नांदेड – क्रीडाक्षेत्रात भरारी घेतांना सामाजिक संघटनांबरोबर अनेक दानशूर लोकांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे मला हा पल्ला गाठता आला असला तरी माझ्या यशात व व्यक्तिमत्व विकासात डॉक्टरांचे सुध्दा खूप मोठे योगदान आहे अशी भावना आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिने व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ नंदीग्राम नांदेड च्यावतीने येथील सेंटरपॉर्इंट मधील शुभ फिजिओथेरपी आणि रिहाबिलेटेशन सेंटर येथे ऑलंम्पिक दिनाच्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ती बोलत होती.
यावेळी डॉ.करुणा पाटील, डॉ.शुभांगी पतंगे, डॉ.शुभांगी पाटील, डॉ.फसिहा अजीज, डॉ.पुष्पा गायकवाड, डॉ.पुनम शेंदारकर, डॉ.सारिका झुंझारे, डॉ.मनिषा मुंडे, डॉ.भावना भगत, डॉ.मंगल नरवाडे, डॉ.ज्योती पत्रे, डॉ.रेखा गरुडकर, डॉ.सुनंदा देवणे, डॉ.दिपाली पालिवाल, डॉ.स्मीता गंदेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना भाग्यश्री जाधव म्हणाली की, जागतिक पातळीवर मला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. हे मी माझे अहोभाग्य समजते. मी ग्रामीण भागातील खेळाडू असूनसुध्दा मला अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. दानशूर लोक आणि सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी मला आर्थिक मदत केली. क्रीडाक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीपासून साधारणपणे 12 वर्षांपासून प्रसिध्द डॉ.साहेबराव मोरे, डॉ.आशिष बाभूळकर, डॉ.राजेश अंबुलगेकर, डॉ.अनिल पाटील, डॉ.सौ.सुजाता पाटील, डॉ.अनंत सूर्यवंशी, डॉ.अशोक बोनगुलवार, डॉ.सुनिल वझरकर, डॉ.शुभांगी पाटील, डॉ.नितीन जोशी, डॉ.कल्याणकर आदी मान्यवर मला निशुल्क आरोग्यसेवा सातत्याने देत आहेत. या मान्यवरांनी माझा आत्मविश्वास वाढविला. त्याच बरोबर या सर्वांचे माझ्या व्यक्तिमत्व विकासात खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही अशी कृतज्ञता भाग्यश्री जाधव हिने व्यक्त केली.
यावेळी भाग्यश्री जाधव हिचा मान्यवर महिला डॉक्टरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.प्रवण भोसले, डॉ.विजया गोरे, डॉ.वर्षा गोरे, डॉ.स्नेहा अंबोरे, डॉ.स्वाती सोनटक्के, संगीता शिंदे, हनुमंत वाघ, जयशीला सरोदे, प्राणज्योती कांबळे, कैलास भगत आदींनी परिश्रम घेतले.