मराठी साहित्याचा कणा : कुसुमाग्रज

 वि.वा शिरवाडकर यांची जयंती. त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
आधुनिक मराठी साहित्यातील कुसुमाग्रज हे एकमेव लेखक आहेत. की त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजाकडून आपुलकी मिळवली. प्रत्येक व्यक्तींला वाटत असे की ते आपलेच आहेत. अशी प्रत्येकाच्या मनात एक धारणा उत्पन्न केली. समाजात जीवन जगताना एक चांगला व्यक्ती म्हणून ते नावारूपाला आले तळागाळातील माणसापर्यंत त्यांचे विचार पोहोचले ,साहित्य निर्मिती ही त्यांची जीवननिष्ठा ठरली होती,
मराठी कवितेला आणि नाटकाला एक विशिष्ट वळण देण्यात कुसुमाग्रजांच्या साहित्याचा फार मोलाचा वाटा आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच. …..

 

 

वि .वा शिरवाडकर यांनी गद्य लेखन वि. वा शिरवाडकर नावाने तर पद्य लेखन कुसुमाग्रज नावाने केले.
बोले तैसा चाले’।त्याची वंदावी पावली या उक्तीप्रमाणे वि.वा शिरवाडकर यांचे जीवन आणि साहित्य त्यांचे अद्वितीय नाते आहे. कुसुमाग्रजांच्या नंदनवनात मानवतेला, करूणेला, स्वातंत्र्याला आणि सामाजिक समानतेला अनन्य साधारण स्थान आहे. नाटक आणि कविता या दोन वाड;मय प्रकारातून वि.वा शिरवाडकर यांनी विपुल लेखन केले ,ते त्यांच्या प्रतिभेचे उत्स्फूर्त असे भावलेणे आहे, कल्पनेच्या तीरावर हा कादंबरीचा प्रवास आहे. ससा जरी चपळ असला तरी शर्यत ही कासवानीच जिंकली होती, म्हणूनच
*जिद्दी माणसं आयुष्यात सिद्धी मिळवतात*
मग प्रसिद्धी आपोआप पाठीमागे चालत येते. असे ते म्हणत, सामाजिक अन्याय व विषमता या विषयावर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली .साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे .केशवसुत व कुसुमाग्रज यांचे सामाजिक विचारांचे नाते परस्परांशी जुळणारे आहे. महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी शिरवाडकर यांचा जन्म झाला. त्यांचे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. दत्तक विधान व नामांतर विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. शिरवाडे हे त्यांचे मूळ गाव त्यांच्या गावावरून आडनाव शिरवाडकर असे पडले. पिंपळगाव येथे कुसुमाग्रजांचे बालपण गेले.
त्यांना सदा भाऊ व एक बहीण होती. पिंपळगाव हे द्राक्षांच्या बागेसाठी फार प्रसिद्ध होते, ते शाळेत शिकत होते. शाळेतून घरी आल्याबरोबर दप्तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात फेकून देऊन बाहेर मित्रासोबत धूम ठोकत असत.गावाला वळसा घालून नदी वाहत होती, काठावर बसून बराच वेळ घालवायचा, मोराची पिसे शोधायची, काजवे पकडून त्यांचा संग्रह करायचा, मित्राचे गट करून इतर मुलांना मारझोड करायची,उन्हाळ्याची सुट्टी लागली की आंब्याच्या कैऱ्या खाण्यास बाहेर पडायचे,रखवालदाराची नजर चुकून कैऱ्या आणायचे, कधी कधी तिखटमीठा सोबत शिव्याही खायच्या, 1921 मध्ये त्यांचे काका वारले. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे काकूला आधार नव्हता म्हणून वडिलांनी त्यांच्या आग्रहास्तव शिरवाडकर यांना दत्तक दिले. अशा पद्धतीने त्यांचे दत्तक विधान झाले.1922 सालच्या सुमारास प्राथमिक शिक्षण संपून भावंडांसोबत नाशिकला गेले.
तिथे न्यू स्कूलमध्ये दाखल झाले. 1929 मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले.आता सर्व कुटुंबाची जबाबदारी वडीलावरच आली. सर्व भावंडांनी चांगल्या व वाईट गोष्टींना तोंड देत जीवन जगले. अचानक एके दिवशी 1941 मध्ये वडिलांचे ही निधन झाले. अशा प्रकारे वर्षामागून वर्षे निघून गेले
कुसुमाग्रज हे उन्हाळ्याच्या सुट्टीत वणी येथे येत असत.ते त्यांच्या आत्याचे गाव होते. तिथे ही त्यांचे वाचन चालूच होते.
कारण आत्याच्या घरात वाचनालय होते.त्यांची आवडते पुस्तक म्हणजे राम गणेश गडकरी त्यांची नाटके वाचून काढून अभिनय करण्याचा प्रयत्न करत असत.वयाच्या सतराव्या वर्षी *बालबोधमेवा* म्हणजे त्यांची कविता प्रकाशित झाली .मॅट्रिक नंतर शिरवाडकरांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सतत नाटक आणि कवितेचा छंद लागल्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले .त्यामुळे पहिल्या वर्षी ते नापास झाले. नंतरच्या काळात त्यांना त्यांची चूक कळाली. तेव्हापासून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. कुसुमाग्रजांच्या घरात नेहमी लोकमान्य टिळकांचा *केसरी* खांडेलकरांचा *नवाकाळ* हे वर्तमानपत्रे येत होती. त्यांचे मामा कथाकार, कादंबरीकार व कवी होते, त्यामुळे त्यांच्या सहवासात ही कविता रचू लागले, त्यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते त्यामुळे त्यांनी *कुसुमाग्रज* या नावाने साहित्य लेखन करण्यास सुरुवात केली. बी.ए च्या शेवटच्या वर्षी चांगल्या गुणांनी पास होऊन वि. वा शिरवाडकर मुंबई येथे गेले.
तेथे काही काम मिळते काय?याची माहिती घेत होते, काही काळासाठी त्यांनी एका ठिकाणी नोकरी पण केली. पैसा कमी पडत होते,भेळ, पाव, उसळ खाऊन दिवस काढावे लागत होते, वि,वा शिरवाडकर यांना मुंबईमधील महायुद्धाच्या वार्ता तारेने कोल्हापूरला पाठविण्यास एका महिन्याला वीस रुपये मानधन दिले जात होते,
त्या काळात एवढेच पैसे पुरत होते त्यामुळे तेथे दोन वर्षे काम केले त्यानंतर ते नाशिकला आले.
1942 साली वि.स खांडेकर यांनी त्यांच्या पैशाने *विशाखा* हा काव्यसंग्रह प्रकाशित केल्यामुळे सर्वत्र शिरवाडकरांची प्रसिद्धी पसरली. त्यांनी नाटिका, एकांकिका, समीक्षा, ललित गद्य, बालसाहित्य, कथासंग्रह, कादंबऱ्या ,कविता अशा सर्व प्रकारात विपुल लेखन साहित्य केले ,
1936 साली त्यांचा विवाह मनोरमा यांच्याशी झाला. त्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या त्यांचा विवाह प्रेम विवाह होता. त्या काळात आंतर जातीय विवाह करणे ही सोपी गोष्ट नव्हती पण दोघांनी ते धाडस केलं. नोकरी करते वेळेस नातं गोतं जोपासलं .आपण एका मोठ्या व्यक्तीच्या पत्नी आहोत हेच मोठे भाग्य आपणाला लाभले आहे असे त्या मनोरमा नेहमी म्हणत असत.
वि. वा शिरवाडकर यांनी *नटसम्राट* हे नाटक लिहिले. यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे यशस्वी महिला असते असे म्हणतात.आयुष्यभर सावलीसारख्या त्यांच्यासोबत त्या राहिल्या शेवटच्या काळात त्यांना कर्करोग झाला त्या अंथरुणाला खिळल्या. त्यावेळेस शिरवाडकरांनी पती या नात्याने पत्नीची खूप सेवा केली.
1972 मध्ये पत्नी मनोरमाचे निधन झाले. कलकत्त्याच्या डमडम तुरुंगात 150 स्वातंत्र्यसैनिकांनी आमरण उपोषण केले. त्यावेळेस वि.वा शिरवाडकर यांनी *क्रांतीचा जयजयकार* ही कविता लिहून सैनिकात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण केले. 1964 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्यामुळे गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती,1964 साली मडगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.त्यावेळेस शिरवाडकर म्हणाले “यश प्राप्त करण्यासाठी सातत्य श्रम या गोष्टीची आवश्यकता असते. जीवनात काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता असते .एक ध्यास व दुसरा अभ्यास होय. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटली नाही. यशाची पहिली पायरी चढताना पराभवाचाही सामना करावा लागतो, पराभवाने माणूस संपत नाही .प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. ज्ञान हे वाहत्या पाण्याच्या झ-यासारखं असते म्हणून ते निर्मळ ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा असे रोखठोकपणे ते बोलत असत. आज भारतातील अनेक विद्यापीठात त्यांनी लेखन केलेल्या साहित्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो. एम,फिल साठी तर त्यांच्या साहित्याचा अभ्यास जवळजवळ प्रत्येक विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेला आहे, भगवद्गीता, संत तुकाराम महाराजांची काव्य
,कालिदासाचे मेघदूत आणि उमर ख्ययामच्या साहित्याचा फार मोठा संस्कार कुसुमाग्रजांच्या कवी मनावर होता,1987 साली शिरवाडकर यांचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून महाराष्ट्रातील सर्व लोकांनी साजरे केले, प्रत्येक मराठी वृत्तपत्रांनी व नियतकालिकांनी, साप्ताहिकांनी पाक्षिकांनी मासिकांनी त्यांच्या पंच्याहत्तरवीची दखल घेतली .
पुणे विद्यापीठांनी त्यांना *डी.लीट* ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित केले. नाट्य परिषदेच्या पहिल्या वर्षीचा राम गणेश गडकरी पारितोषकाचा सन्मानही त्यांना मिळाला. महाराष्ट्र सरकारकडून साहित्यिकांना जे मानाचे सन्मान प्रदान केले जातात ते सर्व कुसुमाग्रज यांना मिळाले आहेत. कुसुमाग्रजांनी लिहिलेली *कणा* ही कविता आज ही सर्वांना ताजी वाटते व मनाला आधार देणारी आहे. ती तेरा भाषेत अनुवादित केलेली आहे . युवकांना तर ती स्फूर्ती, व प्रेरणादायक ठरली आहे.
*ओळखलंत का सर मला*,
*पावसात आला कोणी*
*कपडे होते कर्दमलेले। केसांवरती पाणी, मोडून पडला संसार । परी मोडला नाही कणा*
*पाठीवरती हात ठेवून। फक्त लढ म्हणा । ही कविता प्रत्येकाने शाळेत वाचली असेल या कवितेतील *फक्त लढ म्हणा* हा शब्द जनमाणसात अतिशय लोकप्रिय झाला. कवितेतील तो विद्यार्थी त्याची झालेली अवस्था हुबेहूब रेखाटले आहे ,कविता म्हणजे मराठी भाषेचा दागिना आहे .ते *कवींचे कवी आहेत म्हणूनच त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे .1987 मध्ये लिहिलेल्या नटसम्राट नाटकाला साहित्यातील सर्वोच्च *ज्ञानपीठ* पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबल पुरस्कारा इतकाच सर्वश्रेष्ठ समजला जातो, एके दिवशी कुसुमाग्रज विद्यार्थ्यांना म्हणाले “यशाचे शितल चांदणे तुम्हाला हवे असेल तर प्रयत्नाचा चंद्र अखंड तेजोमय ठेवलाच पाहिजे. जीवनात तुम्हाला काही साध्य करावयाचे असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता आहे .पहिली प्रखर इच्छाशक्ती ही प्रोत्साहन देणारी व दुसरी ध्येयपूर्ती कडे नेणारी भरारी ठरते.
तुम्ही जातीभेदाविरुद्ध कायदे केले आहेत परंतु प्रत्यक्षपणे जातीभेद पाळला जातो. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातून जाती बद्दलचे विषमतेचे विष मनातून काढून टाका.तरुणाचे बळ हे खरे देशाचे बळ आहे. देशाचा विकास करण्याची जबाबदारी तरुणाची आहे. तरुणच देशाचा विकास करू शकतात. परंतु सध्याचा तरुण वर्ग करमणू कीच्या गटार गंगेत वाहून जातो आहे. तो देश हित विसरला आहे. त्यामुळे तरुणाने जागरूक राहून देशाचा विकास करावा. तुम्हाला मिळणारे वेतन हे जनतेची कामे करण्यासाठीच मिळते. म्हणून जनसेवेसाठी अहोरात्र झटून काम करा ,जिद्द, चिकाटी, अपार मेहनत यांनी साकार होणारी कामगिरी ही नेहमी अतुलनीय ठरते, स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय,स्वातंत्र्य ही यशाची चतु:सूत्री आहे, कधीही यशाची वाट पाहत बसू नका,
प्रयत्न करत रहा, विश्वास ही यशाची सर्वात मोठी पुंजी आहे, प्रत्येक जण आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, नवनवीन ज्ञान आत्मसात करा अशी ज्ञान संजीवनी कुसुमाग्रज आपल्या विद्यार्थ्यांना देतात.म्हणून ते आजही सर्वांच्या हृदयात आहेत *ज्ञानपीठ* विजेते असून देखील कधी अहंकार दाखविला नाही .मोठ्या लोकापेक्षा साधी भोळी माणसं त्यांना जास्त जवळची वाटायची. स्वतःचा अपमान झाला, कोणी मुद्दामहून केला, तरी त्यांनी विरोध केला नाही.त्यांनी अनेक कवी, लेखक, साहित्यिक घडवले, एखाद्या वृत्तपत्राला लेख पाठवल्यानंतर ते लिहीत असत,
मा.संपादक साहेब लेख पसंत असेल तरच छापावे असे रोखठोक बोलणारे कुसुमाग्रज होते. 1989 मध्ये जागतिक मराठी परिषदेचे मुंबई येथे ते अध्यक्ष होते, 1991 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने *पद्मभूषण* पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला
कधी त्यांनी कोणाचे फुकट काही घेतले नाही *नटसम्राट* लिहून लोकांच्या घराघरात ते पोहोचले” कोणी घर देता का घर”हे वाक्य तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला पाठ आहे . आजच्या तरुणांनी आपला अमूल्य वेळ मोबाईलवर न घालवता मराठी साहित्य लेखनात घालवावे व आपण सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविण्याच्या जिद्दीने लेखन करावे.
एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, कादंबरीकार, नाटककार, कवींचे कवी, समीक्षक अशा विविध उपाध्या त्यांना मिळालेल्या आहेत, असा हा कुसुमाग्रज नावाचा तारा
नाशिक येथे 10 मार्च 1999 रोजी निखळला आणि आज आकाशात त्याच नावाने लुकलुकतो, जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

 

 

 

शब्दांकन
प्रा.विठ्ठल बरसमवाड
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी. ता.मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *