अनुभूतीतून सिद्धांताकडे प्रवासणारा कवितासंग्रह – काजवातुषार काव्यगंध

                   कोरोनाकाळाने माणसाचे विविध क्षेत्रातील अस्तित्वच पुसटसे करुन टाकले आहे. हा काळ हे अस्तित्व हिरावून घ्यायलाही टपून बसला आहे. या जागतिक महामारीशी झुंजत असतांना ‘माणूस’ आणि त्याची ‘माणूसकी’ हे दोन्ही विषय जगाच्या केंद्रकीय पटलावर आलेले आहेत. कोरोनाने माणसाला जगणे शिकविण्याची काही गरज नाही. माणूस जात्याच बुद्धीमान प्राणी असल्यामुळे त्याला कसे जगावे हे आधीच माहिती आहे. अनुभव आणि निसर्गाकडून तो सतत शिकत आणि उत्क्रांत होत आलेला आहे. असे असले तरी मानवी समुदायाने उभ्या केलेल्या प्रगतीच्या शृंखला तोडण्याला देशाची सनातन संस्कृती कारणीभूत आहे. धर्मश्रद्धा, रुढी, परंपरांनी माणसाच्या उन्नतीलाच साखळदंड घालून ठेवले होते. त्यामुळे जुन्या काळापासून भारतातल्या लोकांना सतत प्रबोधनाची आवश्यकता राहिलेली आहे. अगदी स्वच्छ राहा, थुंकू नका, येथे घाण करु नका,काळजी घ्या, तुम्ही स्वत: चांगले रहा; जगा दुसऱ्यांना जगू द्या इथपर्यंत लोकांना सांगावे लागते.  या देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून अनेक संत, महात्मे, प्रबोधनकार, समाजसुधारक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदींची मांदियाळी जन्माला येत राहिली. प्रबोधनाचा वारसा पिढी दर पिढी चालत राहिला. याचाच अर्थ असा की पिढ्यानपिढ्या इथे अंधाराचेच साम्राज्य होते. अजूनही समाजाला असलेल्या सामाजिक प्रबोधनाच्या गरजेतून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अशाच अभियानाचा एक भाग म्हणून प्रबोधनाचा मोठा सामाजिक आशय घेऊन कवी मोहन बुक्तरे हे त्यांच्या ‘काजवातुषार काव्यग्रंथ’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रांतात दाखल होत आहेत. जागतिकीकरणाच्या आजच्या टप्प्यात ज्यांच्या ज्यांच्या हातात हा मोबाईल आहे त्याने कवींची अमर्याद संख्या वाढविली आहे. काॅपी पेस्ट च्या जमान्यात डिजीटल कवींची भरमसाठ वाढ चिंतेची बाब झाली आहे. म्हणूनच एखाद्या साहित्य संमेलनाने ‘कवींची वाढती संख्या: बाळसे की सूज?’ हा परिसंवादीय विषय हाताळावा ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. कविता लिहिण्याच्या, त्या सादर करण्याच्या आणि त्या आयोजन करण्याच्या स्पर्धा अहमहमिकेने चाललेल्या आहेत. अशा उदंड पिकातल्या कवींनी कवितेचा श्वास गुदमरवून टाकला आहे. या परिस्थितीत बुक्तरे यांची कविता कुठे उभी राहील?

                 कवितेच्या प्रांतात खरं तर अराजकाचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वाचन करायला वेळ कमी पडेल इतक्या वेगाने काळाचा पडदा पुढे पुढेच सरकतो आहे. भांडवलशाही आणि राजसत्ता ह्या मानवी मूल्यांची गळचेपी करायला पुढेच सरसावत आहेत. अशातच कोरोनाने कहर केलेला आहे. तो चालूच आहे. माणसाच्या जगण्याबरोबरच मरणाचेही संदर्भ बदलून गेले आहेत. अशावेळी बुक्तरे यांची कविता महत्वाचा आशय मांडते,

        ‘जगण्या-मरण्यातलं एका श्वासाचं अंतर
          माणसाला कळते जेव्हा
          माणूसकीचा दीप जळतो त्याच्या
           हृदयात’.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर माणूसकीच्या प्रस्थापनेसाठी लढा दिला. शिक्षणातूनच इथल्या दीन दलित, पीडित, शोषितांची, वंचितांची सर्वांगिण प्रगती होईल असा उज्वल भविष्यकाळ हेरला होता. शिक्षणाचे महत्त्व नंतरच्या अनेक पिढ्यांनी जाणलं. तेव्हा एका पिढीचं नेतृत्व करणारी कवीची अशिक्षित आई आपण आपल्या लेकरांसाठी घेतलेला वसा टाकायचा नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेते. या प्रसंगाचे वर्णन करताना कवी एके ठिकाणी म्हणतात,
      
                ‘माझ्या शिक्षणासाठी
                 दिन-रात उन्हातान्हात
                 सारी जिंदगी जाळली
                 पणतीच्या संवेदनेपरी
                 तीळ तीळ जळत राहिली.

         नांदेड येथील कवी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी बुक्तरे यांच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना दिली आहे. ती कवितासंग्रहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यात बुक्तरे यांच्याविषयी महत्वाचं विधान ते करतात. ते म्हणतात की, ‘बुक्तरे यांच्या कवितेचा परीघ अत्यंत व्यापक असल्यामुळे सांप्रतच्या समाजव्यवस्थेच्या नानाविध प्रश्नांना हात घालण्याचे धारिष्ट्य तो दाखवतो’.  लैंगिक विषमता आणि भेदाभेद अमंगलाच्या मूळावर जोपासत असलेली मानसिकता नष्ट व्हावी असे कवीला प्रामाणिकपणे वाटते. ‘मी नकोशी’ या कवितेत नकोशीच्याच तोंडी घातलेल्या या ओळी महत्वाच्या ठरल्या आहेत.

                    ‘आई तू अंधश्रद्धेच्या
                      गुलामीला पडू नको बळी
                     अंधाराच्या गर्भातील
                    तेजस्वी जन्म घेईल कोमल कळी’

या कवितेत नकोशीची प्रबोधनात्मक प्रतिमा उभी करण्यात कवी यशस्वी झाले आहेत.

                  आपल्या जीवनकार्यात कवी मोहन बुक्तरे हे एक प्रवासी वाहनाचे चालक होते. ते अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे लेखन करतात. त्यांच्या कवितेचा प्रवासही जीव मुठीत धरून सर्व प्रवाशांना योग्य ठिकाणी सुखरूप पोहचविण्यासारखाच आहे. अनेक संकटे आली तरी हताश न होता आपण मार्ग काढतो आणि पुढे मार्गक्रमण करतो. जीवनात पदोपदी दु:ख झेलताना खडकाळ वाटेला मखमली बनवण्याचा प्रयत्न करतो. संदर्भ वेगळा असला तरी त्यासाठी एक मोलाचा सल्ला ते इथे देतात,
   
          ‘तू सतत
           पाऊलवाट चालतांना
            संकटांवर मात करीत जा’

परंतु हे वाटतं तितकं सोपं नसतं. माणसाच्या जगण्याला संघर्षाची झालर असते. तरच त्याच्या जगण्याचे सौंदर्य खुलून दिसते. मागच्या काही पिढ्यांनी इथे केवळ भाकरीसाठीच संघर्ष केला आहे. भाकर मिळविणे हेच या पिढ्यांचे एकमेव ध्येय होते. ‘भूक’ या कवितेत अनुभवाला आलेल्या एका प्रसंगाचे मन हेलावून टाकणारे काव्यचित्रण आले आहे. ही कविता वाचनीय आहे. उपमेय आणि उपमान एकच असल्याचे आणि एकमेकांवर अवलंबून असल्याचे त्यांची शब्दबद्धता सांगते. तसेच या कवितेच्या सुरुवातीलाच असलेल्या ओळी हृदयाचा ठाव घेतात,

          ‘डोक्यावर सूर्य तळपत होता
           पोटात भुकेची आग
             उसळली होती’
                                       यात कवीने भूकेने व्याकूळ झालेल्या एका गरीब मुलीचे धगधगते चित्रण केले आहे. गरीबांनाही काही स्वप्न असतात. परंतु दररोज ते आपल्याच स्वप्नांची तिरडी उठत असल्याचे पाहतात. ही बाब कवी मोहनराव बुक्तरे यांच्या संवेदनशील मनाला चटका लावून जाते.
                  देशात आलेल्या नवभांडवलशाहीने माणसाचं रुपांतर एका हृदयशून्य बाजारपेठेत करुन टाकलेले आहे. मानवी मूल्यांची जोपासना करण्याऐवजी त्यांना पदच्युत करून त्याजागी अर्थमूल्यांची प्रस्थापना केली जात आहे. आजच्या काळात पैसा अतिमहत्त्वाचे साधन बनला आहे. लोकशाहीला बटीक मानणाऱ्या भांडवलवादी श्रीमंतांनी आणि राजकारण्यांनी माणसाला एक कायमस्वरूपी ग्राहक बनवून टाकले आहे. मताला पाचशे हजार बोली लावून माणसासकट जातीनिहाय समाज विकला जात असल्याचे पाहून कळवळणारे कवीचे हृदय म्हणते,

‌            ‘निवडणूक आली की
           दिली जाते जातवार गल्ली
          झेंड्यांचे रंग पाहुनी किंगमेकर ठरवतात  
         बोली
         हिरवा,निळा,पिवळा,भगवा,
         झेंडे पाहुनी लावल्या जातात वस्त्यांचे भाव     
        तेव्हा संधीसाधू साधून घेतात आपला डाव’

      ‘ रंग ‘ ही त्यांची कविता फार बोलकी आहे असे मी इथे नमूद करुन ठेवतो. वाचकांनी इतर कवितेप्रमाणेच या कवितेचा भावार्थ लक्षात घ्यावा असे मी सूचवितो.

                 कवी बुक्तरे वयाने ज्येष्ठ , अनुभवाने श्रेष्ठ असले तरी पहिल्या कवितासंग्रहाच्या संबंधाने ते नवखेच आहेत. कवितासंग्रहातील काही ठिकाणी कविता आशयसमृद्धी आणि कवितेची मूलगामी संरचना यात ते कमी पडल्याने फसलेल्या आढळतात. त्या प्रकाशित करण्यापूर्वी वारंवार वाचून त्यावर संस्कार करणे आवश्यक होते. परंतु वाट्याला आलेले अनुभव जेव्हा एखाद्या विशिष्ट तत्वविजयाकडे आगेकूच करीत राहतात तेव्हा कवीची अनुभूती तो मांडत असलेल्या त्याच्या सिद्धांताकडे प्रवास करण्याचा प्रयत्न करते. प्रश्नांचे संदर्भ आणि दृढ आशय घेऊन निघणारी कविता ही बुक्तरे यांच्या आकलनशक्तीची एक जमेची बाजू आहे. ‘काजवातुषार’ या साधनासंबंधाने काजवे स्वयंप्रकाशित होऊन काळ्याकभिन्न काळोखात आपल्या प्रकाशपुंजक्यांचे काव्यतुषार उधळतात, असे कवीला वाटते. अडचणीच्या, संकटांच्या, आडवळणाच्या मार्गात आपली वाट शोधतात. आपली सोनेरी सकाळ शोधतात. असे कवीचे आकलन आहे, म्हणूनच कवी म्हणतो की, जिसमे चमकने की अभिलाषा होती है वह कुदरत की रोशनीमें पत्थरमें भी खिलकर अपनी प्रतिभा दिखाता है…!
जो काजवा आपल्या साधनेने एकाग्रचित्त होऊन अंधारात केवळ मार्गच शोधत नाही तर त्याचा काव्यगंध बनून बुक्तरे यांच्या कवितांतून  दरवळत राहतो या अर्थाने कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदानंद सपकाळे यांनी सार्थ ठरविले आहे. त्यामुळे सर्जनशीलता किंवा चिंतनशीलता हे मुद्दे कवीसाठी गौण ठरलेले आहेत, हे कवितासंग्रह वाचताना वाचकांच्या लक्षात येते.

          प्रख्यात साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची पाठराखण प्रस्तुत कविता संग्रहास लाभलेली आहे. त्यात दुसरी कोणतीही बाजू अधोरेखित केली नसली तरी त्यांनी कवितेचे विशेषत्व खुलविले आहे. नांदेडच्याच इंदूप्रभा प्रकाशनाने हा कवितासंग्रह अत्यंत कमी कालावधीत प्रकाशनास सज्ज केलेला आहे. त्यामुळे बुक्तरे यांचे जावई देवराव जोंधळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिशेष प्रभाकर सपकाळे आणि अक्षरोदय साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कालवश दीपक प्रभाकर सपकाळे यांना हा कवितासंग्रह समर्पित केला आहे. या कवितासंग्रहात एकूण ६१ कविता आहेत. त्या वेगवेगळ्या विषयांवर, प्रसंगांवर तसेच अनुभवांवर बेतलेल्या आहेत. अनेक कलाकार जेव्हा आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचे कलात्मक पद्धतीने सादरीकरण करतात, मनावर समाजप्रबोधनाचा ठसा उमटवतात. या कला जगण्याला उर्जा देतात, असे कवीचे ठाम मत आहे. कवी हा राष्ट्राचा अलंकार असण्याबरोबरच तो एक कलाकार असतो. तो एक कलाविष्कारच सादर करीत असतो. हा आविष्कार म्हणजे एक सामाजिक कृतीच असते. परंतु आंबेडकरी समाजात जन्माला आलेल्या व्यक्तीने किंवा कवीने आंबेडकरी कविताच लिहावी असा दावा करणे आवश्यक नसते.

      आंबेडकरी कवी कलावादी नसतो. त्याच्या कविता आंबेडकरी प्रेरणास्रोत असतात. त्या आंबेडकरी निष्ठांची बांधणी करतात. माणसाच्या अभावयुक्ततेला आव्हानित करतात. पानाफुलांच्या आणि पाचोळ्याच्या कविता त्या नसतात. आरडाओरड करुन आपलेच खरे म्हणणाऱ्याही त्या नसतात. बाबासाहेबांचे बोट धरुन उजेडाकडे प्रस्थान करणारी ही कविता असते. ती निर्भिड आणि प्रश्नांशी थेट भिडणारी असते. लढा देणारी असते. प्रश्नांना प्रश्नांशी आपापसात भिडवून मारणारी असते. ती काळाच्या क्रौर्याला थेट आव्हान देणारी ज्वलंत कविता असते. ती तमसोमा जोतिर्गमयम नसते. अंधारातून स्वत:च्या प्रज्ञादीपाच्या सहाय्याने काळोखाच्या महासागराचे किनारे उद्धवस्त करण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आव्हान उभं करणारी ती असते. ही कविता दोन परस्परविरोधी संस्कृतीतील संघर्ष असतो. व्यवस्थापरिवर्तनाचे शस्र बनून ती आंबेडकरी चळवळीत काम करीत असते.

            लैंगिक आणि शिव्यांची शब्दबद्धता ही कविता अमान्य करते. म्हणून ती दलित किंवा विद्रोही नसते. सम्यक क्रांतीच्या दिशेने जाणारी आणि  मानवी मूल्यांची प्रस्थापना करु पाहणारी ही कविता असते. काजवा हा उजाडल्यावर लुप्त होणारा एक कीटक आहे. त्याचे काही एक आयुष्य असते. तो निसर्गाच्या अपारंपारिक ऊर्जेशी टक्कर देऊ शकत नाही. इथे अनादिकालापासून बोकाळलेल्या सामाजिक विषमता, जातीयता, चंगळवादाने बरबटलेली सामाजिक व्यवस्था, वर्गवाद, धर्मांधता, या संकल्पनांनी लादलेली अभावयुक्तता आणि मानवी सौंदर्याच्या पुनर्रचनेचा महाप्रकल्प अमान्य करणाऱ्या या अराजकीय व्यवस्थेच्या विरोधात दिवसाही अंधारलेल्या युगाला नष्ट करणारा भीमसूर्य अष्टौप्रहर तळपत असतो. अंधारात चाचपडत न बसता हा प्रज्ञाप्रकाश पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न इथल्या कवीने केला पाहिजे. त्याने गावमातीचे आणि परंपरागत गावगाड्याचे गोडवे गायन करण्याची आवश्यकता नाही. इतके भान समकाळातल्या कवीला असणे आवश्यक आहे. पुढील काळात बुक्तरे यांची कविता त्या प्रज्ञासूर्याच्याच दिशेने प्रवास करील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. 

Gangadhar DHAVALE
Gangadhar DHAVALE

समीक्षक गंगाधर ढवळे

कविता संग्रह – काजवा तुषार काव्यगंध
कवी – मोहनराव बुक्तरे, सांगवी, नांदेड(मो. ७२१८५१०८३७)
प्रकाशक : इंदूप्रभा प्रकाशन, नांदेड
आवृत्ती : प्रथामावृत्ती(२०२०)
मूल्य – ₹१००.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *