जुलैच्या आठवड्यात समाधान कारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. बिज अंकुरत असताना आठवडाभरापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत , कळमनुरी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच नांदेड जिल्हयातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहुर भागातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे खरीप पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहेत. नैसर्गिक व अस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्णपणे कोलमडुन पडला आहे. तेव्हा प्रशासनाने निष्काळजीपणा न करता प्रत्यक्ष गावात आणि शेतीच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कामाला लागावे असे देखील खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह तहसिलदार, बिडीओ, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, मंडळअधिकारी, तलाठी यांना सुचना केल्या आहेत. आठवडाभरानंतर देखील पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. पुरात अकडुन पडलेल्या नागरीकांना सुरक्षितस्थळी पोहचवणे, त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करणे या सोबतच शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना संबंधित अधिकारी यांनी कामात कुठल्याही प्रकारचा निष्काळजी पणा करु नये शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव त्यांच्या सोबत होता कामा नये असे देखील खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना ठणकावले आहे.