शिरुर अनंतपाळ –
शासनाची किंवा कोणत्याही संस्थेची आर्थिक मदत न घेता केवळ लोकसहभागातून शिरूर अनंतपाळ येथे अनेक साहित्य संमेलने, प्रकाशन सोहळे, परिसंवाद घेवून साहित्यिक चळवळ उभी करणारे ” काशीनाथ पांडुरंग फुलारी ” उर्फ के. पी. गुरुजी यांचे आज वयाच्या 84 वर्षी दुःखद निधन झाले. अनेक विद्यार्थी घडवणारे के पी गुरूजी अजातशत्रू होते…. ते गावात संमेलनाच्या मदतीसाठी लोकांकडे जायचे म्हणायचं, ” आता माझं काही खरं नाही. मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. माझी शेवटची इच्छा आहे आता एक संमेलन शिरूर अनंतपाळ येथे घेवूयात ” मग लोक पण उत्स्फूर्तपणे मदत करायचे…. गुरूजी संमेलने घेवू लागले अन मॄत्यूला हुलकावणी देवू लागले पण शेवटी आज मृत्यूने त्यांना गाठलेच…
संमेलन अध्यक्ष भास्कर चंदनशिव असो का प्रल्हाद लुलेकर अध्यक्षीय भाषणात काय काय बोलले याची महिनोंमहिने ते चर्चा करीत असत. त्यांच्या आग्रहाखातर शिरूर अनंतपाळ सारख्या आडवळनाच्या गावात डॉ भगवान कौठेकर, शैला लोहिया, लक्ष्मीकांत तांबोळी, डॉ श्रीपाल सबनीस, प्रभाकर कानडखेडकर, ललिता गादगे, फ म शहाजिंदे, विनय अपसिंगेकर, वृषाली किन्हाळकर, नागोराव कुंभार पासून डॉ. पृथ्वीराज तौर, योगीराज माने, चंद्रशेखर मलाकमपट्टे, महेश मोरे, दिगंबर कदम, धनंजय गुडसुरकर, राम तरटे पर्यंत अनेकांनी हजेरी लावली…. संगीतकार दशरथ पुजारी यांच्या शिष्या आनंदी विकास यांना ते मुलगी मानत. केवळ त्यांच्या आग्रहाखातर आनंदीने एका संमेलनात “गाणी ऋतुवेल्हाळ” हा कार्यक्रम सादर केला. मग अश्या कार्यक्रमाची चर्चा के. पी. गुरूजी गावभर करायचे…. के. पी. गुरुजींचा फोन नंबर मोबाईलवर दिसला की मला खात्री व्ह्यायची आता ते म्हणतील अमूख तमूख साहित्यिकांना तुम्ही बोला हो देवीदासराव म्हणजे ते आमच्या कडून कमी मानधन घेतील…. अन व्हायचे पण तसेच…. पण आजचा फोन मात्र वेगळा होता. मला वाटलं आता काहीतरी साहित्यिक उपक्रमाचे काम सांगणार…. पण आजचा फोन त्यांच्याच निधनाची बातमी देणारा होता….
….भावपूर्ण आदरांजली काशिनाथकाका
देविदास फुलारी,साहित्यिक ,नांदेड