कंधार (प्रतिनिधी)
शेतकऱ्याने शेतात महागडी खते, बी- बियाणांवर मोठा खर्च करत, पेरणी केली होती. यात कापूस, मूग, हळद पिकासोबत सोयाबीन ऊस अन्य पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. यानंतर पावसाच्या हलक्या सरी येत, ढगाळ वातावरणामुळे बियाणे उगवले. परंतु नंतर पाऊस तसा कमीच होत गेला आणि गेल्या पाच दिवसापासून लोहा कंधार तालुक्यासह जिल्हाभरात संततधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. या सततच्या पावसाने शेतातील पीक पाण्याखाली गेले. पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटली असून, व काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस पडला. त्यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले असुन तातडीने पिकांचे पंचनामे
करावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
भाजपचे राज्य प्रवक्ते यांनी दि १३ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कंधार लोहा तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन व कपासीवर गोगलगायीचा प्रादुर्भावामुळे कापुस व सोयाबीन हे पिक अनेक ठिकाणी नष्ट झाले आहे. त्यातच संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचेही मोठे नुकसान झाले असल्याने बळिराजा आसमानी संकटात सापडला आहे. सदरील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.