ज्येष्ठ कवी व गायक बाबाराव नागोजी सोनकांबळे यांना समाज प्रबोधन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

लोहा,(प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिले जाणारे फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने विविध पुरस्कार जाहीर करण्यात आली असून लोहा येथील सेवानिवृत्त शिक्षक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी व गायक बाबाराव नागोजी सोनकांबळे यांना सामाजिक कार्यातील उत्कृष्ट कार्याची नोंद घेऊन समाज प्रबोधन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सेवानिवृत्त शिक्षक बाबाराव नागोजी सोनकांबळे यांची २७ जुलै १९७३ रोजी प्रथम नेमणूक जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी ता.जि.नांदेड येथून अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली. त्यानंतर हदगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये त्यांनी कार्य केले यानंतर लोहा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.३३वर्ष कार्य करत असतांना त्यांनी आंबेडकरी चळवळीवर २००० गीते लिहिली.

याशिवाय साक्षरता अभियान, तंटामुक्त अभियान यावर गीते लिहून स्वतः खेड्यापाड्यातून गायली.लोहा न्यायालयात त्यांनी पॅनल जज म्हणून उत्कृष्ट कार्य १८ वर्षे केले.ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न,अन्याय,अत्याचार यावर आवाज उठवून दलितांना न्याय देण्यासाठी त्यांनी २४ जुलै १९८४ रोजी वाजेगाव ता.जि. नांदेड येथून पत्नीच्या नावावर साप्ताहिक *ग्रामीण दलित चौकशी* या वर्तमानपत्राची सुरुवात केली.

स्वतः त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले.तब्बल २२ वर्षे त्यांनी हे वृत्तपत्र चालविले.सामाजिक, शैक्षणिक,तंटामुक्त अभियान यांसह त्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, अंध्यत्व निर्मूलन,नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, पल्स पोलिओ यात हिरीरीने भाग घेऊन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.

बाबाराव सोनकांबळे गुरुजी यांच्या वरील सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेकडून समाप्रबोधन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून संमेलनाचे मुख्य संयोजक अशोक मल्हारे, सल्लागार एन.डि.गवळे,सहसंयोजक प्रभाकर ढवळे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ.सा.द. सोनसळे, संयोजन समितीचे अध्यक्ष मारोती कदम, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, सचिव नारायण अंबुरे, सहसचिव नागोराव डोंगरे यांनी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली.

सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते कुसुम सभागृह नांदेड येथे २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता संमेलनास प्रारंभ होणार असून या संमेलनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *