कोणत्याही देशाचे संविधान हे त्या देशाच्या समग्र बांधणीचा पाया असते. असंख्य भाषा, जाती, पंथ, धर्म असणाऱ्या भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे तथा या मूल्यांनी देशातील सर्व प्रांतांना एकाच भारतीयत्वात बांधून ठेवणारे महान असे भारतीय संविधान आहे. भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीप्रणित गणराज्य घडविणारे हे संविधान आहे. तसेच भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य बहाल करणारे आणि समान दर्जा, समान संधी प्राप्त करून देणारे हे संविधान ज्याच्या प्रिअॅम्बलमध्ये ही संरचना मांडण्यात आली आहे. असे संविधान आम्ही भारताच्या लोकांनी दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतःप्रत अर्पण केले आहे. म्हणजेच संविधान सभेने समस्त भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत देशाला हे सर्वांगसुंदर असे संविधान अर्पण केले, ज्याचा गौरव दिन दरवर्षी साजरा केला जातो.
भारतीय संविधानाचे प्रमुख भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारीच आहेत. संविधानातील मूलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानातील माहितीचा, संविधानातील प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलत्वांविषयी जाणिव जागृती होणे ही महत्त्वपूर्ण उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवून गतवर्षीच्या राज्य सरकारने सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संविधानदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना गतवर्षी २२ नोव्हेंबरच्या आदेशानुसार देण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या २२ नोव्हेंबर आदेशान्वये देण्यात आल्या होत्या. यावर्षी बदललेल्या नव्या सरकारला ही बाब विचाराधीनही वाटली नाही.