मातृह्रदयी नेतृत्व :मा.कै.डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब

(मानवी जीवनात विकास महत्त्वाचा मानला गेला आहे. विकास करण्याचे अनेक मार्ग आहेत पण लोकशाहीत विकास द्रुतगतीने करण्याचे काम राजकारणातून होत असते.तो विकास योग्य दृष्टीने होण्यासाठी नेतृत्वाकडे शैक्षणिक दृष्टिकोण ही महत्त्वाचा असतो. असे अनेक नेते आपण पाहतो.जे आपल्या आयुष्यात सर्व क्षेत्रांना विकसित करण्यात मोलाचे कार्य करतात परंतु हे कार्य करत असताना नेतृत्वाकडे मातृह्रदयत्व असेल तर विकास समन्यायी व अधिक निस्वार्थ पद्धतीने होऊ शकतो. असा विकास घडविणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी खा.कै.डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब होत. त्यांचे काल दि.०१ जानेवारी २०२३ रोजी दुःखद निधन झाले.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा शब्दप्रकाश.)

स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली एक पिढी अशी होती,जी देशसेवेने भारावलेली होती.त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे भाई केशवरावजी धोंडगे साहेब होत. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो अथवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ असो यात त्यांनी मोलाची कामगिरी केली. देश स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची जिज्ञासा मनी बाळगून ते राजकारणात आले. स्वातंत्र्याच्या प्रथम दशकात म्हणजेच १९५७ पासून ते कंधार विधानसभा परिक्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले.तेंव्हापासून ते सलग पाच वेळा १९७७ पर्यंत नंतर १९८५ ते १९९५ पर्यंत विधानसभेवर बहुमताने निवडून गेले व त्यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत अनेक योजना या मतदार संघासाठी आणल्या. सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातील ताईत म्हणूनच ते कार्य करत राहिले. आजच्या सारखी नोट, घोट व वोटच्या सारखी परिस्थिती तेंव्हा नव्हती. कित्येक वेळा जनतेने निधी गोळा करून आपल्या आवडत्या नेत्याला निवडून आणले.देशपातळीवर जेंव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली तेंव्हा त्याचा प्रखर विरोध केशवरावांनी केला होता त्यामुळे त्यांना अनेक दिवस जेलमध्ये राहावे लागले. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत १९७७ ला ते निवडून आले व लोकसभेचे सदस्य म्हणून १९८० पर्यंत त्यांनी उत्कृष्ट असे कार्य पार पाडले. महाराष्ट्राच्या राजकारणातील मण्याडचा ढाण्या वाघ अशीच त्यांची ओळख होती.

सखोल अभ्यास,हजरजबाबीपणा,कमालीचे वक्तृत्व,अजातशत्रुत्व,प्रसंगानुरूप देहबोलीचा प्रयोग या व यासारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे प्र.के.अत्रे सारख्यांबरोबर लेखन व वक्तृत्वाच्या माध्यमातून परखडपणे विचारमंथन करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. विरोधी पक्ष नेता कसा असावा ?त्याचे सभागृहात नैतिक वजन कसे असावे? याचा आदर्श वस्तूपाठ केशवरावांनी घालुन दिला.त्यांच्या विधानमंडळातील कामाबद्दल तत्कालीन त्यांचे सहकारी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासून ते वर्तमानातील अनेक नेतृत्वाने त्यांचे तोंड भरून कौतुक वेळोवेळी केले आहे. राजकारणात काम करताना त्यांनी पक्षनिष्ठा आयुष्यभर सोडली नाही.शेकाप या पक्षाशी ते आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. त्यांनी दलबदलुपणा केला नाही तसे केले असते तर कदाचित ते या राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशपातळीवर मोठे पद प्राप्त करू शकले असते. पण त्यांनी ते केले नाही.विरोधासाठी विरोध किंवा विरोधकांना सतत पाण्यात पाहणे हे ही त्यांच्या तत्वात बसत नसे.म्हणून ज्या इंदिरा गांधींनी त्यांना जेलमध्ये टाकले त्यांचीही बाजू पुढे त्यांनी घेतलेली दिसते. सत्याची बाजू घेणारं हे लोकनेतृत्व होतं. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सतत लढा दिला. त्यांनी ‘आहे रे वर्गाच्या’ विरोधात किंवा सरकारच्या विरोधात काढलेले मोर्चे व सत्याग्रह जरी पाहिले तरी त्यांच्या कल्पकतेची जाणीव येते. गाढव मोर्चा, थुंकी मोर्चा, आसूड ओढा मोर्चापासून असे कितीतरी वेगवेगळे मोर्चे व सत्याग्रह त्यांनी करून प्रस्थापितांना जेरीस आणले.

“जयान कोणी प्रभू मी तयाचा l
तयार्थ हे हात तयार्थ वाचा ll”
ज्याला कोण्हीच नाही त्याचे वाली केशवराव होते.त्यांनी पदाचे स्तोम कधीच माजवले नाही.तत्वनिष्ठा सोडली नाही. राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक प्रकल्प मतदारसंघात आणले त्यातीलच त्यांच्या गावी असलेले बारूळ धरण होय. विधानमंडळाच्या कामकाजाची सूरुवात ‘वंदे मातरम’ करण्याची पद्धत त्यांनीच सुरू केली. ‘जय क्रांती’ हा नारा महाराष्ट्रभर प्रसारीत काम केला.

राजकारणा बरोबरच माणसाच्या विकासाचा केंद्रबिंदू हे शिक्षण आहे. याची जाणीव त्यांना झाली होती. त्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक संस्थांची उपलब्धता नसल्यामुळे अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. तो त्रास गोरगरीब,दिनदलित व्यक्तींच्या मुलांना शिक्षण घेताना होऊ नये म्हणून त्यांनी शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारची उभारणी केली. ही उभारणी आपल्या आई मुक्ताईच्या सांगण्यावरून राजे छत्रपती शिवरायांच्या जन्मदिवसापासून त्यांच्याच नावाने करून नावाप्रमाणेच कित्येक हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले.आज ही त्यांच्या संस्थेत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. कायद्याचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी कंधार येथे विधी महाविद्यालय स्थापन केले.त्या महाविद्यालयात त्यांनी वकिलीची पदवी ही प्राप्त केली.

दोन वरिष्ठ महाविद्यालयांची स्थापना त्यांनी केली व अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये मराठवाडाभर संस्थेच्या विविध शाखांच्या रुपात विशेषत्वाने खेडोपाडी उभ्या करून गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुखेड भागात कर्मवीर किशनराव राठोड व कै.आ.गोविंदराव राठोड यांनी तर कंधार भागात भाई केशवरावजींनी या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. म्हणून आज या भागातील शिक्षण घेऊन हजारो कुटुंब आपल्या पायावर उभी राहिली. त्यांच्या जीवनात कायापालट झाला.हे आपणास कधीच विसरता येणार नाही. शिक्षण संस्थेत विविध उपक्रम राबवून देश सेवेसाठी समर्पित पिढी घडविण्याकडे त्यांचा कल असायचा. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभाग नोंदवायचे.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त जयंती संस्थेअंतर्गत सर्व शाखांद्वारा मोठ्या उत्साहाने विविध उपक्रम घेऊन साजरी करण्याचा पायंडा सूरू केला. एवढेच नाही तर जानेवारी महिन्यात संस्थेतील सर्व शाखांच्या कर्मचाऱ्यांना उपस्थित करून रंजल्या गांजलेल्या पण साहित्यिक दृष्टी असणाऱ्या, लोकसाहित्याची जाण असणाऱ्या गुराखी राजाचे साहित्य संमेलन ते लोहा तालुक्यात भरवत असत. या शिक्षण संस्थेचा फायदा कै.भाई श्रीरामजी गरुडकर साहेबांच्या माध्यमातून मुखेड
शहरालाही झालेला आपणास पहावयास मिळतो.

साहित्यिक अंगाने विचार केला तर राजकारणात राहून साहित्यावर प्रेम करणारी राजकारणी मंडळी बोटावर मोजण्या इतपत असतील. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल.त्याचप्रमाणे भाई केशवरावजी धोंडगे साहेब हे उत्कृष्ट साहित्यिक होते.त्या काळात त्यांनी लेखनाच्या माध्यमातून प्र.के. अत्रे सारख्या साहित्यिकाला सडेतोड उत्तर दिल्याचे वाचनात आहे. त्यांचा आयुष्यभरातील लेखनाचा पिंड हा पुरोगामीत्वाचा होता.त्यांनी आपल्या आयुष्यात जवळपास ४० ग्रंथांची निर्मिती केली.एवढेच नाही तर विविध साहित्यिक चळवळींना प्रत्यक्ष उपस्थित राहून आर्थिक व अन्य प्रकारची मदत करून प्रोत्साहन देण्याचे काम वेळोवेळी केले. त्यांनी लिहिलेली पुस्तके व त्याची शीर्षके जरी आपण वाचली तरी त्यांच्या विद्वत्तेची व विचारांची खोली आपल्या लक्षात येऊन जाते.साहित्यिकांवर ही ते जीवापाडं प्रेम करायचे, गुळगुळीत, बोटचेपे लेखन व व्याख्यान त्यांना कधीच आवडत नसे.जे खरे आहे ते स्पष्ट मांडले गेले पाहिजे असे त्यांना वाटायचे व ते आयुष्यभर तसेच वागत आले.कदाचित त्याचे तोटे त्यांना सहन करावे लागले असतील. पण त्यांनी कधी चुकीच्या विचारांसी तडजोड केली नाही.साप्ताहिक जयक्रांतीच्या माध्यमातून प्रासंगिक लेखन करून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते करत असत. स्वतःच्या घरी प्रेस उभारून सतत लेखन करणे ते साप्ताहिकाच्या माध्यमातून सर्वदुर पोहोचवुन जनजागृती करणे हे फार मोठे काम त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत केले.

साहेबांचा मला भावलेला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे आपल्या आईवर असलेलं जीवापाड प्रेम.ते नेहमी सांगत असत की आज जो काही मी आहे तो आईमुळेच आहे. राजकारण, शिक्षण व अन्य क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मला माझी आई मुक्ताईनेच दिली अशी कबुली ते सतत देत असत.आई असेपर्यंत ते आईचे दर्शन व आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतेच काम करत नसत. आईच्या ईहलोक सोडून जाण्यानंतरही त्यांनी आईच्या स्मरणार्थ विविध उपक्रम घेऊन तिच्या विचारांना जीवंत ठेवण्याचे काम केले. संस्थेत त्या निमित्ताने दरवर्षी ते विविध उपक्रम राबवत असत. आईची समाधी घराजवळ उभी करून तिचे दर्शन घेतल्याशिवाय ते कोणतेच काम करीत नसत.साने गुरुजींप्रमाणे आपल्या मातेवर जीवापाड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व होतं.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ज्यात ११ एप्रिल २००२ रोजी डी.लीट. या मानद पदवीने त्यांना गौरविण्यात आले. विद्यावाचस्पती (पी-एच.डी.) ही पदवीही त्यांना बहाल करण्यात आली होती. ०६ ऑक्टोबर २००४ रोजी दिल्ली येथे ‘भारत शिक्षारत्न अवार्ड’ने तर २००९ ला ‘धर्मवीर संभाजी महाराज पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. ०६ ऑक्टोबर २०१२ रोजी पत्रकारितेच्या क्षेत्रातील आदर्श पत्रकारिता सन्मान त्यांना प्राप्त झाला होता.तसाच २०१२ मध्ये ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कारही’ प्राप्त झाला होता. याशिवाय अनेक पुरस्काराचे ते मानकरी होते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या विधान भवनात आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी घालवला त्याच सभागृहात ऑगस्ट २०२२ मध्ये पावसाळी अधिवेशनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे व त्यांच्या शतकोत्सवी जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सहपरिवार सन्मान करण्यात आला होता. हे भाग्य महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित त्यांनाच लाभले असावे. अशा या मातृह्रदयी व्यक्तिमत्वाला मला माझी व्याख्याने तीन वेळेस ऐकवण्याचे भाग्य लाभले. त्यांनी कित्येक वेळा कौतुकाची थापही माझ्या पाठीवर टाकली. याचे आज प्रकर्षाने स्मरण होते.

ते चांगले काम करणाऱ्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असत.हे मी मराठवाडा भुषण डॉ. दिलीप पुंडे साहेबांवर त्यांचे असलेले निस्वार्थ प्रेम पाहून अनुभवले आहे.ते साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे. त्यांना व्यक्ती आवडला की त्याच्याशी ते आयुष्यभर जोडून राहायचे.एखादी व्यक्ती आवडली नाही की मग ती कितीही मोठी असो त्यापासून ते सतत अंतर राखून राहत असत. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांचे सुपुत्र मुक्तेश्वर भाऊ धोंडगे,प्रा.डॉ. पुरुषोत्तमजी धोंडगे व त्यांच्या कन्या तथा त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी व अन्य क्षेत्रातील परिवार आपापल्या पद्धतीने करतो आहे. हे काम प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. हे काम आपण सर्वजण करूयात असी अपेक्षा व्यक्त करून त्यांना विनम्र अभिवादन करतो व माझा शब्द प्रपंच थांबवतो.

 

 

प्रा.डॉ. रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जी. नांदेड
भ्रमणध्वनी- ९४२३४३७२१५

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *