मा निषाद प्रतिष्ठां त्वंगमः शाश्वतीः समाः। यत्क्रौंचमिथुनादेकं वधीः काममोहितमः ।। क्रौंच पक्षाची कामक्रिडा चालू असताना एका पारध्याने जोडीतील नराचा वध केल्यानंतर वरील ओळीतून निषेध दर्शविणारे व जगप्रसिद्ध रामायण काव्याचे रचियते आद्यमहाकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा शरद पोर्णीमा हा जन्मदिवस. आज देशात विविध भागात त्याची जयंती साजरी होत असताना त्यांच्या किर्ती काव्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा लेख प्रपंच. व्यक्तीची इच्छा शक्ती त्याच्या सोबत असेल तर तो कोणतेही काम सहजरित्या करू शकतो.मानसाची इच्छाशक्ती व संकल्प त्याला रंकाचा राजा बनवू शकते. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महर्षी वाल्मिकी ऋषी, केवळ ज्ञानाचा अंधःकार, लुटमार कित्येक खून ज्याच्या नावावर आहेत असे व्यक्ती जगप्रसिद्ध महाकाव्य लिहू शकतात हे अविश्वसनीय वाटण्यासारखे असले तरी ते जगाने मान्य केले आहे.
महर्षी वाल्मिकी यांचा जीवन परिचय:-
महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा जन्म शरद पोर्णीमेला झाला. संपूर्ण भारतवर्षामध्ये आज ही शरद पोर्णीमेेला वेगवेगळ्या पध्दतीने त्यांची जयंती साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी ऋषीनी रामायणाच्या उत्तरकांडात आपल्या जन्माबदल सांगितले आहे की, प्रचेत यांचे ते दहावे पुत्र आहेत. तसेच रामायणात तमसा नदीच्या तीरावर त्यांचे आश्रम असल्याचे वर्णन आलेले आहे. रामाने सितेचा त्याग केल्यावर तिचा व तिच्या पुत्राचा वाल्मिकी ऋषीने सांभाळ केला.कुश व लव यांना युद्ध शिक्षण दिले. रामाच्या अश्वमेध यज्ञात त्यांना उपस्थित केले. असा उल्लेख महाभारतात येतो.
महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जन्माबदल दंतकथा:- महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जन्माबदल अनेक मतभेद असल्याचे दिसून येते. स्कंद पुराणानुसार त्यांचा जन्म एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तर काही ठिकाणी त्यांचा जन्म आदिवासी कोळी समाजात झाल्याचे सांगितले जाते. कर्नाटक सरकारने यांच्या जन्मजातीचा शोध घेण्यासाठी 14 सदस्यांची समिती स्थापन केली होती परंतू या सदस्यांचे वाल्मिकी ऋषी यांच्या जन्मजातीविषयी एकमत झाले नाही.
दंतकथा खालील प्रमाणे 1) एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा ब्राह्मण दुष्काळ पडल्याने डकैत झाला.(सदरील बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे.कारण एक जबाबदार ब्राम्हण, येथे डकैत झालेला आहे.) 2) एक दंतकथा अशी की, सुमिती नावाच्या ब्राम्हणांचा तो पुत्र असून त्याचे आईवडील त्याला एका किराताजवळ ठेऊन तपश्चर्येला निघून गेल्यावर तो ब्राह्मण्य विसरून लूटमारीचा धंदा.करू लागला. (या ठिकाणी ब्राम्हण,ब्राम्हण्य विसरला आहे ) त्याचे नाव वाल्या पडले व सर्व लोक त्याला वाल्या कोळी म्हणू लागले.(नाव वाल्या कसे पडले,आणि लोक एका ब्राम्हणाला वाल्या कोळी का म्हणाले हे समजलं नाही ) 3) कणु नावाचा एक ब्राह्मण अनेक वर्ष तप करीत होता. एके दिवशी त्याला पत्नीची आठवण होऊन त्याचे वीर्यस्खलन झाले. ते एका वानरीने गिळले. तिला पुत्र झाला. महर्षीच्या प्रसादाने त्याला ब्राह्मण्य लाभून तो वाल्मिकी या नावाने प्रसिद्ध झाला. 4) वाल्या हा षिक्षित नाविक होता. तो ब्राह्मण नव्हता, एकदा तो क्रौंच पक्षाच्या जोडीला पहात होता ही जोडी मैथूनक्रिडेत व्यस्त असताना एका पारध्याने क्रौंच नराचा वध केला. ती मादी विलाप करू लागली. हेे नाविकाला सहन झाले नाही. त्याने पारध्याचा निषेध केला. तेथेच त्याला ज्ञान प्राप्त होऊन रामायण हे महाकाव्य लिहीले. अशा प्रकारे महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जन्माविषयी वेगवेगळे संदिग्ध मत व्यक्त करण्यात आले आहे.तरी पण सर्वसामान्य पणे वाल्मिकी ऋषी यांचा जन्म कोळी समाजातच झाला हे सर्वश्रुत आहे.
महाकाव्य लिहीण्याची प्रेरणाः- रामनामाचा जप मंत्र झाल्यावर त्यांना सिद्धी प्राप्त झाली. एकदा तमसा नदीच्या तीरावर दोन क्रौंच पक्षी मैथूनासक्त असताना जोडीतील नराचा एका पारध्याने वध केला. तो नर मारला जातो. व क्रौंच पक्षीणी विलाप करू लागते.तिच्या करूण विलापाने वाल्मिकी ऋषीचे मन हेलावून जाते. त्या पारध्या विषयी स्वयंस्फूर्त निषेधाचे शब्द तोंडून बाहेर पडतात. मा निषाद प्रतिष्ठां त्वंगमः शाश्वतीः समाः। यत्क्रौंचमिथुनादेकं वधीः काममोहितम् ।। या ओठातून बाहेर पडलेल्या अकल्पित रचनेने महर्षी वाल्मिकी ऋषी स्वतःच भारावून गेले.पुढे ब्रम्हदेवाने त्यांना आशीर्वाद देऊन रामायण रचण्याचा आदेश दिला. एका महाकाव्याची निर्मिती झाली. ज्या व्यक्तीला राम म्हणता येत नव्हते.अशा व्यक्तींकडून चोवीस हजार ओव्यांचा अर्थपूर्ण,प्रतिभा संपन्न अशा महाकाव्याची निर्मिती होणे म्हणजे ती ईश्वराची लिला असावी. हे मान्य करणे उचित ठरते.
महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जीवन गाथाः- एका जंगलात वाल्या नावाचा दरोडेखोर राहत होता.लहानपणी त्यांचे नाव रत्नाकर असे होते. जंगलातून जाणाÚया प्रवाशांची वाट अडवायची, त्यांना लूटायचं, वेळप्रसंगी त्यांचा खून करायचा आणि लुटलेल्या संपत्तीवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवायचा. असे सांगितले जाते की, वाल्याने एका प्रवाशाला लूटायचं त्याचा खून करायचा व एक खडा एका रांजणात टाकायचा अशा प्रकारे त्यांने सात रांजण भरले होते. ( एवढे खून त्याने केले ) एकंदरीत खुप लोकांचा खून त्यांने केला होता. एवढे झालेले खून पाहून ईश्वराच्या मनात भिती निर्माण झाली,की पृथ्वीवर निरापराध लोकांचा नाहक जीव जात असेल तर मानवजातीचे काय होणार? या चिंतेत देवाधिश असताना, या लूटमारीतून निरापराध लोकांचा जीव वाचवण्यासाठी व वाल्याचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी नारदमुनीनां प्रवाशाच्या रूपात त्या जंगलात पाठविले. ठरल्याप्रमाणे नारदमुनी त्या जंगलातून जात असता वाल्याकोळ्यांने त्याला अडवले. ”तूझ्या जवळ काय असेल ते दे “ वाल्या म्हणाला नारदमुनी घाबरले व आपल्याकडे काहीच नसल्याचे सांगितले.तेव्हा वाल्या त्यांचा वध करण्याची भाषा करू लागला.नारदमुनी म्हणाले ” तू जे काही करतो आहेस ते कुणासाठी करत आहेस“ ”माझा चरितार्थ चालवण्या साठी मी हे करीत आहे “ वाल्या म्हणाला ”पण हे पाप आहे.आणि हे करीत असलेल्या पापाच्या वाट्याात तूझ्या घरचे सहभागी होतील का ? “ नारदमुनी म्हणाले. ” हो नक्कीच ते माझ्या पापात सहभागी होतील“ वाल्या तेव्हा नारदमुनी त्याला म्हणाले ”एकदा त्यांना विचारून ये“ येथून पळून जाण्याचा नारदांचा उद्देश असावा असे वाल्याला वाटले. त्याने नारदमुनीनां जवळच्या झाडाला बांधून घरी जातो. आणि मी करीत असलेल्या पापाचे वाटेकरी होणार का? अशी विचारणा करतो. (खरे तर इथेच वाल्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते.) हातात धारधार फरशी, डोळ्यात अंगार, बलदंड शरीराचा महाकाय पती, कित्येक खून त्याने केले. आणि क्षणात कुणाचाही खून करू शकतो. असा दरोडेखोर आपल्या समोर उभा असताना. कसल्याही प्रकारची भिती मनात न बाळगता वाल्याची पत्नी अगदी स्पष्ट पणे बोलून जाते.”आपण करीत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही.घरातील एक कर्तबगार प्रमुख आहात. तुम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करता याच्याशी आमचा संबंध नाही. त्या मुळे तुम्ही केलेल्या पापाचे आम्ही हिस्सेदार होऊ शकत नाही“ हे ऐकून एवढा मोठा दरोडेखोर निस्तब्ध होतो.हातातील फरशी गळून पडते.खुप मोठा पश्चात्ताप होऊन त्याच्या ‘ स्व ’ ची जाणीव होते. धावत पळत वाल्या जंगलात येतो. नारदमुनींचे पाय धरतो आणि धायमोकलून रडू लागतो.तो नारदांची सुटका करतो. केलेल्या अपराधा पासून मुक्तता मिळवण्यासाठी उपदेश करावा अशी विनंती करतो. त्या वेळी नारदमुनी त्याला राम जपाचा मंत्र देतात. पण वाल्याला त्या वेळी राम राम असे म्हणता येत नव्हते.तेव्हा नारदमुनी त्याला मरा मरा चा जप देतात. त्यातून राम राम असा उच्चार निघतो.नारदमुनी तेथून मार्गस्थ होतात. वाल्या तेथेच जंगलात रामनामाचा जप करू लागतो. तो राम जपात इतका मग्न होतो की त्याच्या भोवती वारूळ तयार होते. कित्येक वर्षांनंतर नारदमुनी तेथून जात असताना त्यांना वारूळातून राम राम असा आवाज येतो. नारदमुनी तेथे जातात व वारूळ दुर सारतात.वाल्याचा वारूळातून पुनर्जन्म होतो. म्हणून त्यांचे नाव वाल्मिकी असे ठेवले जाते.(वाल्मिकी हे नाव कसे पडले या बदल एकमत नाही) नारदमुनी त्यांच्या आयुष्यात आले. संवाद साधला, पापपुण्य, आपले परके याची जाणीव करून दिली. मनपरिवर्तन झाले. आणि एका जगप्रसिद्ध महाकाव्याचे आद्यमहाकवी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला.ते सर्व परिचित झाले. अशी महर्षी वाल्मिकी ऋषी संदर्भात आख्यायिका असल्याचे जवळपास सर्वांनाच माहित आहे. पण या निमित्ताने काही बाबी समोर येतात. की, नारदमुनी त्यांच्या आयुष्यात आले. पापपुण्य विचारलं ‘स्व’ ची जाणिव करून दिली वगैरे वगैरे आपल्या भारतीय संस्कृतीत आज ही हे सांगितलं जातं की, प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या पाठीमागे एका स्त्री चा हात आहे. उदा. रामाला कौशल्येने घडवलं, छ. शिवाजी महाराजांना, राजमाता जिजाऊ ने घडवलं़, मा. फुलें सोबत सावित्रीबाई फुले यांचा त्याग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे माता रमाईंचा त्याग महत्वाचा आहे. मग आई असेल,पत्नी असेल, किंवा इतर कुणी ही स्त्री असेल. याला इतिहास साक्ष आहे. महर्षी वाल्मिकी ऋषी यांची दुसरी बाजू अक्राळविक्राळ रूप धारण केलेला. कोणत्याही क्षणी आपल्या हातातील फरशी ने एका घावात धडापासून शीर वेगळे करणारा आपला पती विचारतो.” मी केलेल्या पापात तू वाटेकरी होणार का? “ तेवढ्यााच निडरपणे अगदी स्पष्ट शब्दात पत्नी नकार देते. खरे तर त्याच्या आयुष्यात इथे कलाटणी मिळते.असे माझे वैयक्तिक मत आहे. एवढया भयंकर दरोडेखोराला घाबरून त्याच्या पत्नीने होकार दिला असता तर…तर त्याचा उत्साह आणखी बळवला असता.आनंदद्विगुणीत झाला असता नारदमुनींचा खून झाला असता. आणि तो आणखी सात रांजण भरतील एवढे नव्हे तर पृथ्वीवरील संपूर्ण मानव जात नष्ट केला असता. पण पत्नीच्या स्पष्ट बोलण्यामुळे तिच्या नकारामुळे त्याच्या आयुष्यात परिवर्तन झाले हे निश्चित. म्हणूनच तो वाल्याचा वाल्मिकी झाला. महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जातः- सर्व सामान्यपणे बÚ्याच वेळा आपल्यासमोर प्रश्न पडतो.तो म्हणजे म.वाल्मिकी ऋषी यांची जात कोणती? ते कुणा जातीचे होते. या प्रश्नावर अनेक मतमतांतरे असल्याचे दिसून येते.पण ते नेमके कुणा जातीचे आहेत या बदल ठोस पुरावा आढळून येत नाही. तरी पण अनेक प्रश्न निर्माण होतात. मध्यप्रदेशातील भिल्ल जमातीने, वाल्मिकी ऋषी हे भिल्ल जमातीचे असल्याचा दावा करतात. तर कर्नाटक सरकारने महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जात निश्चित करण्यासाठी चौदा सदस्यांची समिती स्थापन केली. के. एस नारायणाचार्य यांच्या ‘वाल्मिकी यारू’ या पुस्तकावर वाद सुरू होता. कोर्टाने तो वाद मिटवला. ‘महर्षी वाल्मिकी ’ या ग्रंथामध्ये सुधाकर शुक्ल या लेखकाने वाल्मिकी ऋषी हे ब्राम्हण समाजातील असून, एक भिल्लीनी गावात भिक मागत असताना एक मूल पळविले ते मुल म्हणजे वाल्मिकी ऋषी असा हक्क दाखवतात. सुधाकर शुक्ल या महाशयाने लिहीले की, केवळ भिल्ल समाजात बालपण गेल्या मुळे ब्राह्मण पुत्र रत्नाकरला तेथील आदिवासी संस्कार पडल्याने तो दरोडेखोर बनला, पण पुढे त्या जंगलातून काही ब्राम्हण जात असताना त्याची भेट झाली व त्याला त्याच्या ‘स्व’ ची जाणीव करून दिली. त्यातूनच ‘रामायण’ या महाकाव्याची निर्मिती झाली. असे आपल्याला सुधाकर शुक्ल या लेखकाच्या ‘महर्षी वाल्मिकी ’या ग्रंथाच्या आधारे सांगता येईल. वरील ग्रंथांतील माहीतीच्या निमित्ताने शंका निर्माण हातात. की एक ब्राम्हण पुत्र ‘स्व’ ची जाणीव होऊन जर ‘रामायण’ महाकाव्य निर्माण करू शकतो. त्या जातीतील मूलांमध्ये परिवर्तन होऊ शकते तर एका मागास जमातीतील व्यक्तींमध्ये परिवर्तन का होऊ शकत नाही? भिल्लांच्या सहवासाने एक ब्राह्मण पुत्र कित्येक खून करू शकतो की ज्या जातीत दिवसरात्र मंत्रघोष चालतो. होमहवन चालते त्या जातीचा तरूण दरोडेखोर बनू शकतो, म्हणजे एवढा भयानक बदल एक ब्राम्हणपुत्रात होतो. तर याच बाबीला उलट बाजूने घेतले तर वाल्या नावाचा कोळी (दरोडेखोर) जर नारदमुनींच्या प्रेरणेने,उपदेशाने ‘रामायण’ सारखे महाकाव्य का लिहू शकत नाही? (सुज्ञवाचक या बाबीचा विचार करतील ) म्हणजे तत्कालीन परंपरेत विद्याप्राप्ती म्हणजे केवळ ठराविक जातीची मक्तेदारी होती. आणि त्या कथीत जातीला, मागास जमातीतील तरूण एवढे मोठे महाकाव्य लिहून आद्यमहाकवी होण्याचा मान मिळवतो. हे सहन झाले नाही.असे म्हटले तर ते वावगे ठरू नये, म्हणून या धुर्त लोकांनी रामायण रचियता वाल्मिकी ऋषी हे इतर जातींतील नसून ब्राम्हणच आहेत असा हक्क दाखवत आहेत. निष्कर्ष:- मागासवर्गीय जमातीतील लोक लिहू शकत नाहीत.ही भावना सर्वांच्या मनात ठसवण्याचं काम या जातीने केलेलं आहे. इतिहासात असे भरपुर दाखले आले आहेत की, इतर लोकांचं लेखन या जातीच्या लोकांना रूचलेलं नाही. मध्ययुगीन काळातील कवी नरेंद्र यांच्या ‘रूक्मीणी स्वयंवर’ या काव्या चा मोह राजा रामदेवराय यांना आवरता आला नाही. त्यांने सदरील ग्रंथ माझ्या नावावर करा असा आग्रह कवी नरेंद्राकडे धरला. पण त्याने स्पष्टपणे ” ना राजे हो आमुच्या कधी कुळा बोलू लागेल “ अशा शब्दांत नकार दिला. (अर्थात कवी नरेंद्र यांची जात ठोस पणे माहीत नाही.) पण वरिष्ठांने वरील प्रकारे हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला. यातून हे लक्षात येते की, इतर जातींतील लेखक, प्रगाढ समजल्या जाणाÚया पंडितांना रूचले नाहीत.‘रामायण’ हे महाकाव्य त्यांना आपल्या नावावर करून घेता आलं नसावं या साठी इतिहासकारांनी रामायण रचियता महर्षी वाल्मिकी ऋषी हे ब्राम्हण जातीचेंच म्हणून घोषीत केले असावेत. नव्हे तर महर्षी वाल्मिकी वर त्यांनी हक्क दाखवला असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. आज इतिहासकारांनी जरी पुरावे नष्ट केले असले तरी त्यांचीच एक चूक म्हणावी लागेल की, त्यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा ‘वाल्या कोळी’ म्हणून उल्लेख केला. याचाच अर्थ महर्षी वाल्मिकी ऋषी हे कोळी जमातीचेच होते. हा इतिहास कुणी नाकारू शकत नाही. कारण या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो की, महर्षी वाल्मिकी ऋषी यांना वाल्या कोळी का म्हटले गेले ? इतर कोणत्याही जाती जमातीची बिरूदावली का लावली गेली नाही? म्हणजेच ते कोळी जमातीचे होते हे सिद्ध होते.
(सदरील लेख हा वेगवेगळ्या आख्यायिका वाचून, ऐकून लिहिला आहे. लेखातील काही वर्णनाचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.)
प्रा. डॉ. रमाकांत गजलवार एकलारकर कै.शंकरराव गुटटे ग्रामीण महाविद्यालय , धर्मापुरी ता.परळी (वै.) जि.बीड 9921703366 [email protected]