विद्रोही तरी पण विद्यार्थीप्रीय अण्णा : पांडुरंग आमलापुरे.


आमचे बंधू श्री पांडुरंगराव कि आमलापुरे आज दि २८ फेब्रु २२ रोजी श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय मोटरगा ता मुखेड, व्हाया देगलूर येथून ३४ वर्षे ०७ महिन्याच्या सेवेनंतर सहशिक्षक पदावरून नियत वयोमानानुसार आज दि २८ फेब्रु २२ सेवानिवृत्त होत आहेत. fप्रथमतः अण्णा आणि सौ वहिनीला सेवानिवृत्त आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! त्यांचे उर्वरीत आयुष्य म्हणजे दुसरी इनिंग सुखाची आणि समाधानाची जावो. ही एक सदिच्छा !


लेखाच्या प्रारंभीच एका गोष्टीचा उल्लेख करणं मी माझे क्रतव्य समजतो. ते म्हणजे आजचे सत्कारमुर्ती पांडुरंगराव कि आमलापुरे हे माझे वडील भाऊ असल्याने हा लेख एकांगी म्हणजे फक्त गौरवपर होण्याची शक्यता जास्त आहे. त्याबद्दल मी सुरुवातीलाच तुम्हा सुजाण वाचकांची माफी मागतो.
पांडुरंगराव आमलापुरे यांचा जन्म दि २६ फेब्रु १९६४ रोजी कंधारेवाडी येथे झाला. माध्यमिक शिक्षण श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ येथे झाले. श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळच्या गुणवत्ता यादीत त्यांनी महत्अभ्यासाने स्वतःचे नाव कोरलेले आहे. शाळेने आजही शाळेनं आपुलकीने जपलेले त्यांचे नाव पाहिले की त्यांच्या शालेय अभ्यासाचा आणि गुणवत्तेचा प्रत्यय येतो. किंबहुना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ,या म्हणीचा प्रत्यय त्यांनी आणून दिला.

श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय मोटरगा येथे दि ०१ जुलै १९८७ रुजू होऊन त्यांनी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले ते कायमचेच !
पण कदाचित ती गुणवत्ता आज त्यांच्याकडे नसेलही. ते साहजिक पण आहे. कारण आमचे प्राचार्य डॉ टी एल होळंबे सर नेहमीच मला म्हणतात, काय आमलापुरे सर, ” आपणा सर्वाचीच length of service वाढत आहे आणि depth of knowledge दिवसेंदिवस खुडत आहे.


मुळात आजच्या सेवानिवृत्ती निमित्ताने निरोपाचा कार्यक्रम आहे. निरोप म्हटले की सुख – दुख आलेच. केलेल्या कामाविषयी क्रतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.उद्यापासून म्हणजे दि ०१ मार्च २२ पासून गत ३४ वर्षापासून त्यांनी जे सेवार्वती भावनेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले आहे, ते थांबणार आहे. कदाचित ती त्यांच्या शरिराची गरजही असेल.
पण ज्या शाळेने आणि गावाने त्यांना आणि त्यांनी ज्या शाळेला आणि गावाला लळा लावलाय त्या शाळेपासून आणि गावापासून थोडा अंतरच पडणार आहे. कटू प्रसंग विसरून आणि चांगल्या आठवणी जाग्या करून त्या शिदोरीसारख्या सोबत घेऊन जाण्याचा हा दिवस आहे. सार्वजनिक जीवनातून खाजगी आयुष्यात पुन्हा एकदा प्रवेश आहे. कामाचा लेखाजोखा मांडण्याचा दिवस आहे. विशेष म्हणजे शाळा दुरावल्याचे दु : ख सहन करत आनंदाने खाजगी आयुष्यात, दुसऱ्या इनिंगमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. थोडे वेगळ्या पद्धतीने मांडायचे झाले तर हा ट्रँक बदलतांना थोडा खडखडाट तर होणारंच आहे, पण ०५ – ०४ दिवसात पुन्हा सर्व काही पुर्वपदावर येईल. तेव्हा, be positive असणे गरजेचे आहे.


साहित्य आणि थोडे अलंकारिक भाषेत सांगायचे झाल्यास अण्णा तसे थोडे बंडखोर आणि विद्रोही स्वभावाचे धनी. पण भांडखोर नव्हे. त्याची प्रचिती त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणात आणि जीवनात आली होती. त्याचे दोन कारणे सांगता येतील. एक म्हणजे त्यांचे कौटुंबिक बंड आणि दुसरे म्हणजे त्यांच्या मित्रांनी आणि त्यांनी थेट ,” मातोश्रीवर ” धडक मारली आणि कंधारमध्ये आणलेली शिवसेना होय. ही दोन प्रातिनिधीक उदाहरणं पुरेशी आहेत. एका अर्थाने त्यांचे नवतरुण मित्र त्यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बाबूराव भानुदासराव केंद्रे साहेब, कंधार पंचायत समितीचे माजी सभापती कालिदास गंगावरे साहेब ,बाबुराव मारोतीराव कंधारे सर, भगवानराव माधवराव कंधारे सर, मैनुद्दीन मौलासाब शेख सर ,यादवराव चिवडे,नरसिंह पल्लेवाड सर, श्रीमान रामदास डुबूकवाड आणि ते स्वतः ,” मन्याड खोऱ्यातील ओपनर शिवसैनिक “, म्हणजे शिवसेनेचे ओपनिंग बँटसमन आहेत.

एक नाव प्रकर्षानं आठवतंय ते म्हणजे पेठवडजचे श्रद्धेय मोहन कारभारी सर.
हाच विद्रोह त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा अधुनमधून दिसून येत होता.कदाचित यामुळेच त्यांची अधुनमधून संस्थे अंतर्गत बदली व्हायची. आणि जेंव्हा जेंव्हा ती व्हायची तेंव्हा तेंव्हा विद्यार्थी शाळा बंद करायचे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आमलापुरे सरची ही बदली रद्द करा ! असी मागणी करायचे. हा पण प्रसंग एक दोन वेळा नव्हे तर माझ्या माहिती प्रमाणे तीन चार वेळा उदभवला होता.या बंडखोर आणि विद्रोही स्वभावाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात ते स्वतः बेजार झाले पण माघार घेतली, असे आठवतही नाही आणि ऐकिवातही नाही.पण मुळात ती बदलीच का व्हायची ? हे माझ्यासाठी आजही न उलगडलेले एक कोडेच आहे.


आणखी एक गोष्ट म्हणजे एक शिक्षक म्हणून सुरुवातीची सलग १० – १२ वर्षे त्यांची खोली तत्कालीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं एक हक्काचे व्यासपीठ होते. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास खोली जणू , ” Reading Room ” होती. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. शिवाय खोली परिचयाच्या बेरोजगार युवकांसाठी एक मार्गदर्शन केंद्र होतं. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांनी कित्येक बेरोजगारांना मार्गदर्शन करून त्यांचे समाधान केले आहे. काही विद्यार्थ्यांना तन – मन – धनाने मदतही केली आहे.


अण्णांचा विषय इंग्रजी , ( Third Language ). ते इयत्ता आठवी, नववी आणि कधी कधी १० वीच्या विद्यार्थ्यांना पण शब्दार्थ विचारायचे.ते विचारण्यामागे सहज – सरळ कारण म्हणजे शब्द साठा वाढला म्हणजे आपोआपच विषय समजण्यासाठी मदत होईल. ही त्यांची रास्त भुमिका. पण कधी कधी न आलेल्या शब्दार्थाच्या बदल्यात हातावर खाव्या लागलेल्या छडीमुळे, ” छडी लागे छम – छम, विद्या येई घम – घम , ” हे शालेय शिक्षणाचे तत्कालीन ब्रीद तात्पुरते विसरून जायचं. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांची प्रतिमा बाजीगर मधील शहारूख खानसारखी, ” Anti Hero “, उमटायची. या घटनेचा आणि गोष्टीचा इतरांसारखा मी पण प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.


काय माणूस हाईस रं बाप्पा ! कुठं एक माती सोडत नाहीस, कुठं एक लगन सोडत नाहीस.काही नाही काही नाही कुठं पुण्यतिथीला बीड इतकं लांब यायला हे काय मरणबी नव्हतं आन् तोरणबी नव्हतं, पांडुरंग. थोडं करणं आपल्यासठी आन् लय करणं दुसऱ्यासठी, उगं बाप्पा. आमच्या मातोश्री पार्वतीबाई कि आमलापुरेचं हे म्हणणं म्हणजे अण्णाला किती माणसांची आवड आहे आणि माणुसकीची किती तहहयात चाड आहे.हेच दाखवून देते. दुसरे काय ?


तब्बल ,” बिस साल बाद ” नव्हे तर उलटपक्षी , ‘बिस साल पहिले ‘ देगलूर ते फुलवळ व्हाया मोटरगा एक वास्तविक विनोद ऐकन्यात आला. गुरुवर्य आनंदराव गायकवाड सर : बघा पोरांनो, बाबू दारकुकडे ! तो अभ्यास करून डॉ झाला आहे.त्याचा आदर्श घ्या जरासा ! तुम्ही पण मनापासून अभ्यास करा आणि काही तरी बनून दाखवा. आई – वडीलांच्या कष्टाचे चीज करा.त्यावर एक विद्यार्थी म्हणाला,’ सर, एक विद्यार्थी यशस्वी झाल्याने एवढं सांगालावं.बाकी बरेच जण गावातंच आहेत.कदाचित या प्रतिप्रश्नाने दस्तुरखुद्द आनंदराव गायकवाड सर पण निरुत्तर झाले असतील. पण चांगल्यास चांगले म्हणणे आणि त्यातून इतरांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे. हा सरांचा हेतू अगदी प्रामाणिक होता. हे पण एक पुर्णतः खरे आहे.


एक गोष्ट अत्यंत चांगली आहे. ती म्हणजे अण्णाचे आरोग्य ! खरे म्हणजे अण्णा डाँक्टरांचे नव्हे तर कंडाक्टरांचे मित्र. पण ते तब्बेत सांभाळण्यात यशस्वी झाले आहेत. उलटपक्षी मला काही डॉ मित्र असुनही ती सांभाळण्यात मी अयशस्वी झालो आहे. आता यापुढे ती जरा जास्त सांभाळावी लागणार आहे. त्याची दोन कारणे असू शकतात. एक गोष्ट म्हणजे उतार वय जवळ येत आहे. दुसरे म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. या न्यायाने सांभाळल्याने सांभाळ होतो. आधी सांभाळले पाहिजे.

  • Last but not least , उद्या सकाळी सकाळी म्हणजे दि ०१ मार्च २२ रोजी, आज काय करावे ? हा नैसर्गिक प्रश्न त्यांना पडू शकतो. या प्रश्नांची दोन उत्तरं असू शकतात. एक गोष्ट म्हणजे गावाकडे म्हणजे फुलवळला येऊन शेतीबाडीत रमणे. पण हे उत्तर म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर ! असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शेतीबाडीत अंगमेहनत करण्याची क्षमता आणि सवय दोन्ही पण त्यांना राहिली नाही आहे. दोन इंद्रनील सोबत राहणे हे होय.

घरासोबतंच इंद्रनीलमध्ये या प्रश्नाचे प्रभावी आणि सकारात्मक उत्तर सापडू शकते. कारण वयोमानाचा विचार करता, ” Child is the father of man ” असेही इंग्लिश कवी विल्यम ब्लेक यांनी म्हणून ठेवले आहे.
परत एकदा सुखी, समाधानी, आणि सकारात्मक सेवानिवृत्त आयुष्यासाठी तुम्हाला आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.


प्रा भगवान कि आमलापुरे.
फुलवळ : ९६८९०३१३२८
द्वारे शं गु महाविद्यालय, धर्मापुरी.
ता परळी वै. ४३१५१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *