फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
गेले काही दिवसांत कंधार तालुक्यात झालेल्या सतंतधार पावसामुळे छोट्या मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली पण शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून फुलवळसह कंधार तालुक्यातील सर्वच भागात खरिपातील कापूस , सोयाबीन , ज्वारी , मूग , उडीद , तूर , तसेच हळद ही पिके आता हातची जातांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत असतांनाच जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिलेल्या आदेशानुसार कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ता. १५ जुलै रोजी नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात संदर्भात आदेश काढून मंडळ निहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून तसे परिपत्रक ही काढले परंतु आद्यपतरी कोणता अधिकारी किंवा कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बांधावर आलाच नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाला संबंधितांनी केराची टोपलीच दाखवली का ? असा सवाल निर्माण झाला असून या निष्क्रियतेबद्दल शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
शेतशिवारांचे पंचनामे करून शासन व प्रशासन शेतकऱ्यांना आधार देईल अशी आशा असतांना वरिष्ठांचे आदेश असूनही आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब कोण विचारणार असा सवालही सामान्य माणसाला पडला आहे.
शेतकरी चिंतेत अडकला आहे तर शेती पिकांबरोबरच दैनंदिन मानवी जनजीवन ही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते आहे , यंदा कापूस , सोयाबीन चा पेरा वाढला असला तरी निसर्गाच्या प्रकोपामुळे पीक होत्याचे झाले. असे असतांना अतिवृष्टी ग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत असे जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केले असल्यावरून कंधार तहसीलदार यांनीही कंधार तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागांचे पंचनामे करण्यासाठी आदेश काढला त्यात खालील मंडळाचा समावेश आहे.
कंधार , कुरुळा , फुलवळ , बारुळ , पेठवडज , उस्माननगर , दिग्रस बु आदी सात महसूल मंडळातील गावांत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा असा आदेश तहसीलदार यांनी काढून तब्बल पंधरा दिवस झाले परंतु आद्यपतरी फुलवळ महसूल मंडळात नेमून दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी कोणीही प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यासाठी आलेच नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाला कोलदांडा दाखवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.