मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना कंधार तहसिल कार्यालयाची मदत ; तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांचा पुढाकार

कंधार ; कंधार तहसिल येथे सेवा बजावत असलेले तीन कर्मचारी वेगवेगळ्या कारणामुळे मयत झाले , त्या कर्मचाऱ्यांच्या पश्चात लागणारी कुटुंबीयांना सर्व आवश्यक मदतीसह दिवाळी गोड व्हावी म्हणून तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पुढाकार घेऊन वेळेवर सर्व मदत मिळवून दिल्याने त्यांचे दिवाळी गोड झाली .

कंधार तहसील येथे तहसीलदार व्यंकटेश मुंडे व आस्थापना शाखेचे गंगाधर टेंभुर्णेवार ,लेखा शाखेचे पेशकार ज्योती मुंडे यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्याच कार्यालयात कर्मचारी असलेले पण अचानक मृत्यू पावलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सहा महिने ते एक वर्षाच्या आत सर्व शासकीय देय लाभ मिळून देण्यासाठी पुढाकार घेतला .

मयत माजी सैनिक सुखदेव औटी , सुचिता जाधव तलाठी व महसूल सहाय्यक शिवाजी कांबळे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला गेला त्यामुळे मयताच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड झाली .

.(बारकुजी मोरे यांनी त्यांच्या शब्दात वृत्तांकन केले आहे . ते पुढील प्रमाणे आहे )

भाऊबीज स्पेशल – टेंभुर्णेवार यांनी जपलेला बंधुभाव

मृत्यू ही अटळ बाब आहे.
पण अचानक घरातील कमवता व्यक्ती चा मृत्यू होणे म्हणजे कुटुंबावर महासंकटच.
दुःख तर अगणीतच!!
पण हे सर्व सांभाळत घराकडे, चिमुकल्याकडे पहात काही व्यवहार हे पुर्ण करावेच लागतात पण हे करतांना जग अनुभवता येते….असे अनेक अनुभव काही नौकरी करणाऱ्या व्यक्तीचे अचानक मृत्यु झालेल्या कुटुंबीयांकडून ऐकायला मिळतात.. ऐकुन मन खिन्न होते.. एका कँन्सर पिडीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीतली घटना अजुनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.. इतका रुक्ष असतो प्रतिसाद -भाव नसलेला.

सेवा निवृत्ती नंतर चार पाच वर्षे तो कर्मचारी चपलेच्या पार चिंधड्या होईपर्यंत त्याला मिळणारा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे जुळवाजुळव करत असतो व केविलवाणा होऊन चालु यंत्रणेकडे हताशपणे पाहत असतो..

पण काही कर्मचारी/अधिकारी हे मानवतावादी दृष्टिकोन ठेवून काम करतात हे पाहून मनास बरे वाटले

तहसिल कार्यालय कंधार येथील मा तहसिलदार व्यंकटेश मुंडे,व आस्थापना शाखेचे गंगाधर टेर्भुर्णेवार व लेखा शाखेच्या पेशकार ज्योती मुंडेमँडम यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे तीन अचानक मृत्यु पावलेल्या महसुल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एका वर्षाच्या आत त्यांचे सर्वशासकीय देय-लाभ देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आला यात आमचे मोठे बंधू विनोद दादा ऊर्फ गंगाधर टेर्भुर्णेवार यांची धडपड व प्रयत्न फारच महत्त्वाचे होते .

-माझी सैनिक असलेले मुळचे अहमदनगरचे आमचे मित्र सुखदेव औटी.. …हे तलाठी म्हणून कंधार तालुक्यात रूजु झाले तेव्हा ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मनलावुन काम केले,नंतर राऊतखेडा सज्जावर त्यांची नियुक्ती करण्यात आली..मन लावून काम करणारा, मानस जोडणारा, प्रत्येकाशी सौजन्याने वागणारे हे व्यक्तीमत्व अचानक ह्रदयरोगाच्या धक्क्यामुळे मृत्यू पावले.. 11 डिसेंबर 2021 सुट्टीच्या दिवशीही सर्व तलाठी, महसुल अधिकारी कर्मचारी दवाखान्यात धावुन आले पण नियतीपुढे औटींना वाचवु शकले नाही. रात्री बारा एक पर्यंत मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक सर व प्रभारी तहसीलदार संतोष कामठेकर हे या बाबत संपर्कात होते व औटींचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांचा ताब्यात देऊन अनेक जन अंत्यसंस्कार विधीसाठी सोबत गेले, औटींनी एक वर्ष पुर्ण सेवा करु शकले नाही परंतु सर्वांना आपलेसे करून गेले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,एक मुलगी असा परीवार.. या परीवारास धीर‌ देत त्यांना सर्व लाभ एक वर्षात देण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न महसूल सहाय्यक टेंभुर्णीवार यांनी केले, टेबल‌ नवा, डिसीपीएस -एनपीएस हे नवीन असल्याने त्याबाबत प्रक्रिया नविनच. तरी पण या बाबत सर्व माहिती व पाठपुरावा करून त्यांनी औंटीच्या कुटुंबीयांना सर्व उपदाने अदा करण्यासाठी यशस्वी कामगिरी केली व आपल्या सहकारी प्रति असलेला बंधुभाव जपला. व जवळपास साडेपाच लाख रुपयांची उपदाने एक वर्षाच्या आत जमा केली डीसीपीएसची दहा लाखाची रक्कम ही काही दिवसांतच जमा होईल त्याबाबत पुर्ण कार्यवाही केली आहे..

सुचीता जाधव ही आमची लाडकी भगीनी सुद्धा अशीच अचानक दुःखद वार्ता देऊन सोडुन गेली.. निसर्गाने दिलेल्या शारीरिक दुर्बळतेवर मात करून चार ते पाच वर्षे आस्थापना शाखेचे काम व‌ नंतर तलाठी पदाचे मुळ काम क्षेत्रीय स्तरावर जाऊन करणारी सुचीता.. अशीच कामानिमित्त क्षेत्रीय स्तरावर जात असतांना गाडीवरुन पडली. त्यावेळी *त्यावेळी प्र.तहसिलदार असलेले मा.सारंग चव्हाण सरांनी तीला स्वतः आपल्या गाडीने नांदेड मध्ये शरीक केले व उषा कदम व इतर तलाठी यांनी लहान बहीणेप्रमाणे दवाखान्यात तिची घेतलेली काळजी अजुनही विसरण्यासारखी नाही* चालतांना नाईलाजाने हळुवार चालावे लागणारी शरीराने कमकुवत, अतिशय सडपातळ परंतु कामाप्रती चपळ, असलेली तलाठी सुचीता यांचा वाढदिवस ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती दिनी असतो तो लोह्यात पहील्यांदा आम्ही साजरा केला त्यावेळी भाऊक झालेली आमची भगीनी सुचीता..
गाडीवरुन पडलेल्या अपघातातुन दुरुस्त झाली परंतु अचानक तब्येत बिघडली व उपचारादरम्यान मृत्यू पावली. सुचीता ही परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील पहीली सरकारी कर्मचारी तीचे आईवडील व दोन भाऊ शेती करणारे.. तिच्यामुळे अख्खा कुटुंबाला जी सामाजिक प्रतिष्ठा मिळाली ती वाखाखण्याजोगीच…
पण तिच्या निधनामुळे कार्यालयीन बाबींचा अनुभव नसलेल्या कुटुंबीयांना स्वतः हुन आवश्यक ते मार्गदर्शन व कागदपत्रे मागवून टेंभुर्णीवार यांनी त्या भगीणीच्या कुटुंबीयांना देखील जवळपास साडेसात लाखापर्यंतची शासकीय देत रक्कम जमा करून दिली.व आपला भातृभावाचे कर्तव्य पुर्ण केले. *भाऊबीजेला हे स्मरण कसे होणार नाही बरे*

दोन तलाठी बांधवाप्रमाणे महसुल सहाय्यक शिवाजी कांबळे या महसुलबांधवांबाबतीत ही अशीच घटना घडली.. कांबळे यांची नियुक्ती तहसिल कार्यालय कंधार येथे होती परंतु आरोग्य कारणाने ते मुखेड तहसिल मध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.. त्यांच्या बरोबर काम करता आले नाही किंवा प्रत्यक्ष त्यांची भेट झाली नाही परंतु संदीप भुरे व मुखेड तहसिल कार्यालयातील महसूल कर्मचारी बांधवांकडून त्यांच्या विषयी सकारात्मक ऐकायला मिळाले‌. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांची व कुटुंबीयांची ओळख नसतांनाही योग्य संपर्क साधुन टेंभुर्णीवार यांनी त्यांची शासकीयदेय असलेली जवळपास दहा लाखापैक्षा जास्त रक्कम खात्यावर जमा केली.. *या सर्व रक्कमेचे आदेश व काही धनादेश मा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या सहीनिशी मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी या तिन्ही महसुल बांधवांच्या कुटुंबीयांना देण्यात आले*

वर वरुन जरी हे कार्यालयीन काम केले, यात वेगळे असे काय ? असा काहींना प्रश्न पडु शकतोच.. पण याचे उत्तर सेवानिवृत्त झालेल्या एखाद्या कर्मचारी त्यांच्या कार्यालयात चकरा मारून झिजलेल्या चपला दाखवून देईल.

*स्वतः हून संपर्क साधुन आवश्यक कागदपत्रांची मागणी करून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्व शासकीय देणी इतक्या कमी कालावधीत देण्यासाठी धडपड करणारे आस्थापना शाखेतला कर्मचारी सहसा आढळत नाही*

*पण मानवतावादी दृष्टिकोन व सहकाऱ्याप्रती असलेला गंगाधर टेर्भुर्णेवार यांचा भातृभाव व झोकून देऊन काम करण्याची शैली मुळे… टेंभुर्णेवार सारखे बंधुची त्यांच्या कामाची भाऊबीज दिवशी ओवाळणी या शब्दरुपात करावी तितकी कमीच*…

*या कामी त्यांच्या सोबत असलेल्या आमच्या महसुल भगीनी पेशकार ज्योतीताई मुंडे व ज्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाशिवाय हे शक्यच नव्हते तर आदरणीय तहसिलदार व्यंकटेश मुंडे सर*

या सर्वांना दिपावलीच्या – भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…व सर्व महसूल अधिकारी कर्मचारी बांधवांकडून असाच भातृभाव जपला जाईल हीच भाऊबीजेची अपेक्षा .

 

ईडा पिडा टळु दे बळीचे राज्य येऊ दे…
ही ओवी आपल्या कामातुन साध्य होऊ दे…

सर्वांच्या आयुष्यात दिपावलीच्या दिपाचे तेजोमयप्रकाश,ऊब व भातृभावाचे धन आरोग्यसंपन्नता लाभो हीच मनाकामना

 

 

 

 

 

 

– बारकुजी मोरे , कंधार

 

 

Advt.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *