कंधार ( ता.प्र. )
भारतीय कृषी अनुसंधान संस्थान,पुसा नवी दिल्ली येथे कृषी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले चंद्रमनी वाघमारे यांना भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, पुसा नवी दिल्ली या विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. चंद्रमनी वाघमारे यांनी कृषी विषयांमध्ये सूत्रकृमी विज्ञान या विभागामध्ये डॉ.एम.आर.खान यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता.
भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, पुसा नवी दिल्ली यांचा ६१ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:४० वाजता भारतरत्न सी.सुब्रमणियम सभागृह, राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिसर, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे मुख्य अतिथी भारताचे उपराष्ट्रपती श्री.जगदीप धनखड हे होते. या समारंभाचे अध्यक्ष केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिह तोमर होते. तर केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ६१ व्या दीक्षांत समारंभात भारतीय कृषी अनुसंधान, संस्थानचे संचालक तथा कुलगुरू डॉ.ए.के.सिंग यांच्या हस्ते कृषी शास्त्रज्ञ चंद्रमनी वाघमारे यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
चंद्रमनी वाघमारे हे भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, पुसा नवी दिल्ली येथे कृषी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ.एम.आर.खान,प्रधान शास्त्रज्ञ आई राजश्री वाघमारे, वडील दत्तात्रय वाघमारे, मोठे काका देवीदास वाघमारे,काकु सविताबाई वाघमारे,रोहिदास वाघमारे, रेश्माबाई वाघमारे ,बहिण रोहिणी कांबळे, दिलीप कांबळे,कुंदन सोनकांबळे,मोठे बंधू अॅड.सिद्धार्थ वाघमारे,छोटा बंधू किरण वाघमारे यांना दिले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर मित्रमंडळी व नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.