टिचभर पोटासाठी डोंबऱ्यांची जीवघेणी कसरत..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

अशीच का ही जिंदगी पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठीची, लहान-लहान मुले सोबत घेऊन ज्यांना इतर जगाशी काही देणं घेणं नाही. आपण आपली पत्नी व सोबत असणारी ती चिमुकली मुले अंगणवाडी किंवा प्राथमिक शाळेत शिकण्याचं ते वय पण काय करणार अंगणवाडी व शाळेचे महत्त्व त्यांना समजलं नाही. ज्ञान काय असतं उमजलं नाही, नोकरी काय असते हे तर माहीतच नाही, कारण कुटुंबात कोणी शिकलच नाही अशीही डोंबारीची जात.

पारंपारिक व्यवसाय म्हणा की वडिलोपार्जित धंदा म्हणा लहान मुलांना शिक्षणापासून कोसो दूर ठेवून तारावरची कसरत करणे, म्हणजेच १०-१२ मीटर लांबीचा दोरखंड घेऊन दोन बांबू वरती उंचावर बांधून त्यावरून हातात भाला व डोक्यावरती कलश घेऊन चालणे, त्याच दोरखंडावर मोठी थाळी ठेवून त्या थाळीमध्ये पाय ठेवून चालणे, नरडीच्या कंठाने लोखंडी गजाळी वाकवणे, गजाळीचा रिंग (वलय) यामधून दोघे बाहेर पडणे, दातावर २५ ते ३० किलो वजनाचा नांगर दातावर ठेवून वजन तोलणे असे चित्त थरारक प्रात्यक्षिके, कसरतीचे खेळ दाखवत गावोगाव फिरून मिळालेल्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे हाच आमचा धंदा होय, असे बोलके शब्द सचिन बंदीधनगर यांनी काढले.

सचिन सुभाष बंदीधनगर व त्यांची अर्धांगिनी सौ. संगीता सचिन बंदीधनगर रा.आनसरवाडा ता.निलंगा जि.लातूर हे जोडपे आपल्या चिमुकल्यांना खांद्यावर व काखेतील झोळीत घेऊन कंधार सह परिसरातील खेड्यात फिरून आपला डोंबाऱ्यांचा खेळ करून लोकांचे हृदय हेलावून टाकत आहेत. सचिन बंदीधनगर यांच्याशी जवळीकता साधून चर्चा केली असता सचिन म्हणाला की, मी वरील ठिकाणी राहत असून राहायला घर नाही, कसायला शेत नाही, गावात कोणी कामाला लावत नाही, उत्पन्नाचे दुसरे कोणते साधन नाही. पारंपारिक व वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून शिक्षणाला बगल देत लहान मुलांना सोबत घेऊन तारेवरची कसरत करणे, लहान मुलांकडून कोलांट उड्या मारून घेणे, प्रसंगी चार-पाच वर्षांच्या चिमुकल्यांकडून कसरतीचे खेळ करून घेणे. लहान चिमुकल्यांचा कसरतीचा खेळ पाहून ग्रामीण भागातील महिला आश्चर्यचकित होऊन सढळ हाताने मदत करून म्हणताहेत त्या लहान्यांना शाळेत पाठवा. त्यांच्या नशिबी भविष्यात नको हा जीवघेणा खेळ म्हणून निरक्षर महिला ही देत आहेत हा मोलाचा सल्ला.

नाही माय ही मुलगी शाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेते. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्या लागताच घरदार सोडून या लहान्यांना सोबत घेऊन माळेगावच्या खंडोबाच्या यात्रेपर्यंत खेळ करत फिरतो व आमचे नातेवाईक माळेगाव यात्रेत एकत्र येतात आणि आमची भेट फक्त माळेगावातच होते माळेगावची यात्रा संपली की आम्ही परत गावाकडे जातो. गावाकडे जाताना व माळेगावला येताना उपजीविकेचे साधन म्हणून डोंबाऱ्यांचा खेळ करणे हेच आमचे मुख्य साधन होय. शासनाचे मानधन नाट्य कलावंत व लोक कलावंतांना मिळू शकते. त्याच धर्तीवर आम्हा डोंबारी समाजाचा सर्वे करून आम्हाला शासकीय मानधन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षाही सचिन बंदीधनगर या डोंबारी समाजाच्या नवतरुण कलाकाराने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *