काही स्वर कानावर पडले की माझ्यातील लेखिका थुइथुइ नाचायला लागते कारण शब्द मला त्यांच्यात अडकवतात तेच माझे मित्र होतात तेच मला लिहायला भाग पाडतात ..
असाच प्रेमळ संवाद कानावर आला , तो तिला अर्थातच प्रेमाने म्हणाला, तु माझ्या आयुष्यात येणार हे माहीत असतं तर मी जन्मच घेतला नसता.. खरं तर वरकरणी दिसायला सोपे वाक्य आहे.. पण त्यात प्रियकर नक्की काय म्हणत असेल याचा मी विचार करु लागले…
प्रेमाची उत्कटता त्यातील आविर्भाव त्याची व्यक्त होण्याची पध्दत आणि प्रेमात असताना तिने केलेले हट्ट पुरवण्यासाठी त्याची चाललेली धडपड असेल.. तिने तिला हवं ते ऑर्डर करायचं आणि उरलेलं प्रेमाने दिलेलं प्रेमाचं समजुन संपवायचं अगदी भलं मोठं पोट वाढलेलं असतानाही आणि ते सुख मला अनुभवायला जेव्हा मिळतं तेव्हा माझ्या शब्दाना अजूनच धार येते.. कारण ते १०० नंबरी सोन्याइतकं पवित्र असतं..
कुठेही बसल्यावर तिचे पाय त्याच्या पायावर असणं आणि त्याने ते दाबुन द्यावेत ही तिची प्रेमळ खट्याळ इच्छा मनाला स्पर्शुन जाते..
मुरलेल्या लोणच्यात ताज्या कैरीच्या चार फोडी टाकाव्यात आणि त्या फोडी दाताखाली आल्यावर येणारे आंबट शहारे सुध्दा मन चिंब चिंब भिजवतात..
पावसात भिजणारे शब्द जड होतात आणि प्रेमात भिजताना तेच अलगद प्राजक्त होवुन तरंगतात..हाच फरक त्या प्रेमात दिसतो..
अवतीभवती सतत प्रेम आणि प्रेम दिसत असताना मग त्या भुट्ट्यातही दोघांच्या दाताचे ठसे दिसतात आणि माझ्यातील लेखिका चोरी पकडते.. त्या भुट्ट्याला काय वाटत असेल ना प्रेमळ दाताखाली जाताना जरा कल्पना करुन पहा आणि त्या कॉफीच्या मधुर घोटाला?????..
कॉफीतील शेवटचा घोट जास्त मधुर वाटतो कारण तो दोघांच्या प्रेमाचा साक्षीदार असतो.. पहिल्या घोटापासुन सुरु झालेला प्रवास आणि तिची भुणभुण कोणाला त्रासदायक तर कोणाला प्रेमळ वाटेल पण मला कायमच आल्हाददायक वाटते कारण तिथे मी त्रयस्थ असते..
बायकोवर मेहुणी फ्री अशी ऑफर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील रेषानी आसमंतात डुंबायला सुरुवात केली आणि माझ्या शब्दानी त्याच्यावर आरूढ व्हायला..
प्रेमाचे अनुभवलेले काही तरल भाव मांडताना मला कायम आनंद होतो आणि तुम्हा वाचकाना देताना त्यात कायमच मी स्वतः तुमच्या स्वाधीन होते.. माझ्यावर लेखिका सखी म्हणुन करत असलेल्या प्रेमाची ही शब्दथाळी खास तुमच्यासाठी…
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री