नांदेड जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) पदाची जबाबदारी डॉ. अश्विनी जगताप या समर्थपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्र दिनाचे पथसंचलनही त्यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टपणे पार पडले. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आज झालेल्या महिला आयोगाच्या बैठकीत बोलतांना त्यांनी पोलीस विभागातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक हळवा पदर उलगडून दाखविला. “पोलीस अधिकारी-कर्मचारी म्हणून वेळोवेळी बजवावे लागणारे कर्तव्य आणि भावनिक गुंतागुंत यात आम्ही नेहमी समतोलपणा ठेवतो. कालचीच गोष्ट. माझी सहकारी हिला लहान मुलगा आहे.
सायंकाळी तो खेळतांना पडला. त्याचा हात फॅक्चर झाला. तिने कर्तव्याला प्राधान्य देऊन नंतर मुलाच्या व कौटूंबिक जबाबदारीला स्वत:ला सिद्ध केले. माझ्या अनेक सहकारी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांना लहान मुले आहेत. यातील भावनिक गुंतागुंत बाजुला सारून आम्ही सर्व सदैव कर्तव्याला तत्पर असतो, असे सांगतांना डॉ. अश्विनी जगताप यांच्या पापण्या ओलावल्या.” स्वत:ला सावरत त्यांनी आम्ही संवेदनशील असलो तरी कमजोर नाहीत हे सांगायला कमी केले नाही.