघतं असते तशीच तावून सुलाखून निघालेली होती त्यामुळेच तर तिने मग हळूहळू अनाथांची माय होत होत त्यांच्यासाठी हक्काचे घर तयार केले त्यांना आधार दिला, शिक्षण दिले, नोकरी व्यवसाय मिळवून दिला आणि मुलींसाठी चांगला जोडीदारही पाहून दिला खरंच ही चिंधी आपल्यासारख्याच अनेक चिंध्यांना एकत्रित विणत होती. आणि या विने मधून एक सुंदर अशी मायेची वाकळ ती विणत होती.
घरातून हाकलून दिलेली आणि अनेक कलंक लावली गेलेली एक स्त्री आज इतरांचा आधार झाली होती इतरांना ती आपला आधारवड वाटत होती. ज्या नवऱ्याने तिला हाकलून दिलं होतं, ज्या गावांना तिला वेशीबाहेर टाकलं होतं त्याच गावात आज तिचा सत्कार होणार होता आणि त्यावेळेस तिच्याकडे तिचा हाच नवरा खूप लांबून आशाळभूत नजरेने पहात होता तेव्हा या माय माऊली ने त्याच्या विषयी मनात असलेला राग दूर सारून त्याच्या पाठीवरून देखील प्रेमाचा हात फिरवून जणूकाही त्याचीच माय ती झाली होती.कारण ” क्षमा हा सज्जनांचा सर्वश्रेष्ठ अलंकार असतो” त्यामुळेच कदाचित आपल्या पतीची ही माया झाली आणि तिने त्या निराधार वृद्धाला देखील आपले अपत्य म्हणून स्वीकारले.
आपण 14 नोव्हेंबर हा दिवस बालक दिन म्हणून साजरा करतो आणि योगायोग पहा याच दिवशी या मातीचा जन्म झाला आणि तिने अनेक बालकांना जीवनदान दिले खरंच माई तू तुझ्या कर्तृत्वाने अशीच अखंड आमच्या सोबत राहणार आहेस. माई तुला मानाचा मुजरा कारण तू प्रेरणा आहेस समस्त स्त्री जातीची. माई आज तुझ्या जाण्याने कवी यशवंत यांची एक कविता मनात सारखी रुंजी घालत आहे
आई कुणा म्हणू मी
आई घरी न दारी ही न्यूनता
सुखाची
चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगांचा
आई विना भिकारी.”
खरोखर आज ती सर्व पिल्ली खऱ्या अर्थाने अनाथ झाली. माई तुझ्या मध्येच आम्हाला देव दिसला,
” माई जगी आलीस माणूस म्हणून, जाताना गेलीस देव बनून.”
खरोखर माई तुला साश्रू नयनांनी श्रद्धांजली.
सौ. भाग्यश्री नरहरराव लालवंडीकर -जोशी, कंधार.