संत चोखामेळा हे यादव काळातील संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या संत मांदियाळीतील वारकरी संत होते.अभंगाद्वारे कीर्तनामधून त्यांनी समाजप्रबोधन केले.अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार आहे. म्हणूनच संत चोखामेळा यांचा अभंग’ जया एकादशीच्या’ निमित्ताने निरूपणा साठी घेतलेला आहे.
या अभंगातून बाह्य रूपाला महत्व न देता अंतरंगाला महत्व दिले गेले आहे. अंतरंगाचे महत्त्व जाणावे असा भावार्थ त्यांनी सांगितलेला आहे.
संत चोखोबांनी लिहिलेला समाज प्रबोधनपर हा वारकरी संप्रदायातील अभंग असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.कोणत्याही व्यक्तीचे बाह्यरूप न पाहता त्याचे अंतरंग पहावे.तोच अर्थ या अभंगात सांगितलेला आहे.
त्याकाळात ही वर्णव्यवस्था अस्तित्वात होती .समाजाची विभागणी चार वर्णात झाली होती.शेवटचा वर्ण शुद्र होता. त्यामुळे या वर्णाला सामाजिक दृष्ट्या कमी महत्त्व दिले जात होते, धार्मिक ठिकाणी जाण्यास त्यांना मज्जाव केला जात असे, समाजात या वर्णाची अवहेलना केली जात असे, तरी ही संत चोखोबांनी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन मुखाने विठ्ठलाचे भजन गात असत , विठ्ठलाकडे कोणताही भेदभाव नव्हता सर्वजण त्यांना समान होते ‘विठु माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा।त्यामुळेच असे म्हटले जात असे, वारकरी संप्रदायात उत्कृष्ट वाणीला, सत्याला आणि नामस्मरणाला अतिशय महत्त्व आहे. सगुण भक्ती करा ,किंवा निर्गुण भक्ती करा,पण ती निर्मळ मनाने केलेली असावी,वरवरची नसावी.ओठात एक आणि पोटात दुसरी अशी असू नये. जसे “मुॅह मे राम बगल मे छुरी,” म्हणतात,
संत चोखोबा त्यांच्या अभंगातून समाजाला उपदेश करताना म्हणतात,
‘ऊस डोंगा परी। रस नोहे डोंगा।।
काय भुललासी। वरलिया रंगा ।।१।।
असे सडेतोड पणे बोलतात.
शेतीमध्ये वाढलेला ऊस वाकडा तिकडा असतोच त्याचे बाह्य रूप विद्रूप असते, दिसायला तो काळा असतो. बाह्य रूपावरून त्याच्याकडे सुंदरता नसली तरीही त्याच्या अंतरंगात गोडवा,सुमधुर रस असतो त्या रसाला वाकडे तिकडेपणा अजिबात नसतो, बाह्यरूप न पाहता रसाची मधुरता चाखायची असते गोडवा अंत:करणात साठवायचा असतो. म्हणून संत चोखोबांनी या उदाहरणावरून अभंगाच्या माध्यमातून विठ्ठलासमोर हे उदाहरण ठेवतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ते म्हणतात.
कमान डोंगा परी। तीर नोहे डोंगा।
काय भुललासी। वरलिया रंगा।।२।।
कमानीने तीर मारावा लागतो.यावेळी कमानीकडे दुर्लक्ष करावे लागते. ती सरळ आहे की वाकडी यांची आवश्यकता नसते, कमान वाकडी आहे म्हणून ती फेकून देता येत नाही. तीराला अतिशय महत्त्व आहे, म्हणूनच संत चोखोबा म्हणतात. तुम्ही विद्रूप वाकडे या गोष्टीत लक्ष घालू नका, तुम्ही तीरावर लक्ष ठेवा, त्यामुळे तुम्हाला हवं ते गोष्टीचा छेद करता येईल ,जसे कोळशाच्या खाणीतील हिरा शोधा ,कोळश्याकडे दुर्लक्ष करा,असे समाजप्रबोधन पर दाखले ते देतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात ते म्हणतात .
नदी डोंगी परी । जल नोहे डोंगा।
काय भुललासी। वरलिया रंगा ।।३।।
कोणतीही नदी असो, ती कोणत्याही देशातून वहात जाऊन डोंगरदर्या पठारातून वळण घेते ,तरीही तिचे पाणी चांगलेच आहे, त्याला भेदभाव नाही ते निर्मळ वाहत आहे, जिकडे उतार आहे तिकडे जात असते,पाणी सर्वांची तहान भागवते, पाणी हे जीवन आहे, म्हणून आपण पाण्याशिवाय जगु शकत नाही.नदीच्या रूपावरून वाहत्या प्रवाहाला दोष देऊ नये तिच्या पाण्याचा उपयोग करून घेऊन सजीव सृष्टी फुलवावी नदीला दूषण देऊ नये,नदीच्या पाण्यामुळे सर्व काही ठीक आहे .असे मार्मिक उदाहरण देऊन समाज प्रबोधन करतात. अभंगाच्या शेवटच्या चरणात ते म्हणतात ,
चोखा डोंगा परी। भाव नाेहे डोंगा।।
काय भुललासी ।वरलिया रंगा।।४।। एखाद्या वेळेस मी खूप कुरूप दिसत असेल पण माझे रूप या ठिकाणी महत्त्वाचे नाही, माझा भाव महत्त्वाचा आहे. माझ्या अंतरंगात विठ्ठलाच्या प्रती भाव आहे मी शुद्र वर्णात जन्मलो असलो तरी शुद्ध भक्तीने तुझ्याजवळ येतो.वरील सर्व उदाहरणावरून संत चोखोबा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समाजाच्या दांभिकपणा बाहेर काढतात, सडेतोडपणाने बोलतात एक प्रकारे समाजाची ते कानच टोचत असतात. डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालतात, आपल्याला एवढे सांगावे वाटते की बाह्यरूपा पेक्षा अंतरंग महत्त्वाचे आहे .
रामायणामध्ये लंकेच्या रावणाची बहीण शूर्पणखा मोहिनीचे रुप घेऊन लक्ष्मणा समोर आली ते बाह्य रूप चांगले असले तरी ते भुलविण्यासाठीच होते,प्रत्यक्ष मन मात्र कपटी होते,म्हणून वरलिया रंगा भुलून जाऊ नये ,फसू नये. श्रीकृष्ण लहान असते वेळी दूध पाजविण्यासाठी पुतना मावशी अत्यंत सुंदर रंभेचे रूप घेऊन आली,तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने तिचे कपटी अंतरंग पाहून तिला यमसदनी धाडले.
म्हणूनच यासाठी वरलिया रंगा भुलून जाऊ नये, तसेच श्रीकृष्णाचे भविष्य सांगण्यासाठी मुद्दाम एक व्यक्ती आला पण जीव वाचवता वाचवता घायाळ झाला, आणि त्याचे फसवे रुप समाजासमोर उघडे झाले हे सर्व उदाहरणे संत चोखोबा महाराजांच्या अभंगाला एकरूप होतात म्हणूनच व्यक्ती कोणत्या जातीचे आहे हे कधीही पाहू नये.
त्यांचे कर्तुत्व पहावे व मानवतावादी जीवन जगावे हाच या अभंगाचा मतितार्थ आहे. मी भोळा आहे मी सरळ आहे. वरच्या अंगाबद्दल आपण बोललो तर गाभ्यातल्या मूळ तत्वांशी आपली भेट होणार नाही. संत चोखोबा हे प्रापंचिक गृहस्थ होते, विठ्ठलाच्या नामस्मरणात ते सदैव दंग असत, शिवाशिवीचा व अस्पृश्यतेच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता,म्हणूनच ते एका अभंगात म्हणतात,
हीन मज म्हनती देवा। कैसे घडो तुमची सेवा।। असा उपरोधिक प्रश्न ते देवाला विचारतात, म्हणून त्यांच्या अभंगातून भक्तीची व अध्यात्मिकतेची उंची फार मोठी दिसतेच पण उपेक्षेची खंतही त्यांना जाणवते, महाराष्ट्रातील असे एकच संत आहेत की ज्यांचे कुटुंब सर्व संतच आहेत, संत चोखोबाची पत्नी संत सोयराबाई, मुलगा संत कर्ममेळा, बहीण संत निर्मळा व मेहुणा संत बंका यांच्या ही अभंग रचना आहेत म्हणून संत चोखोबांच्या भक्तीची उंची फारच मोठी आहे,
जातीजातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी, समाजातील तेढ कमी व्हावे, सर्वधर्मसमभाव असावा, उपेक्षित बांधवाच्या उद्धाराची सतत त्यांना चिंता होती म्हणूनच ते म्हणतात,
काय भुललासी। वरलिया रंगा।। गावगाड्यातील गावाबाहेरची वेशीचे काम चालू असताना अंगावर भिंत पडून संत चोखोबाचा अंत झाला,तेव्हा संत नामदेवांनी त्यांच्या अस्थी गोळा करून पंढरपूरच्या देवळाच्या महाद्वारात आणल्या तिथेच त्यांची समाधी बांधली आहे.अशाप्रकारे संत चोखोबांनी समाजबांधवांना आपल्या अभंगातून भक्तीमार्गाचा, समानतेचा सहिष्णुतेचा संदेश दिला आहे .
शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड