पोरकं माहेर

 

माहेर हा शब्द प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
माय- बाप ,बहीण -भाऊ, नातलग इत्यादी माहेरची माणसं ही तिची सर्व आपली असतात.
पण जव्हा माय- बापाचं छत्र निघून जातं तव्हा मात्र सगळी नातलगं,आप्तसंबध, समस्त जग, माहेरचं अंगण ओसाड भासतं…
घर, छप्पर, ओसरी सारं सारं क्षणात वाळवंट होऊन जातं
फुलत नाही कुठेच आपल्या कौतुकाचे मळे, डोळ्यांची फुलवात लावून दारी कोणीच वाट पाहत उभं नसतं… आपुलकी, काळजी आणि मायेच्या शब्दातले शिंपण ओंजळीत नसतं…
घरभर विखुरलेल्या वस्तू निराधार झालेल्या डोळ्यांनी पाहवत नसतं…
चष्म्याचं घर, खुर्च्या,पलंग,कसली ती बिलं अन् कुठल्यातरी त्या झरझरत्या याद्या बिचार्याच्या सोबतीला कोणी कोणीच भरायला नसतं…
नुसतं घरभर विखुरलेल्या आठवणींना कवटाळून पाहत राहायचं फोटोतल्या क्षणांच्या शिदोरीत आपली ही माणसं जवळ नाहीत असं समजून सारं काही उसास्यात गिळायचं…
माय- बाप गेल्यावर शिक्षा असते त्या घरात जाणं
चार भिंती आणि फक्त छप्पर उरलेलं पाहणं ते घर माहेर म्हणून शिल्लक नसणं…
लोक म्हणतात, मुलीची पाठवणी करणं फार कठीण असतं पण माय- बापाची पाठवणं करणं हेही हवं तेवढं सोपं नसतं…
एकेक वस्तू पसारा म्हणून आवरतं जाणं… त्यांच्याच वास्तू मधील त्यांचेच स्पर्श पुसत जाणं…कानढळ्या बसल्या गत
‘परत कधी येणार’ या माहेरच्या एकाच प्रश्नाने संयमाचा बांध सुटायचा. सासरची वाट धरताना‘माहेराला’ बिलगायची त्या मिठीत माहेरची माणसं एकवटून घ्यायची. ओलावलेल्या पापण्यांमध्ये अवघे माहेरपण, तो आनंद, ते उनाडपण साठवून दाटलेल्या कंठाने हुंदके देतच सासरची वाट धरायची…पुन्हा एकदा माहेरी येण्यासाठी…पुन्हा एकदा माहेरपण जगण्यासाठी…पण गेलेली माणसं कधीच परत येणार नाही…हा कडवटपणाचा घास न गिळण्या पलिकडचा झाल्यावर आता काय माहेरपण जगायचं यांची खंत खुप कमी वयातच पदरी पडल्यावर…त्याच्या झळा कश्या सोसायच्या…
माय-बापाच्या नावाची चादर जव्हा आयुष्यातून निघून जाते… तव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ हि जबाबदारी ची जाणिव करुन देत असते….

रूचिरा बेटकर नांदेड
९९७०७७४२११

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *