फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
फुलवळ सारख्या ग्रामीण भागातून इंडियन नेव्हीत चार मुलं दाखल होणं आणि गावाचं नाव रोशन करणं म्हणजे कौतुकास्पद बाब नक्कीच आहे याचा संबंध फुलवळवासीयांना सार्थ अभिमान आहे. इंडिअन नेव्ही बरोबरच अन्य क्षेत्रात ही येथील मुलांनी राज्यच नव्हे तर देशाबाहेर नोकऱ्या मिळवून फुलवळ चा लौकिक वाढवला आहे. त्यामुळेच तर फुलवळ चा झेंडा अटकेपार गेला म्हणले तर वावगे ठरणार नाही.
फुलवळ येथील सूरज रामराव होणराव हा इंडियन नेव्हीत दाखल झालेला पहिला फुलवळ भूमिपुत्र ठरला तेंव्हा पासून येथील विद्यार्थ्यांत नेव्ही बद्दल आकर्षण वाढले आणि जिद्दीने पेटून उठलेल्या मुलांनी सर्वतोपरी तयारी करत इंडियन नेव्हीच्या परीक्षा द्यायला सुरुवात केल्या. त्यानंतर दुसऱ्यांदा येथीलच विक्की शिवदास होणराव ची आर्मीत निवड झाली , तिसऱ्यांदा गुंडप्पा बसवेश्वर मंगनाळे नेव्हीत लागला तर नुकतेच साईनाथ संजय मंगनाळे याचे इंडियन नेव्हीत सलेक्शन झाले आहे.
तसे पाहता या चौघांचीही अपार मेहनत फळाली आली म्हणले तर चुकीचे ठरणार नाही. कारण लहानपणीच वडिलांचे छत्र गमावून बसलेल्या सूरज होणराव ने आईच्या प्रेरणेने व स्वतः च्या बळावर हे क्षेत्र निवडत स्वतः चे अस्तित्व निर्माण केले. विक्की होणराव ची घरची परिस्थिती तशी चांगली पण वडील आर्मीत असल्याने त्याला नेहमीच वाडीलांसारखं देश सेवेची ओढ मनात होती. त्यानुसार त्याने कष्ट घेत इंडियन नेव्हीचा मार्ग निवडला आणि त्यात तो यशस्वी झाला.
गुंडप्पा मंगनाळे चा विचार करता तो शेतकरी कुटुंबातला , घरची परिस्थिती बेताची पण बुद्धी मात्र खूपच चाणाक्ष , हुशार आणि मेहनत घेण्याची त्याची नेहमीची तयारी त्याला यशोशिखरावर गाठण्यापासून रोखू शकली नाही. गुंडप्पा ची नेव्हीत निवड झाली , त्याने ओडीसा येथे आपले बेसिक प्रशिक्षण पूर्ण करून मुंबई येथे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करत कालच फुलवळ या मायभूमीत त्याचे आगमन झाले. तर साईनाथ मंगनाळे चा विचार करता मन हेलावून जात , ते यासाठी की अगदी लहान वयातच वडिलांचं छत्र गमावून बसलेल्या साईनाथ ला आईने कसेबसे शिक्षणाचे धडे दिले खरे परंतु त्याच भविष्य पाहण्यापूर्वीच अल्पशा आजाराने आईचाही मृत्यू झाला. अशा हालकीच्या परिस्थितीत ही साईनाथ ने जिद्द सोडली नाही किंवा खचून गेला नाही. त्याने इंडियन नेव्हीची परीक्षा दिली आणि त्यात तो यशस्वी झाला. नुकतेच याच फेब्रुवारी महिन्यात तो ओडीसा येथे बेसिक प्रशिक्षणासाठी दाखल झाला आहे. या चौघांचाही फुलवळकरांना सार्थ अभिमान वाटतो.
याबरोबरच येथीलच रुपेश रविकांत कुलकर्णी हे प्रोडक्शन इंजिनिअरिंग ची पदवी पूर्ण करून जर्मनी येथे नोकरी करत असून अंकुश इरवंतराव शेंबाळे हे बी फॉर्मशी ची पदवी संपादन करून कॅनडा येथे नोकरी करत आहेत. अशी अजूनही काही उदाहरणे नक्कीच पाहायला मिळतात , त्यामुळेच म्हणावेसे वाटते विविध क्षेत्रात नक्कीच फुलवळकरांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अटकेपार झेंडा रोवला आहे. त्यामुळेच या व अशा अनेक तरुण जिद्दी आणि यशस्वी मुलांचा आम्हा गावकऱ्यांना सार्थ अभिमान असल्याच्या भावना येथील नागरिक , पालक व मित्रपरिवार कडून ऐकायला मिळत आहेत.