फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
गेली दोन वर्षे कोविड १९ म्हणजेच कोरोनाच्या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता आता कुठे दैनंदिन जीवनाची घडी सुधारत पटरिवर येताना पाहायला मिळत होती. उन्हाळ्यात जीवाची लाही लाही सहन करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा खरिपाच्या पेरणी ला सज्ज झाला असतानाच यंदा पाऊसच उशिरा झाल्यामुळे पेरणी ला विलंब झाला , ता.७ जून ला जरी मृग नक्षत्र प्रारंभ झाले असले तरी पेरण्या मात्र जवळपास ता.१५ - २० जून च्या नंतरच सुरू झाल्या. पिकांचा मोड बालवयातच असतांना फुलवळसह कंधार तालुक्यात यंदा पावसाने चांगलाच कहर घातला असल्याने अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून काही महसूल मंडळाची त्यात नोंदही झाल्याचे कळते तरीपण निसर्गाने केली अतिवृष्टी , प्रशासनाकडून का होतेय वक्रदृष्टी ? असा सवाल पुढे येत असून अतिपावसाने खरिपातील पिके झाली मातीमोल , पण प्रशासनाकडून ना पंचनामे ना सहानुभूतीचे बोल.. अशीच चर्चा शेतकरी व जणमाणसातून ऐकायला मिळत आहे.
गेले काही दिवसांपासून चालू असलेल्या सतंतधार पावसामुळे छोट्या मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ओढे , नाले , नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून फुलवळसह कंधार तालुक्यातील सर्वच भागात खरिपातील कापूस , सोयाबीन , ज्वारी , मूग , उडीद , तूर , तसेच हळद ही पिके आता हातची जातांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत असून बालवयातच अति पावसामुळे तग सोडलेली पिके पुन्हा कसा जीव धरतील या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत असलेली प्रतिक्रिया म्हणजे मातीमोल झाला शेतशिवार तरीपण शासन व प्रशासन काही देईना आधार.
शेतशिवारांचे पंचनामे करून शासन व प्रशासन शेतकऱ्यांना आधार देईल अशी आशा होती परंतु आजपर्यंत तरी तसे काही दिसून येत नसल्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे तर शेती पिकांबरोबरच दैनंदिन मानवी जनजीवन ही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते आहे.
यंदा कापूस , सोयाबीन चा वाढला पेरा पण निसर्गाच्या प्रकोपाणे आता सहन होत नाही पावसाचा मारा. जलसाठे झाले तुडुंब पण उभ्या पिकांचा होतोय सर्वनाश त्यामुळे शासन व प्रशासनाकडूनच मदतीची उरलीय आस , अशीच परिस्थिती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.