नांदेडसह राज्यातील विविध रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लावा – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची मागणी ः काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट

 

नांदेड, दि. 24 ः आपण देशातील रस्ते अतिशय उत्तम करण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करीत आहात. विशेषतः महाराष्ट्रातील रस्त्यांच्या निर्मितीकडे आपले लक्ष व सहकार्याची भूमिका राहिली आहे, असे नमूद करत नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील उर्वरित रस्त्यांची कामे मार्गी लावावीत, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. त्यांचे हे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून दिले.

 

 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आज (दि.24) डी. लिट्. ही पदवी प्रदान केली. त्यासोबतच त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या पार्श्‍वभूमीवर त्यांना भेटण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण स्वतः उपस्थित राहणार होते. परंतु, छत्तीसगढमधील रायपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे अशोकराव चव्हाण नांदेड येथे येऊ शकले नाहीत. परंतु, त्यांचे निवेदन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने ना. नितीन गडकरी यांना भेटून दिले. या शिष्टमंडळात नांदेड दक्षिणचे आ. मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांचा समावेश होता.

 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नांदेड-औरंगाबाद निर्माणाधिन 229 कि. मी. च्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. मराठवाड्यातील अत्यंत महत्वाचा असलेल्या या मार्गावर वाहतूकीचे प्रचंड प्रमाण आहे. रस्त्याच्या कामाकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हे काम कालबद्ध कार्यक्रम आखून लवकर संपवणे गरजेचे आहे. औरंगाबाद – पुणे प्रस्तावित प्रकल्प केवळ मराठवाडा किंवा पश्‍चिम महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल अभिनंदन करतानाच प्रकल्पाच्या पुूर्णतेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा असे निवेदनात म्हटले आहे.

 

नांदेड-हैदराबाद या प्रकल्पाबाबत आपली अनेकदा चर्चा झाली असून या प्रकल्पाबाबत अद्याप काही प्रगती नाही. मागील राज्य सरकारच्या काळात मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तारित प्रकल्प म्हणून जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाची घोषणा झाली त्याचे भू-संपादन सुरू आहे. आपण पुढाकार घेवून जर नांदेड-हैदराबाद या प्रकल्पाचा निर्णय घेतला तर मुंबई-जालना-नांदेड-हैदराबाद असा द्रुतगती महामार्ग निर्माण होऊ शकतो. याचा फायदा महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांना होईल.
यवतमाळ-महागाव-नांदेड महामार्गावर वारंगा – महागाव हा भाग सदभाव कन्स्ट्रक्शनकडे आहे. मागील चार वर्षांपासून हा रस्ता व त्यावरील पुलाचे काम अपूर्ण आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी सदरील कंत्राटदारास योग्य त्या सूचना द्याव्यात, यासोबतच वसमत – नांदेड महामार्गावर 2017 पासून काम सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झाले नाही. केव्हा पूर्ण होईल, याची शाश्‍वती नाही. या कामाचे ठेकेदार एम.बी.पाटील यांचा काम करण्यासाठी पुढाकार दिसून येत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

 

नांदेड – उस्माननगर – मुदखेड व अर्धापूर – हिमायतनगर – फुलसांगवी या कामांमध्ये शिराढोण व कौठा भागातील सुधारणेकडे चेंज ऑफ स्कोप अंतर्गत प्रस्ताव मंजूर करण्यात यावा. जेणे करुन या भागातील गावकऱ्यांच्या समस्या दूर होतील, अशीही मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

_________

ना.गडकरींची तत्परता
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विनंतीवरून ना.नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळास भेटण्याची वेळ दिली होती. भाजपाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना सुद्धा त्यांनी या शिष्टमंडळात सर्वात प्रथम भेटण्यासाठी बोलावले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे व माझे या संदर्भात बोलणे झाले ते काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाहीत. याची आठवण करुन देत शिष्टमंडळातील सर्वांच्या त्यांनी ओळखी करुन घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *