माझे परममित्र श्री शिवाजी नागोराव कोनापुरे 12 फेब्रुवारी 2023 रोजी 62 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, त्यांनी केलेले कार्य संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे हे कर्तुत्ववान व्यक्तिमत्व, अनेक वर्षे संघर्ष करून धनदांडग्यांना जरब बसवली आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. एक बाई तीन पोलिसाची घाई यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले त्यांच्याविषयी दोन शब्द …….
श्री शिवाजी नागोराव कोनापुरे यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1962 रोजी देगलूर तालुक्यातील लिंबा येथे त्यांच्या आजोळी झाला. लहानपणापासूनच चाणाक्ष व हुशार असल्याने सर्वत्र शाबासकीची थाप त्यांना मिळू लागली. बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची परिस्थिती बिकट होती,आई-वडिलांनी ही परिस्थिती बाजूला सारून त्यांना शिकवण्याचा वसा हाती घेतला. त्यांचे प्राथमिक शिक्षण उमरदरी येथे झाले, माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी म्हणजेच मुखेड येथे हुतात्मा माधव विद्यालय येथे पार पडले,
1982 ते 1987 च्या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतेवेळी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली, 1988 पासून त्यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता मध्ये झोकून दिले इथूनच त्यांच्या पत्रकारितेला बहर आला. *फुलांच्या पायघड्या वरून चालताना काटे टोचले तर सहन करायला शिका; कारण काट्यांना फक्त टोचणे माहिती असते. त्यांना वेदना कळत नसतात* तसे त्यांनी अनेक वेदना लेखणीतून कमी केल्या. वर्तमान पत्रातून त्यांनी कथा, कविता, स्तंभालेख, वास्तववादी लेख लिहून युवकांच्या गळ्यातील ताईत बनले. कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थी संसदेचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती ना. कमलकिशोर कदम यांना आमंत्रित केले होते. तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू जनार्दन वाघमारे यांच्या व्याख्यानाचा लाभ कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मिळून दिला. हे करत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली .
विश्व हिंदू परिषद,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात त्यांनी कार्यकर्त्यांना सहकार्य केले. मा.ना.बिंदू माधव जोशी यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक पंचायत या सेवाभावी संघटनेत काम केले. ग्राहक जनजागृती करण्यासाठी विविध अभ्यास वर्ग, मेळावे घेऊन जनजागृतीचे कार्य हाती घेतले. हे करीत असताना त्यांनी घराकडे दुर्लक्ष कधीही केले नाही. कुटुंबाची जबाबदारी व आई-वडिलांप्रती असणारी कृतज्ञता ठेवूनच ते कार्य करीत होते. 1996 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय ग्राहक संमेलनात त्यांनी सहभाग नोंदविला व शासनाच्या वतीने जिल्हा ग्राहक मंचात सदस्य म्हणून काम केले. पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर त्यांनी दैनिक गोदातीर, प्रजावाणी, देवगिरी तरुण भारत, लोकपत्र, उद्याचा मराठवाडा, लोकमंथन,रिपब्लिकन गार्ड, श्रमिक एकजूट, नांदेड एकजूट इत्यादी वर्तमानपत्राचे काम इमान-इतबारे केले.त्यांचे चरित्र निष्कलंक आहे.ते नेहमी सत्याच्याच बाजूला उभे राहिले, त्यामुळे सत्यमेव जयते म्हणून त्यांनी समाजातील सर्व उपेक्षितांना न्याय मिळवून दिला.
*एक बाई तीन पोलिसाची घाई* या बातमीने ते महाराष्ट्रभर परिचित झाले, त्याच क्षणी तेथील पोलिसांची बदली करण्यात आली, काही साखर कारखानदारांचे पितळ उघडे करून त्यांना आकाशातील तारे दाखविले. तेव्हा त्यांनी त्या शेतकऱ्यांना शेअर्स परत दिले. कधीही कोणाची दादागिरी खपवून घेतली नाही, मदमस्त झालेल्या लोकांना वठणीवर आणण्याचे काम त्यांनी हाती घेतले. विद्यार्थी हा समाजाचा घटक मानून त्यांच्यावर अन्याय होऊ न देता त्यांना न्याय मिळवून दिला. काही तरुण वाम मार्गाला लागले होते. वेश्याव्यवसाय अतिशय तेजीत चालला होता त्यामुळे अनेक जनाच्या संसाराची राख रांगोळी झाली होती. त्यामुळे त्यांनी वेश्या व्यवसायाचा अड्डाच उध्वस्त केला.
आणि लेखणीतील सामर्थ्य समाजाला दाखवून दिले. *सुसंगती सदा घडो* असे म्हटले जाते कारण त्यांना सकाळचे संपादक विजय कुवळेकर,वि.ना.देवधर,सुुधाकरराव डोईफोडे,रामेश्वरजी बियाणी,प्रजावाणीचे विद्यमान संपादक मा.शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी,उपसंपादक क्षेंमकर कुलकर्णी तसेच मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे यांच्या बरोबर राहण्याचा योग आला, तसेच परमपूज्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने धर्मसंकीर्तनाच्या कार्यात सहभाग घेऊन चांगले कार्य केले.
योगगुरु रामदेव बाबांच्या चळवळीत सहभाग घेऊन कार्य केले. *डॉक्टर डे* निमित्ताने तालुक्यातील अनेक डॉक्टरांना सन्मानित केले. गोरगरीब लोकांना झालेल्या रोगाचे निदान करण्यासाठी माजी, मंत्री शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिबिरे घेतले.
.*२५वेळा रक्त दान* समाजातील अनेक गरजू लोकांना रक्ताची आवश्यकता असते हे ओळखून स्वतः त्यांनी 25 वेळा रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवलेले असे हे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक कार्याबरोबर ग्राम सुधारणा करण्यासाठी निवडणुकीस उभी राहून तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून उमरदरी येथे निवडून आले. तसेच 25 ऑक्टोबर 2018 ला अडीच वर्षे गावचे प्रथम नागरिक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. सवर्णांकडून अत्याचार झालेल्या पीडित मुलींना न्याय मिळवून दिले.दलित, कामगार शेतकरी,नोकरदारावरील होणाऱ्या अन्यायाबाबत मोठ्या प्रमाणावर त्यांनी आवाज उठवला, त्यांच्या लेखणीने जातीयवाद्यांना पळता भुई थोडी होत असे. संघ संस्कारामुळे समाजात व लोकांमध्ये कसे वागावे यांचे बाळकडू मिळाले. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून मानवतावादी कार्य हातून घडू लागले, त्यांना 2013 साली 51 वर्षे पूर्ण झाल्याने सर्व मित्रांनी मिळून वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते *जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच दुर्गादास सराफ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही बहाल करण्यात आला. सध्या नांदेड जिल्हा मुद्रक संघात सक्रिय सहभाग घेऊन कार्य करत आहेत.दैनिक प्रजावाणी पेपर मध्ये 1988 पासून आजतागायत कार्यरत आहेत म्हणून त्यांना लोक कल्याणाचा महामंत्र जपणारा पत्रकार असेही म्हणतात, कौटुंबिक परिस्थिती पाहता फार मोठा गोतावळा त्यांच्यासमोर आहे.एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये ते गुण्यागोविंदाने जीवन जगताना दिसतात. घरात कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही*
*वसुधैव कुटुंबकम्* याप्रमाणे कुटुंबात चालत आहेत 25 डिसेंबर 2016 रोजी वडिलांचे छत्र हरपले त्यामुुळे ते सध्या आईच्या सानिध्यात राहून जीवन जगत आहेत, *दया करणे जे पुत्राशी तोची दास । आणि दासी* ।। आज पर्यंत त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली ते कधीही कोणावर रागावले नाहीत त्यांचे मन नेहमी प्रसन्न असते. मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही कणानेही समाधान लाभते, माझ्या मित्राच्या एकसष्टी निमित्ताने त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहिण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे जावो ही परमेश्वराकडे प्रार्थना! अशा या परोपकारी व्यक्तिमत्वास एकसष्टीच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा.