आज आमचे मित्र, पत्रकार राजेश्वर कांबळे यांचा वाढदिवस. भ्रष्ट आणि भ्रमिष्ट झालेल्या व्यवस्थेतील उजेड दिवा म्हणून समाज, मित्र आणि नातेवाईक आपणास अनुभवत आहेत. आपले बहुरंगी व्यक्तिमत्त्व सद्या सर्व परिचित होते आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्या स्तंभावर लोकप्रशासन, सांस्कृतिक स्थित्यंतरे, राजकीय बदल आणि लोकजीवन पत्रकाराने लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ही धारणा आपण पत्रकार म्हणून तडीस नेण्यासाठी प्रयत्न करत आहात. सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार म्हणून राजेश्वर कांबळे यांची ओळख संबंध जिल्हाभर आहे.
राजेश्वर कांबळे यांचा जन्म कंधार तालुक्यातील मौजे बोरी (खु) येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना पेपर टाकण्याचे काम करावे लागले. वेतन दीडशे रुपये मिळत होते. तसेच इतर मेहनतीचे कामे करावी लागली. त्यांना आई आणि वडीलांनी चांगले संस्कार व शिक्षण दिले. आपण शिकलो नाही, याची बोच सतत त्यांच्या वडिलांना होती. मुलांनी शिकले पाहिजे हा आग्रह होता. आई आणि वडील नेहमीच त्यांचे प्रेरणास्थान राहिले आहेत. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याचा साक्षात्कार राजेश्वरच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. शिक्षणावर श्रद्धा असून बाबासाहेबांनी दिलेल्या मंत्रानेच प्रगती, स्वाभिमान शाबूत राहू शकतो. म्हणून मुलांना शिकवण्यासाठी अपार कष्ट केले.
त्यांचे शालेय शिक्षण कंधार येथे महात्मा फुले शाळेत, तर माध्यमिक शिक्षण श्री.गणपतराव मोरे विद्यालयातून झाले. बारावीचे शिक्षण श्री शिवाजी कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केले. त्यांनी श्री शिवाजी कॉलेजातूनच बी.ए.ची पदवी घेतली. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन एम.ए.झाले. तत्पूर्वी कंधारच्या स्वामी रामानंद तीर्थ अध्यापक महाविद्यालयातून बी.एड्.झाले होते. त्यानंतर नांदेड येथील उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालतून पत्रकारितेतील बि.जे.ची पदवी प्राप्त केली.
लहानपणापासूनच त्यांना लेखन व वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांचा जीवन प्रवास संघर्षमय आहे. या संघर्षमयी प्रवासात त्यांना कोणीही साथ दिली नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. त्यावर मात करून ते यशस्वी झाले आहेत. बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि बाबासाहेब या थोर विवेकवादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आहे. स्पष्टता, रुजुता, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि राजकीय भान असणारा पत्रकार म्हणून ते परिचित आहेत. पत्रकार म्हणून आयुष्याची सुरुवात करताना. त्यांनी काही बंधने स्वतः घालून घेतली आहेत. मी ही पत्रकारिता का करावी? सद्या मूल्य विरहीत झालेल्या पत्रकारितेतून मला काय साध्य होणार आहे. आणि आपल्या कर्मभूमीची जमीन लेखणीने नांगरणे सुरू केले. त्यामुळे त्यांना लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. ते सामान्य लोकांचा आवाज बनत गेले. दै.देवगिरी तरुण भारत, दै.देशोन्नती, दै.नांदेड आज, दै.श्रमिक लोकराज्य, दै.ग्लोबल भारत या वृत्तपत्रांमधून मुक्त पत्रकारिता केली. सध्या दै.बहुरंगी वार्तामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांवर विपुल लिखाण करून स्वतः ला सिध्द केले आहे. शोधक वृत्ती, जिज्ञासा निर्माण करते. नव्या प्रतिमा भेटत जातात. त्यामुळे अडगळीत पडलेले वैभव, ऐतिहासिक ठेवा, यावर भाष्य करणाऱ्या बातम्या आणि माहितीचा खजिना शब्द रुपाने त्यांनी अधोरेखित केला आहे.
आजपर्यंत त्यांनी असंख्य बातम्या लिहिल्या. बातम्या लिहिण्यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली. प्रत्येक अंकात काहीतरी नावीन्यपूर्ण, आकर्षक बातमी असावी यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यांच्या अनेक बातम्या गाजल्या आहेत. पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या पत्रकारितेला एक नवा आयाम दिला आहे. राजेश्वर कांबळे यांना नेहरू आंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार (२०१४), राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार (२०१९), पत्रकारिता सन्मान पुरस्कार (२०२०), कोविड योध्दा पुरस्कार (२०२०), जीवनगौरव पुरस्कार (२०२१), राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (२०२१), मराठवाडास्तरीय शोधवार्ता पत्रकारिता पुरस्कार (२०२२) अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. उत्कृष्ट पत्रकार, निर्भीड पत्रकार, हरहुन्नरी पत्रकार, अभ्यासू पत्रकार, संवेदनशील पत्रकार, लोकाभिमुख पत्रकार, पत्रकाररत्न, नामांकित पत्रकार, सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार, अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार, पत्रकारितेतील एक झुंजार योद्धा, शोध पत्रकारिता करणारा पत्रकार, पत्रकारिता क्षेत्रातील दीपस्तंभ, पत्रकारिता क्षेत्रातील शुक्रतारा, विविध पुरस्कार प्राप्त पत्रकार, उच्चविद्याविभूषित पत्रकार, स्वच्छतादूत, सामाजिक कार्यकर्ते, पक्षीमित्र, बहुरंगी व्यक्तिमत्त्व अशी राजेश्वर कांबळे यांची संबंध जिल्हाभर ओळख आहे. त्यांच्यावर अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
राजेश्वर कांबळे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नेहरू आंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आणखी काही विधायक उपक्रम राबविण्याचा राजेश्वर कांबळे यांचा मानस आहे. प्रामाणिकपणे काम करणे आणि जिद्द हे आपल्या उत्साहाचे रहस्य असल्याचे सांगतात. काळानुसार बदलले पाहिजे. असे त्यांचे ठाम मत आहे. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. सोशल तर मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. सामाजिक व पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रात राजेश्वर यांचे नाव पक्के गोंदले आहे. विचारांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी एखादे व्यासपीठ असावे असे त्यांना वाटले. त्यातून त्यांनी ‘संविधान’ नावाचा ग्रुप काढला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, कृषी, ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रश्नांची जाण असणारा, उच्चविद्याविभूषित पत्रकार काय करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे राजेश्वर कांबळे आहेत. त्यांनी पत्रकार म्हणून अणि सर्वांचा मित्र बनून अमीट असा ठसा उमटवला आहे. तो कायम राहो, त्यांना उत्तम आरोग्य आणि मानवतावादी संवेदना लौकिकार्थाने सर्वदूर होवो, ही मंगल सदिच्छा!