छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साऱ्या विश्वाचे सूत्र. रशियाचे माजी पंतप्रधान शिवमार्शल बुल्गानिन म्हणतात की, साम्राज्यशाहीविरूद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. तर जगविख्यात इतिहासकार ऍनाल्ड टायबर्न असे म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेबांची प्रेरणा होती. या दोघांनाही त्यांच्या वडिलांकडून ही प्रेरणा मिळाली होती.
दोघांच्याही घराण्यात दोन पिढ्यांपासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित केली.
शिवरायांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य होय. शिवरायांचे वडील शहाजी महाराज यांनी शिवरायांना वयाच्या बाराव्या वर्षीच दिलेली शिवराजमुद्रा स्पष्टपणे ‘विश्ववंदिता’ असा उल्लेख करते. याचाच अर्थ शिवाजी महाराजांनी विश्वबंधुता, विश्वशांती, विश्वसौख्य, विश्वभरभराट, विश्व विकास अशी उदात्त भावना मनी ठेवूनच स्वराज्याची बांधणी केलेली होती. याच सद्भावनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांनी प्रथम त्याकाळचा भारतदेश स्वराज्यात आणण्यासाठी आग्रा ते तंजावर व पाटना-ओरिसा ते गुजरात-कल्याण महाराष्ट्र पालथा घातला. स्वराज्याचे रोपण केले होते.
त्यामुळेच आजही जगातील लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्रे आपल्या शासनास अभिमानाने शिवशाहीचे शासन म्हणतात.
जगातला सर्वोत्तम, आदर्श, लोककल्याणकारी,समतावादी न्यायी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्यापोटी १९ फेब्रुवारी १६३० रोजी सायंकाळी किल्ले शिवनेरीवर झाला. मॉंसाहेब जिजाऊ या अत्यंत बुद्धिमान, राजनीती निपुण, युद्धशास्त्राचा जाणतेपणा, विज्ञानवादी आणि कर्तबगार होत्या, तर शहाजीराजे युद्धकला, भाषा-व्यवहाराकोश, राजशिष्टाचार, राजनीती, समाजविज्ञान यात निपुण होते. आईवडिलांचे असे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व असेल, तर मुलांचेही व्यक्तिमत्त्व तसेच तयार होईल.शिवनेरी, सह्याद्री, पुणे परिसर खेड-शिवापूर ह्या भागात शहाजीराजे व जिजाऊसोबत शिवबाचे बालपणाचे सुमारे अडीच वर्षे गेले. शिवबाचा जन्म झाल्यावर सुमारे वर्षभर जिजाऊ किल्ले शिवनेरीवरच होत्या.
त्यामुळे बाळाचे आवश्यक संगोपन, कान टोचणे, जावळं काढणे, अन्नग्रहण, रांगणे, असे अनेक संस्कार समारंभांचे आयोजन शिवनेरीवरच केले गेले होते. शहाजी राजांच्या जहागिरीत भरपूर फिरणे झाले होते. बालशिवबाने बारा मावळाचे पयर्टन केले (सूर्य मावळते ती जागा) बाल सवंगडी मावळे, रामोशी, कोळी, मांग, महार, माळी, कुंभार, न्हावी, मरठे, कुणबी, लोहार, धनगर, मुसलमान अशा सर्व जाती-जमातींतील होते. जिजाऊ व गावचे पाटील-देशमुख बालशिवबांच्या सहवासाने हरखून गेले होते.
जिजाऊ-शहाजींनी ‘शिवा’ हे नाव ठेवताना जगाचा व भारताचा सर्वच उपखंडातील सांस्कृतिक इतिहास तपासला होता. शिव हे नाव भारतीय उपखंडातील मानवी जीवनाचा अविष्कार आहे. भारतीय उपखंडातील नागरीकरणाचे मूळ सूत्र मानवतावादी, स्वातंत्र्यवादी, न्यायवादी, समतावादी होते. ह्याचा निर्माता पुरुष म्हणजे ‘शिव’ त्यामुळेच भारतीय उपखंडातील अनक स्थळांचा उल्लेख शिव ह्या शब्दाने होतो. शिवा हे नाव शिवस्वरूप नाव आहे. किल्ले शिवनेरी जन्मस्थळ शहाजी जिजाऊ शिवभक्त कुटुंब. शिव-शक्तीचेच प्रतिक भोसले-जाधव कुळातील ‘स्वराज्य स्थानेची संकल्पना’ शिवा पूर्ण करेल या आत्यंतिक विश्वासानेच बाळाचे नाव शिवा ठेवले गेले. पुढे आदरार्थी ‘जी’ लागून ते ‘शिवाजी’ झाले. हेच बाळ जगभरातील स्वातंत्र्य प्रेमींचे आदरस्थान बनून छत्रपती शिवाजी महाराज झाले आहे.
नावात काय ताकद असते हे जगात फक्त शिवाजी ह्या नावाने दाखवून दिले आहे.सर्वात महत्त्वाचे वडील शहाजीराजे यांचा मुलावर सतत प्रभाव असावा, जिजाऊ शहाजींनी एकत्रित चर्चा करून शिवबास घडवावे, यासाठी जिजाऊ-शहाजी सतत जास्त काळ सोबत असत. शहाजीराजांच्या कर्तृत्वकथा जिजाऊ शिवबास सांगत, असा बाल शिवबा वयाच्या दुसऱ्याच वर्षी हौसेने खेळता खेळता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत सराव करू लागला. डोंगर चढू लागला. गावात शेतकऱ्यांच्या शेतातील चिखलात रमू लागला. गावकऱ्यांच्या पोरांत कसे मिसळायचे अशा परंपरा जिजाऊ-शहाजींनी स्वत: कधीच पाळल्या नाहीत. त्यामुळे शिवबा गावकऱ्यांच्या पोरांमध्ये सहज मिसळत असे. जात-पात-श्रीमंती त्यांनी कधीच पाहिली नाही.
मॉंसाहेब जिजाऊ गावच्या महिलांना-युवकांना एकत्रित करून सहभोजन करत मांडीला मांडी लावून बायांना शेजारी बसवत. त्यांच्या मनातील भीती दुराव्याची भीतीयुक्त आदराची भावना बहिणींमध्ये रूपांतरित करत. शिवरायांचे शक्तीपीठ, प्रेरणापीठ आणि ज्ञानपीठ हे राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊ आहेत.जिजाऊंच्या कानावर देहूचे महान वारकरी संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे नाव आलेले होते. उसंत मिळताच त्या स्वत: शिवाजी, सईबाई, सोयराबाई, व्यंकोजी व निवडक लोकांना घेऊन महाराजांच्या कीर्तनास जात असत. महाराजांचे घणाघाती कीर्तन समाजास परिवर्तनाकडे नेत असे.
त्यामुळे हा सारा परिसर वैदिक परंपरा झुगारून वारकरी धर्म विचारांचा झाला होता. जिजाऊंनी शिवबास वारकरी धर्माची परंपरा सांगितली. संत नामदेव महाराजांनी सुरू केलेली वारकऱ्यांची चळवळ देशभर पोहोचली. त्यातूनच संत सावता महाराज, संत ज्ञानेश्वर, संत चोखा, जनाई, सज्जन, कबीर, रविदास, सेना महाराज, नरहरी महाराज, तुकाराम असे संत वारकरी धर्माच्या बाजूने उभे राहिले. संत नामदेव महाराजांनी देशभर भ्रमण केले. पंजाबमध्ये गुरूनानक देवांना त्यांनी प्रेरणा दिली. नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। हा संत नामदेव महाराजांचा संकल्प होता.
त्यांचेच शिष्य म्हणजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्याही कानावर ही स्वराज्य चळवळ होती. लोहगावच्या कीर्तनात स्वत: तुकाराम महाराजांनी शिवाजीराजास उद्देशून अनेक अभंगाची रचना केली. शिव तुझे नाव। ठेविले पवित्र। छत्रपती सूत्र। विश्वाचे की।। वयाच्या केवळ बाराव्याच वर्षी तुकाराम महाराजांनी शिवबास छत्रपती ही पदवी दिली. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातून गावोगावचे मावळे पेटून उठायचे त्यांचे वारकऱ्यांचे धारकरी बनून शिवाजीराजांच्या सैन्यात दाखल होत. छत्रपती शिवाजी महाराजांवर बालवयातच जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असणारे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्य, मुत्सद्दीपणा, राजकारण, युद्धकला, शस्त्रकला, शास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, निर्भिडवृत्ती, शूरपणा, वीरत्व, नेतृत्व, लोकसंग्रह, शिक्षण, उद्योग, व्यापार, अर्थशास्त्र, स्त्रियांचा सन्मान इ. विविध क्षेत्रांमध्ये तरबेज केले होते.
त्यामुळे ध्येयप्राप्तीसाठी महाराजांनी अनेकदा जिवावर बेतणाऱ्या लढाया केल्या. आपलं युद्धकौशल्य पणाला लावले. ते शूर होते. वीर हा त्यांच्या जीवनातील अतिशय लहानसा पैलू आहे. या पलीकडे महाराज वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रांमध्ये अत्यंत श्रेष्ठ होते.
आजही शिवरायांच्या उंचीचे व्यक्तिमत्त्व जागतिक इतिहासामध्ये सापडत नाही. राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती याचे सर्वोच्च नाव म्हणजे शिवाजी होय.
शिवरायांच्या नंतर जगातील प्रमुख चळवळींचे प्रेरणास्थान हे छत्रपती शिवरायांचे शिवतंत्र अर्थात शिवसूत्र राहिले आहे. महाराज सर्वश्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ होते. १० नोव्हेंबर १६५९ रोजीचा अफझलखान भेटीचा प्रसंग तसेच आग्रा येथील औरंगजेबाच्या भेटीचा प्रसंग म्हणजे जागतिक इतिहासातील मानसशास्त्रीय अभ्यासाचे एकमेव उदाहरण असेल. शिवाजी राजांचे मराठी, हिंदी, संस्कृत, कन्नड, उर्दू, तेलगू अशा सहा भाषांवर प्रभुत्व होते. राजांना प्रत्यक्ष पाहणारे काही समकालीन लिहितात की, ”राजांच्या मुद्रेवर नेहमी हास्य असे.” हास्यांमुळे पहिल्या भेटीतच राजांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडे. कितीही रागाने राजांकडे कोणी आले की, त्यांचा राग नाहीसा होत असे, कारण राजांचे प्रामाणिक आणि हसरे व्यक्तिमत्त्व होय.
पिता कसा असावा याचे जगातील उत्तमोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाल शंभूच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शिवरायांनी केले. त्यांनी बाल शंभूस वयाच्या आठव्या वर्षी संस्कृत भाषा पंडित बनविले. प्रज्ञा, शील, करूणा, चैतन्य, शुरत्न, वीरत्व, स्वाभिमान, संयम, समयसूचकता अशा सर्वच क्षेत्रांत निपूण केले. शिवरायांचे चारित्र्य सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि तेजस्वी होते.
त्यामुळेच राजांबद्दल शत्रूंना व त्यांच्या स्त्रियांनादेखील आदर वाटायचा. राजांनी आपल्या देशबांधवांना सांगितले की, ‘ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये.’ चारित्र्यसंपन्न असल्यामुळे त्यांचे सर्व सहकारी, सैनिक व प्रजा नीतिमान होती. म्हणजे नेतृत्व चांगले असले म्हणजे प्रजादेखील चांगली असते. शिवाजीराजे म्हणजे जगातील आदर्श नेतृत्व आहे. महाराज जगातील अनेक उत्तम व्यवस्थांचे निर्माते आहेत. त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही जगभर एक प्रेरणा आहे. त्यामुळेच प्रत्यक्षात राजेशाही असतानाही तिचे रूपांतर लोकशाहीत झाले ती एक आदर्श शासन व प्रशासन व्यवस्था होती. खरे लोकाभिमुख राज्य होते. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरीराजा छत्रपतींच्या स्वराज्यात सुखी होता. कारण शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून राजाने स्वत: त्या सोडविण्यासाठी अनेक पावले उचलले होते.
सध्या शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य होय. राजा व त्यांचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत, हे जगात प्रथम शिवरायांनी मांडले व अंमलात आणले. त्यामुळेच रयतेच्या भाजीच्या देठाला वा गवताच्या काडीलाही इजा पोहचवणाऱ्या राज्यसेवकास सजा होत असे. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शिवचरित्रात सापडते. म्हणून शिवचरित्र हे वर्तमानात सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
रमेश पवार
व्याख्याते,लेखक
बहीशाल शिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
मो.नं.७५८८४२६५२१