जिल्ह्याच्या सहकार चळवळीत महत्वपूर्ण असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.
अर्धापूर तालुक्यातील लक्ष्मीनगर, देगाव-येळेगाव स्थित भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी एकूण ७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ७ अर्ज छाननीत बाद झाल्याने ६५ उमेदवार रिंगणात शिल्लक होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ४४ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
कारखान्याच्या नवनिर्वाचित २१ संचालकांमध्ये १५ जणांना पुन्हा चाल मिळाली असून, ६ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पुन्हा निवडून आलेल्या संचालकांमध्ये विद्यमान चेअरमन गणपतराव तिडके (लक्ष्मीनगर गट), व्हाईस चेअरमन प्रा. कैलास दाढ (बारड गट) यांच्यासह अॅड. सुभाष नामदेवराव कल्याणकर (लक्ष्मीनगर गट), शिवाजी नरबाजी पवार व व्यंकटराव बाबाराव कल्याणकर (बारड गट), मोतिराम गंगाराम जगताप (मालेगाव गट), बालाजी गोविंदराव शिंदे, माधवराव व्यंकटराव शिंदे, किसनराव दशरथ पाटील (मुदखेड गट), अशोक दिगांबर कदम, दत्तराम लोकडोजी आवातिरक (आमदुरा गट), आनंद पुरबाजी सावते (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती गट), कमलाबाई दत्तराम सूर्यवंशी (महिला प्रतिनिधी), सुभाषराव माधवराव देशमुख (इतर मागास प्रवर्ग), साहेबराव लचमाजी राठोड (भटक्या, विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी) यांचा समावेश आहे. तर नरेंद्र भगवानराव चव्हाण (उत्पादन सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था), माधव मोहनराव कल्याणे (आमदुरा गट), बळवंत रंगराव इंगोले व लालजी गोडाजी कदम (मालेगाव गट), व्यंकटी सोनाजी साखरे (लक्ष्मीनगर गट) आणि मीरा शामराव पाटील (महिला प्रतिनिधी) यांची संचालक मंडळावर नव्याने निवड झाली आहे.
एकिकडे जिल्ह्यातील सहकार चळवळ मोडकळीस आली असताना अजूनही भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना या संस्थेने आपले अस्तित्व समर्थपणे टिकवून ठेवले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार व कर्मचारी यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आणण्याचे काम या कारखान्याच्या माध्यमातून मागील अनेक वर्ष होते आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन व मार्गदर्शन यामुळेच कारखान्याची आर्थिक प्रगती झाली असून, या कारखान्याच्या माध्यमातून साखर उद्योग अडचणीत असताना सुद्धा शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले गेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कारखान्याच्या उभारणीपासून आजवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
*शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य- चव्हाण*
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नवीन संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अविरोध झाल्याचा मनःस्वी आनंद असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व उमेदवारांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे नवीन संचालक मंडळ नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करेल आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासात व सहकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देत राहिल, असा विश्वास त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केला आहे.