अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
एकत्र शिक्षण घेतल्यावर, जवळीक निर्माण झाल्यावर, तीतून प्रेम उमलत गेल्यावर, एक दिवस एकमेकांपासून दूर जाण्याचा दिवस उजाडतो. त्यावेळी प्रेमनायकाच्या ओठावर जे शब्द येतात, त्या मनस्थितीचे भावनिक आणि ह्यदयस्पर्शी वर्णन आपल्या कवितेतून संजीवकुमार भोसले यांनी केले. कविता ऐकताच हशाही पिकला ,टाळ्यांचा कडकडाटही झाला आणि वन्स मोअरसाठी विद्यार्थीवर्गातून एकच गलका झाला. त्या ओळी अशा होत्या..
गेलीस तूं अन् काळीज फाटलं
जीवन पेटलं गं जीवन पेटलं.
होता गजबज तवा किती राणी
चिंब भिजवलं कितीदा पावसांनी.
निमित्त होते विज्ञान शिक्षक कवी शिवाजीराव नामपल्ले लिखित ” आधारवड “कविता संग्रहाचे प्रकाशन आणि त्यानंतरच्या निमंत्रीतांच्या कविसंमेलनाचे. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ पांडुरंगराव टोंपे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या सचिव तथा प्राचार्या शोभाताई गुंठे आणि सरपंच किशोर बापू मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण कथाकार तथा सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई विलासराव सिंदगीकर यांच्या शुभहस्ते आधारवडचे प्रकाशन करण्यात आले. गझलकार प्रा डॉ मुकूंद राजपंखे यांनी नवप्रकाशित कविता संग्रहावर भाष्य केले.
प्रकाशन सोहळ्यानंतर प्रसिद्ध कवी आणि उत्तम निवेदक राजेसाहेब कदम यांच्या सुत्रसंचालनात आणि डॉ राजपंखे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीतांचे कविसंमेलन पार पडले. यात विलास सिंदगीकर , बालाजी मुंडे, अनिल चवळे, राजेंद्र कांबळे, सुभाष साबळे, एन डी राठोड, अंकुश सिंदगीकर, संजीवकुमार भोसले, प्राचार्य तुकाराम हरगिले, श्रुती नामपल्ले आणि भगवान आमलापुरे सहभागी होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ पांडुरंग टोंपे, किशोर बापू मुंडे आणि विलास सिंदगीकर यांनी मनोगत व्यक्त करुन नामपल्ले सरांना शुभेच्छा दिल्या.
भाष्य करतांनाच डॉ राजपंखे यांनी त्यांच्या गुरुंचा, आबा वाघमारे यांचा संदर्भ नमुद करत विद्यार्थ्यांची नस ओळखली आणि नाडी पकडली. त्यामुळे विद्यार्थी आणि उपस्थित श्रोत्यांची मरगळ दूर झाली. आणि प्रत्यक्ष कविसंमेलनापुर्वीच हास्याचे कारंजे उडाले. तो संदर्भ, ती कविता असी होती.
एक होती मुंगी
तीने घातली लुंगी.
एक होता मुंगळा
तो होता………!
आधारवड प्रकाशनाच्या नेटक्या आणि छानशा सोहळ्यानंतर श्रोत्यांत आलेली मरगळ आपल्या विनोदी पण सहज – सुंदर कवितेनं दूर केली ती जेष्ठ साहित्यिक एन डी राठोड यांनी. प्रत्येक जण आणि कवी पण स्वाभिमानी असतो. त्यास ठेच पोहचली तर, अन्याय झाला तर त्यास वाचा फोडण्यासाठी तो लिखाण करतो. हे सुचवणारी ती रचना येणेप्रमाणे आहे.
एकदा सहज गाढवांच्या आले मनात
त्यांनी साहित्य संमेलन घेतले रानात.
पहिला ठराव धुमधडाक्यात पास झाला
आनंदाच्या भरात एकमेकांना लताप्रहार केला.
गाढवाला गुळाची चव ,ठाऊक काय ?
ही मानवी म्हण, आम्हाला खपणार नाय.
बिंधास्त बालाजी मुंडे यांनी ज्या कवितेनं त्यांना सबंध महाराष्ट्रभर ओळख करून दिली, ती कविता सादर केली. स्त्रि – भ्रुणहत्येवर आधारित असणारी आणि संयत विद्रोह पोसणारी ” टाहो ” नावाची कविता असी होती.
खूप झाले देवा त्या पातक्यांचे लाड
छळणारे हात आम्हाला खुब्यातून काढ.
वाढू द्यायचे असेल तरच गर्भाशयात धाढ.
जमतंय का ते बघ…….!
नाही तर आंदोलन छेडावं लागेल,
गर्भाशयात डोकावणारा एक एक डोळा फोडावं लागेल.
पश्चिम महाराष्ट्रात, वारणेच्या खोऱ्यात दुष्काळ पडला होता.
म्हातारी माणसे भाकर – भाकर म्हणून पाय खोरत होती तर लहान मुले भाकर – भाकर म्हणून रडत होती. तेंव्हा मठ लुटून ,धान्य वाटुन गावोगावच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न विर राणोजीने केला. त्या विराच्या स्मरणार्थ प्राचार्य तुकाराम हरगिले सर ” फकिरा ” या कवितेत म्हणाले ,
गावासाठी बलिदान देणाऱ्या,
विर नागोजीचा सुपुत्र तूं.
माफियागिरी, साठेबाजी करणाऱ्याचा
कर्दनकाळ तूं…….!
माळवाडीच्या मटकऱ्याचा मट लुटलास तूं
धान्याची गंगा,
उपाशी माणसाच्या दारात
घेऊन गेलास तूं.
लाडकी लेक माहेरी सुखा – समाधानात असते. हलकीशी कामे केली नाही केली तरी चालतात. पण सासरी मात्र कामातून सुट नसते. ती तिथे काम करत असते. ते तिला करावे लागते. हे सांगणारी कविता अहमदपूर – शाहीर सुभाष साबळे यांनी गायली. ते गीत असे होते.
माळरान निंदता येईना
काळीज तिचे बोलते गं.
लाडाची लेक सासरी
सडा – सारवण करते गं.
ग्रामीण कथाकार तथा सदस्य ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई विलास सिंदगीकर यांनी ” पाऊसकाळ ” ही कविता म्हटली. ती पण रचना भाव खाऊन गेली. ती कविता असी होती.
पाऊस मिरग सरीने
निघून जातो पाऊसकाळ.
जीवनाची भाषा लिहतो
शेती नांगराचा फाळ.
कवी संमेलनाचा वेळ वाढत चालला होता. सुत्रसंचालक राजेसाहेब कदम यांनी सुचना केली की प्रस्तावना न करता थेट कविता सादर करावी.वाढता वेळ जवळ येणारी संध्याकाळ आणि राजेसाहेबांची सुचना शिरसावंद्य मानून भगवान आमलापुरे यांनी प्रस्तावना न करताच कवी नामपल्ले सरांसाठी एक चारोळी म्हटली. जणू काही तीतून कवितेची एक व्याख्या सांगितली. ती रचना असी होती.
शिवाजीराव नामपल्ले असोत
की असोत शिरीष पै.
कविता म्हणजे असते,
मुझे कुछ कहेना है.
साधारणपणे गत १५ वर्षात सबंध महाराष्ट्रासह इतर आठ राज्यात साडेआठशेंपेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केलेलें आणि अहमदपूरची ओळख असणारे कवी आणि निवेदक राजेसाहेब कदम आपल्या गझलेत म्हणाले,
” दगडापरी मुक्याने बसतात लोक आता
आतून बोलण्याला हसतात लोक आता.
कोणी कसेही वागो, सोडून दे तू,’ राजा’
नापीक वावराला, कसतात लोक आता.”
अध्यक्षीय समारोपात गझलकार प्रा डॉ मुकूंद राजपंखे यांनी बाँलिवुडच्या अँन्टी हिरोवर चित्रीत झालेल्या एका गाण्यास प्रतिसाद म्हणून जी कविता लिहिली. तीच्या ०४ ओळी उद्रक्त केल्या. त्या ०४ ओळी अशा प्रकारच्या होत्या.
मला वाटले जे तुलाही कळू दे
तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे.
असो मी नसो मी मला खंत नाही
सुखाच्या घरी तूं मला आढळू दे.
सुखाच्या घरी
रंगत गेलेल्या या कविसंमेलनाची सांगता गझलकार प्रा डॉ मुकूंद राजपंखे सरांच्या " घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, " या गझल गायनाने झाली. चांगले वागणे अत्यावश्यक आहे. हा संदेश देणाऱ्या शेवटच्या दोन ओळी अशा होत्या.
लोक येतील धावूनी शब्दावरी
वागणे आपुले चांगले पाहिजे.
प्रा भगवान आमलापुरे.
फुलवळ : ९६८९०३१३२८
द्वारे शं गु महाविद्यालय,
धर्मापुरी.ता परळी वै.