नाती रक्ताची असतात आणि परिचयातून, सहवासातूनही तयार होत असतात. सर्वच नात्यामध्ये परस्परांविषयी जिव्हाळा आणि वर्तनातला प्रांजळपणा हवा असतो; परंतु मानवी स्वभावाचा, वृत्तीचा, हेतूंचा थांग कधीकधी लागत नाही आणि विपरीत वर्तनाचा प्रत्यय येतो. नाते गृहीत धरले जाते आणि मग जो अनुभव येतो त्याने माणसांना धक्का बसतो, ती हादरुन जातात, कित्येकदा कोसळून पडतात. याचे कारण नात्यांना उजाळा दिला जात नाही, परस्परांच्या संबधात आतूनच काही अंतरराय आलेला असेल याची तर कल्पनाही केली जात नाही..!
नात्यांचे सर्व्हीसिंग या पुस्तकातील छोट्या गोष्टींच्या माध्यमातून लेखक विश्वास ठाकूर यांनी काही सुखद, दुःखद अनुभवांचे कथन केलेले आहे. या छोट्या गोष्टी नाडलेल्या, पीडलेल्या, हतबल, हताश, दुःखाहत, गैरफायदा घेऊ इच्छिणाऱ्या, स्वार्थ साधणाऱ्या अशा भिन्न भिन्न व्यक्तींची आहेत. त्यांच्या वर्तनाच्या आणि मनाच्या पृष्ठस्तरापलीकडे काय काय दडलेले आहे; याचा शोध घेण्याचे आवाहन त्या वाचकाला करतात..!
या पंचवीस गोष्टींमधून मानवी स्वभावाचे आणि वर्तनाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. त्यांच्याशी बँकेच्या निमित्ताने नाते जोडले असलेला लेखक वेगवेगळ्या प्रसंगात माणसं जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतो; कारण ‘माणसं तोडायची नाहीत, आपल्याकडून ती तुटू द्यायची नाहीत; किंबहुना ती उभी करायचीच’ या लेखकाचा जीवनमंत्र आहे. तो मंत्र आपल्याला या अनुभवकथनातून ऐकू येत राहतो. माणसांकडे पाहताना आपली दृष्टी कशी असावी याचेही सूचन हे पुस्तक करते. बँकिंग क्षेत्रातल्या व्यक्तीने अश्याप्रकारे आपल्या अनुभवाची समृद्धता मराठी साहित्यात आणणे हेही आनंददायक आहे..!
विश्वास जयदेव ठाकूर लिखित, नात्यांची सर्व्हीसिंग हा ग्रंथ सुप्रसिद्ध हास्य कलावंत मा. गजानन गिरी आणि
सौ. गुंजन गिरी यांना दिनांक: 08 जानेवारी 2023 रोजी. त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ग्रंथ भेट देण्यात आला..!