क
पावसाळ्याच्या सुरवातीला अनेक कीटकांची गर्दी रानावनात दिसते,पण मृगाचा किडा या सर्वांहून पूर्णपणे वेगळा दिसतो . हा किडा शेतीसाठी खूप उपयुक्त आहे,तो शेतजमीनीला हानिकारक,उपद्रवी कीटकांचा फडशा पाडतो.यामुळे जमिन , पिके, पेरणीनंतर आलेल्या कोंबांचे रक्षण होते.जमिनीसाठी उपयुक्त बुरशी,कवके,जीवाणूंजवळ मृग किडा राहतो . वाळवी, छोटे कोळी,नाकतोडे हे मृग किड्याचे प्रमुख खाद्य आहे.शेतातील एप्रिल,मे मधील जोरदार वळिवानंतर ते हळूहळू जमिनीबाहेर येतात.अन्यवेळी ते जमिनीखाली असतात. विशेष म्हणजे,पावसाळ्याच्या सुरवातीलाच दर्शन देणारा हा किडा वर्षभर अजिबात दिसत नाही.आमच्या भागात जास्त प्रमाणात आढळणारा किटक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.त्यांचे दर्शन फक्त साधारण पहाटे , सायंकाळी चार ते सहा वेळेतच तो शेतात दिसतो.रोहिणी किंवा मृगापासून पाऊस धुवांधार कोसळू लागला, म्हणजे ते पुन्हा जमिनीखाली जातात.त्यांचे शरीर मलमल व मऊशार असते.हाताने स्पर्श केल्यास वारंवार स्पर्श करावा असे वाटते.
लालभडक रंगांमुळे लक्ष वेधून घेतात.
हातात घेतल्यानंतर ते ( पैसा)नाण्याप्रमाणे स्वतःला गुंडाळून घेतात.मृत झाल्याचे भासवितात.आकार पाच ते सहा मिलीमीटर असतो. शरीराखाली आठ पाय असल्याने त्या अष्टपाद किटक वर्गात मोडत असून कोळ्याप्रमाणे तोंड असते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पाठीवरील सूक्ष्म तंतुंमुळे मृग किड्याला परिसराचे अचूक ज्ञान होते.हे तंतू संवेदकांप्रमाणे काम करतात.लालभडक रंगांमुळे अन्य छोटे जीव कीटक मृग किड्यांवर हल्ला करत नाहीत.हा जीव निसर्गाची देणगीच वाटते.
मृग कीटकांची काव्यरूप वर्णन
माझ्या प्रिय वाचकांसाठीच!
तुझे लालचुटूक शरीर,
माझ्या मनाला भावते!
तुझ्या कोमल स्पर्शाने,
मलमलची याद येते!
तुला पाहताच पेरणीची,
बळीराजास स्फूर्ती येते!
मृगाचा पाऊस पडतांना,
मशागतीचे चिजच होते!
म्हणे तू कृषकांचा मित्र,
अंकुराचे जतनच होते!
तुझ्या दर्शनाने आम्हाला,
पाऊसाची चाहूल लागते!
तुझे अस्तित्व चित्रातच,
फक्त हा धोका संभवते!
निसर्गचा अद्भुत नजराना,
जतन व्हावे असेच वाटते!
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार
9860809931