नांदेड, दि. ५ एप्रिल २०२२:
बियाणी यांना श्रद्धांजली अर्पण करताना ना. चव्हाण म्हणाले की, नांदेडच्या बांधकाम क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. शहराच्या सर्वच भागात निवासी व व्यावसायिक संकुले उभी करून त्यांनी अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले व अनेक बेरोजगारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली. आपल्या बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी असंख्य स्थानिकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. त्यांनी बांधलेल्या अनेक वास्तुंमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे.
अवघ्या आठवड्याभरापूर्वी सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून उभारलेल्या एका संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी संजय बियाणी यांची भेट व चर्चा झाली होती. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अधिकाधिक काम करण्याची इच्छा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. मात्र, सामाजिक भान जपणाऱ्या अशा या उमद्या व्यावसायिकाची हत्या दुःखद असून, सामाजिक क्षेत्रातील एक तरूण सहकारी अकाली गमावल्याचे दुःख पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
मारेकऱ्यांचा तातडीने शोध घ्या, प्रशासनाला आदेश
दरम्यान, संजय बियाणींच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्याचा सूचना ना. अशोकराव चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या घटनेनंतर त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी विस्तृत चर्चा केली व आवश्यक ते निर्देश दिले.