तब्बल १३ दिवसापासून फुलवळ च्या जि.प.शाळेला मुख्याध्यापक व संकुलाला केंद्रप्रमुख नसल्याने शैक्षणिक कामकाज रामभरोसे.. एकाच वेळी एकाच शाळेतील तीन कर्मचारी तर एकाच वर्गाचे दोन्ही शिक्षक दीर्घ रजेवर गेल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा..
तब्बल १३ दिवसापासून फुलवळ च्या जि.प.शाळेला मुख्याध्यापक व संकुलाला केंद्रप्रमुख नसल्याने शैक्षणिक कामकाज रामभरोसे.. एकाच वेळी एकाच शाळेतील तीन कर्मचारी तर एकाच वर्गाचे दोन्ही शिक्षक दीर्घ रजेवर गेल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा..
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील जि.प. ची केंद्रीय प्राथमिक शाळा असून येथे पहिली ते चौथी पर्यंत प्रत्येक वर्गाच्या अ – ब अशा तुकड्या आहेत. एकूण १६४ विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत एक मुख्याध्यापक व आठ सह शिक्षक असे एकूण नऊ पदे कार्यरत आहेत , त्यात पाच महिला व चार पुरुष कार्यरत आहेत. फुलवळ हे संकुल असून या संकुलाचे केंद्रप्रमुख म्हणून येथीलच मुख्याध्यापक कार्यरत होते. तेच मुख्याध्यापक गेली १३ दिवसापासून रजेवर गेले असून येथील दोन्ही पदाचा प्रभारी कार्यभार अद्यापही कोणाकडेही दिला नसल्याने शैक्षणिक व कार्यालयीन कामकाज रामभरोसे च बनले असून या नुकसानीला जबाबदार कोण ? असा सवाल पालक व शिक्षणप्रेमी वर्गातून पुढे येत आहे.
अधिकची माहिती अशी की , फुलवळ येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत वर्ग पहिली ते चौथी पर्यंत तुकडी निहाय असलेली विद्यार्थी संख्या अशी , वर्ग पहिला अ- २५ , ब- २४ , वर्ग दुसरा अ- १७ , ब- १७ , वर्ग तिसरा अ- १९ , ब- २० , वर्ग चौथा अ- २१ , ब- २१ अशी एकूण १६४ विद्यार्थी संख्या आहे. येथे एक मुख्याध्यापक व आठ सह शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी वर्ग चौथी चे दोन्ही वर्गशिक्षक दीर्घ रजेवर गेले असून त्यातील एक वर्गशिक्षक रजेवर जाऊन जवळपास दीड महिना झाला असून दुसऱ्या वर्गशिक्षिका रजेवर जाऊन जवळपास १३ दिवस झाले आहेत.
जे कार्यरत मुख्याध्यापक होते त्यांनीच त्यांच्याच कार्यकाळात वरील दोन्ही सह शिक्षकांच्या रजा मंजूर करून त्यांना सूट दिली. एकाच वर्गाच्या दोन्ही वर्गशिक्षकांच्या रजा मंजूर केल्यानंतर त्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजेच अन्य शिक्षकांना त्या त्या वर्गाचा पदभार देणे आवश्यक होते परंतु तसे न करता ते मुख्याध्यापक सुद्धा स्वतः त्याच दिवशी रजेवर गेले , ना कोणाकडे प्रभारी चार्ज दिला , ना कपाटाच्या चाव्या कोणाकडे दिल्या. तेंव्हापासून म्हणजेच तब्बल १३ दिवसांपासून सदर शाळा मुख्याध्यापकाविना चालत असून निर्गम उतारा असो का अन्य काही कामकाज असो जर कोणी शाळेत गेला तर मुख्याध्यापक नसल्याने रिकाम्या हाताने परत येत आहे.
तर ज्या चौथ्या वर्गाचे अ व ब तुकडीचे दोन्ही शिक्षक रजेवर गेले असल्याने त्या वर्गातील विद्यार्थ्यांना तुकडी अ च्या मुलांना वर्ग तिसरी च्या तुकडी अ मध्ये तर तुकडी ब च्या मुलांना तिसरी च्या ब मध्ये बसवून शिक्षण दिले जात असल्याचे उपस्थित सह शिक्षकांनी सांगितले. तेंव्हा वर्ग तिसरी व वर्ग चौथी च्या मुलांना एकत्रित शिक्षण देताना नेमके कोणाला कोणत्या वर्गाचे धडे शिकवावेत किंवा शिकवले जात आहेत हा ही प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीला आळा घालावा असे पालकांचे मत आहे.
आज ता. १३ जानेवारी रोजी अचानक याच फुलवळ च्या जि.प. शाळेला नव्याने पदभार स्वीकारलेले शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.ए. मेटकर यांनी भेट दिली असता शाळेचा हा असला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. त्यावेळी त्यांनी स्वतः सर्वच वर्गावर भेटी देऊन वर्ग शिक्षकांशी चर्चा केली व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली.
शैक्षणिक गुणवत्तेबाबत समाधान ही व्यक्त केले. परंतु शाळेतील एकाच वेळी रजेवर गेलेल्या मुख्याध्यापक व सह शिक्षकाबद्दल आश्चर्य व्यक्त करत तत्कालीन मुख्याध्यापकांनी दोन शिक्षकांची रजा मंजूर करून आपणही रजेवर जाणे आणि शाळेतील कपाटाच्या चाव्या सोबत नेने हे योग्य नसल्याची खंत व्यक्त केली. रजेवर गेलेल्या त्या मुख्याध्यापका भ्रमणध्वनी वरून संपर्क करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु त्या मुख्याध्यापकाने शिक्षण विस्तार अधिकारी यांचा फोनच घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष मंगेश पांचाळ , समिती सदस्य ऍड उमर शेख उपस्थित होते.
शालेय समिती व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरते शाळेचे मुख्याध्यापक म्हणून येथीलच सह शिक्षक कामाजी मंगनाळे यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार घ्यावा अशी विनंती केली , तेंव्हा तुम्ही संगनमताने म्हणत असाल तर मी तात्पुरता मुख्याध्यापक पदाचा पदभार घेतो अशी कबुली कामाजी मंगनाळे यांनी दिली.
परंतु केंद्रप्रमुख पदासाठी मात्र अद्याप कोणाचीही नियुक्ती केली नसून लवकरच तो पदभार ही कोणाकडे तरी देऊन कारभार सुरळीत करू असा विश्वास ही त्यांनी यावेळी दिला.