नांदेड ;जागतिक स्तरावर आपली छाप पाडणारे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. निमित्त होते नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यातील भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे दिव्यांगा सोबत घेण्यात आलेल्या स्नेहभोजनाचे.
आर आर मालपाणी मूकबधिर व मतिमंद विद्यालय मगनपुरा नांदेड येथे सेवा पंधरवडा निमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप ठाकूर यांच्या मोबाईलच्या लॉक स्क्रीनवर मोदींसोबत दिलीप ठाकूर यांचा असलेला फोटो एका मूकबधिर विद्यार्थ्यांने पाहिला. त्याने लगेच आपल्या सर्व मित्रांना इशाऱ्याने जवळ बोलविले. पंतप्रधानांसोबत चा फोटो आवडल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. पंतप्रधानांसोबत आपली भेट घडवून आणावी असा हट्ट त्यांनी दिलीप ठाकूर यांच्याकडे केला. मतिमंद मुलांनी देखील मोदींना ओळखले यावरून मोदींचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले असल्याची प्रतिक्रिया वस्तीगृह अधीक्षक रमेश शिंदे यांनी व्यक्त केली. दिलीप ठाकूर यांच्या मातोश्री कै. वनमाला गोपालसिंग ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेहभोजनाला सुरुवात करण्यात आली. दिलीप ठाकूर व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी आपल्या हाताने सर्व विद्यार्थ्यांना भोजन वाढले. गेल्या 30 वर्षापासून वेगवेगळ्या निमित्ताने मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत दिलीप ठाकूर हे स्नेहभोजनाचे आयोजन करत असल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.